Friday, April 22, 2011

कॅरी मी डाउन


जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे घरातील नाते-संबंध बिघडतात.तो आपल्या आईचा
खून करण्याचा प्रयत्न करतो. त्याची रवानगी सुधारगृहात होते.
पौगंडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा कौशल्यपूर्ण प्रयत्न!...


जॉन इगन या बाराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मुलाला आपल्यातील अचाट शक्तीची जाणीव होते.
ती म्हणजे लोकांनी केलेले 'असत्य-कथन' शोधून काढण्याची...
या अचाट शक्तीच्या आधारे जॉन आपले नाव 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदविण्याचा प्रयत्न करतो...

पौंगडावस्थेतील जॉनच्या अशा वागण्यामुळे घरातील नातेसंबंध बिघडतात...
त्याचे वागणे इतके पराकोटीला पोहचते की, तो आपल्या आईचा खून करण्याचा प्रयत्न!... करतो...
त्यातून त्याची रवानगी सुधारगृहात होते... ...एवढं सगळं घडतं ते जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे...
या अवस्थेतील म्हणजे पौंगडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा केलेला कौशल्यपूर्ण प्रयत्न!...
मूळ लेखक : एम. जे. हायलंड
अनुवादक : पुलिंद सामंत



पृष्ठे : 251 किंमत : 250

Wednesday, April 20, 2011

भारतात विकिपिडिया


जानेवारीत विकिपिडियाने आपल्या दहाया वर्धापनदिनाचा मुहूर्त साधून अमेरिकेबाहेरचे आपले पहिले कार्यालय सुरू केले
तेही भारतात. या घटनेचे महत्त्व खूप मोठे आहे.

दीड कोटी लेख किंवा नोंदी असणारा विकिपिडिया हा आॅनलाइन ज्ञानकोश म्हणजे गेल्या दशकातले एक आश्चर्य आहे. शासनाच्या निधीच्या बळावर मराठीत विश्वकोशाच्या निर्मितीचे काम गेली पन्नास वर्षे चालू आहे,
ते अजूनही पूर्णत्त्वाला गेलेले नाही आणि आधी प्रसिद्ध झालेल्या खंडातील माहिती तीस-चाळीस वर्षे लोटल्याने
कालबाह्य झाल्यामुळे नोंदींमध्ये भर घालण्याची गरज असूनही त्याबाबत फारसे काही घडतेय असे दिसत नाही.

या पाश्र्वभूमीवर केवळ दहा वर्षात दीड कोटी नोंदी असणारा आॅनलाइन ज्ञानकोश आणि त्यातील नोंदींच्या नूतनीकरणाची
वा पुनर्लेखनाची अविरत चालू असणारी प्रक्रिया यांचे अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. या ज्ञानकोशाला कुठल्याही देशाच्या शासनाचा निधी मिळत नाही, नोंदींचे लेखन करणाऱ्या लेखकांना किंवा त्यांचे संपादन करणाऱ्याना कसलेही मानधन मिळत नाही तसेच या ज्ञानकोशातील नोंदी बघण्यासाठी कोणालाही शुल्क द्यावे लागत नाही,
आणि केवळ इंग्रजीपुरताच हा ज्ञानकोश मर्यादित नाही तर 260 भाषांमध्ये हा उपलब्ध आहे.
या सर्वच बाबी आपल्याला आश्चर्याचे धक्के देणाऱ्या आहेत.
जगातील सर्व माहिती प्रत्येक भाषेत उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट पुढे ठेवून विकिपिडियाचा आरंभ झाला
आणि कुठलीही सेन्सॉरशिप न लादता वाचकांसाठीच यातील नोंदी लिहाया, दुरुस्त कराया, निर्दोष व परिपूर्ण कराया
अशी मुभा आरंभापासूनच देण्यात आली आहे. हा ज्ञानकोश कोणालाही मुक्तपणे वापरता यावा,
आर्थिक फायद्याचा हेतू त्यामागे नसावा, त्यामुळे त्यात जाहिराती घेऊ नयेत असाही कटाक्ष
त्याच्या संस्थापकांनी आरंभापासून धरलेला आहे. विकिपिडियाला आज चाळीस कोटीवर लोक भेट देतात.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर या दोन तरुणांनी इ. स. 2001 मध्ये विकिपिडियाद्वारे माहितीचे दालन खुले केले.
आपल्या कल्पनेला असे यापक स्वरूप लाभेल, कोट््यवधी लोकांचे सहकार्य त्यासाठी लाभेल असे त्यावेळी त्यांना
स्वप्नातदेखील वाटले नसेल. `एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाछसारख्या प्रकल्पासाठी प्रचंड यंत्रणा राबत असते
आणि त्याची आर्थिक उलाढालही अवाढय असते. स्वत:जवळ फारसे पैसे नसताना
आॅनलाइन एनसायक्लोपिडियाचा उपक्रम हाती घेणे हा एका दृष्टीने अयापारेषु यापारच होता.
या ज्ञानकोशातील नोंदींखाली ती लिहिणाऱ्याचे नाव टाकायचे नाही किंवा लेखनाबद्दल मानधनही द्यायचे नाही
असा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आरंभी अनेक हितचिंतकांनी आक्षेप घेतला.
नाव नाही, पैसा नाही, मग नोंदी लिहायला कोणी तयार होणार नाही असे अनेकांना वाटले.
परंतु हे आक्षेप आणि शंका फोल ठरल्या. नोंदी लिहायला हजारो हौशी तसेच जाणकार लोक पुढे आले.
अल्पावधीतच हजारो नोंदी विकिपिडियावर उपलब्ध झाल्या आणि त्यांचा संदर्भासाठी वापर करणाऱ्याची संख्याही वाढू लागली. नोंदींमध्ये काही सुसूत्रता आणि शिस्त असावी या दृष्टीने आरंभापासून काही पथ्ये पाळण्यात आली.
नोंदींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी संपादक सूचना करू लागले. संदर्भात नेमकेपणा असावा यासाठी दक्षता घेण्यात आली.
दहा वर्षाच्या अवधीत दीड कोटी नोंदींचा डोंगर उभा राहिला. मानवी इतिहासातला सर्