Friday, December 31, 2010

जगण्यासाठी आणि आनंदासाठी पुस्तके वाचा


-शं. ना. नवरे

इतर भाषेतल्या चांगल्या साहित्याचे अनुवाद मराठी साहित्यात व्हायला हवेतच. यामुळे देशातले भाषा प्रेम वाढेल. एकमेकांच्या भावभावनांची साहित्यातून देवाण घेवाण होईल. भाषेचे आदान प्रदान व्हायला यामुळे मदत होईल. आज इंग्रजीतले साहित्य मराठीत अनुवाद होते आहे. हे योग्यच आहे. पण मराठीतल्या निव़डक साहित्याचा अनुवाद इंग्रजीत होणे आवश्यक आहे. यामुळे एकमेकांच्या अधिक जवळ जाण्याच्या प्रक्रियेला वेग येईल.

अतिशय सोप्या पण तेवढ्याच संवादात्मक शैलीत ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार शं. ना. नवरे यांनी संमेलनाच्या निमित्ताने जमलेल्या वाचकांशी संवाद साधताना म्हटले. रविवारी दुपारी अंगावर दुपारचे उन घेत ठाण्यातल्या ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या दरबारी ग्रंथप्रदर्शनाच्या खास व्यासपीठावर २६ डिसेंबरला २०१० रोजी शंनांच्या हस्ते मेहता पब्लिशिंग हाउसच्या १३ अधिक ६ अशा १९ पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते वाचकांशी हितगुज करीत होते. साहित्य संमेलनात एका प्रकाशन संस्थेची एवढी पुस्तके प्रकाशित होण्याची ही पहिलीच घटना असावी

या प्रकाशित झालेल्या पुस्तकात अरुण शौरींचे आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतचे पुस्तक वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का ? ( अनुवाद कॅप्टन राजा लिमये )`, ली चाइल्डचे नथींग टू लूज (अनुवाद- उदय कुलकर्णीं ) डिजिटल फॉर्ट्रेस (मूळ लेखक डॅन ब्राऊन ,अनुवाद- अशोक पाध्ये),सुगरणीचं विज्ञान (डॉ. बाळ फोंडके) , एक दिवस (शोभा चित्रे यांच्या अकरा ललित लेखांचा संग्रह) , वुमन ऑन टॉप (सीमा गोस्वामी- आनुवाद- शोभना शिकनीस), द स्टार प्रिन्सिपल- रिचर्ड कोच (श्याम भुर्के अनुवादित ), उधाण-गरीबीचं वास्तव दर्शविणा-या ह्दयस्पर्शी कथा (पांडुरंग कुंभार) , एक अधुनिक युध्द कथा -आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद (मायकेल हेस्टिंग्ज- अनुवाद-अंजनी नरवणे) निग्रहाने सर्वकाही स्पष्ट सांगत पोळून काढणारी ही कथा. पानगळीच्या आठवणी (शोभा चित्रे), द मिसिंग रोझ(मूळ लेखक- सरदार ओझकान,मराठी अनुवाद- श्रीकांत परांजपे), इन साईड दी गॅस चेंबर्स (संपादन- जीन माउटापा,इंग्रजी अनुवाद- एंड्रयू ब्राउन, मराठी अनुवाद- सुनिती काणे), भावकल्लोळ (मुळ कन्नड कथा- के. सत्यनारायण, अनुवाद- प्रा. एन.आय. कडलास्कर)
याशिवाय चिकन सुप फॉर सोलचे तीन भाग आणि Speeches that Reshaped the World, Speeches of War and Peace, Awa Maru the titanic of Japan ही इंग्रजी
या सहा पुस्तकांचा समावेश होता

छोटेखानी उभारलेल्या कै. निषाद देशमुख प्रकाशन मंचावर यावेळी शंनांसोबत सुनिल मेहता, साहित्यसमीक्षक रविप्रकाश कुलकर्णी आणि सुभाष इनामदार उपस्थित होते. पुस्तकांचे प्रकाशन करताना शंनांनी वाचकांना मेहतांनी प्रकाशित केलेली उत्तम दर्जाची पुस्तके विकत घेऊन आपल्या पुस्तकांच्या कपाटात ठेवावीत असे आवाहन केले. घरातल्या एका तरी ठिकाणी पुस्तकांसाठी स्वतंत्र जागा देण्याने तुम्ही भाषेवर, पुस्तकांवर आणि पर्य़ायाने संस्कारक्षम किती आहात ते लक्षात येईल, असे छोट्या गोष्टीतून सांगितले.

पुस्तके कशासाठी वाचायचे ते त्यांनी दोन शव्दात सांगितले...जगण्यासाठी आणि आनंदासाठी.....

पुस्तके भेट द्या. त्यांना वेगळे अस्तित्व द्या. त्यांच्याशी बोला. त्यांना हाताळा. त्यांच्यावर प्रेम करा.

पुस्तक प्रकाशन समारंभात हिम्मत पाटील (सांगली) आणि विनायक गोखले (ठाणे)
या दोन वाचकांना या व्यासपीठावर बोलावून त्यांना एकहजार रूपायांची पुस्तके शंनांच्या हस्ते भेट देण्यात आली.

साहित्य संमेलनात साहित्यप्रेमी तर येतातच पण पुस्तके खरेदी करण्यासाठी, ती पाहण्यासाठी इथे हजारोंच्या संख्येनी पुस्तके खरेदी करणारे वाचक येत असतात. म्हणूनच ही एक वेगळी प्रकाशनाची संकल्पना राबविण्यात आली.

Thursday, December 30, 2010

दमां'च्या पुस्तकांचे हक्क "मेहता पब्लिशिंग'कडे


ज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची लोकप्रिय पुस्तके बाजारपेठेमध्ये सहजपणे उपलब्ध होत नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क "मेहता पब्लिशिंग हाउस'कडे दिले आहेत. नव्या पिढीच्या वाचकांसाठी नव्या संचातील १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत.

मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता यांना मिरासदारांची पुस्तके बाजारामध्ये मिळत नसल्याचा अनुभव आला. आठ महिन्यांपूर्वी त्यांना "माझ्या बापाची पेंड' हे पुस्तक हवे होते. त्यांनी चौकशी केली असता या पुस्तकासह मिरासदारांची सर्वच पुस्तके उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यातून त्यांनी प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या माध्यमातून प्रा. मिरासदार यांच्याशी संपर्क साधला आणि पुस्तके नव्याने प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मिरासदार यांनी त्यांच्या १८ पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊसला दिले.


मेहता म्हणाले, ""एखाद्या लेखकाची पुस्तके उपलब्ध होत नाहीत याचा अर्थ त्यांचे नाव कमी होते की काय, अशी भीती मला वाटली. ही पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत हा यामागचा उद्देश आहे. मिरासदार यांच्या बहुतांश पुस्तकांना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची मुखपृष्ठे आहेत. त्यामुळे उर्वरित पुस्तकांनादेखील नव्याने मुखपृष्ठे करून द्यावीत, ही आमची विनंती फडणीस यांनी मान्य केली आहे. "मिरासदारी' आणि "निवडक द. मा.' या पुस्तकांमध्ये त्यांच्या निवडक कथांचा समावेश आहे.''


"गाणारा मुलूक', "मी लाडाची मैना तुमची', "नावेतील तीन प्रवासी', "माझ्या बापाची पेंड', "चुटक्‍याच्या गोष्टी, "गुदगुल्या', "भोकरवाडीच्या गोष्टी', "सरमिसळ', "चकाट्या', "हसणावळ', "गंमत गोष्टी', "जावईबापूंच्या गोष्टी', "गप्पांगण', "माकडमेवा', "बेंडबाजा', "खडे आणि ओरखडे', "सुट्टी आणि इतर एकांकिका' आणि "विरंगुळा' ही १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.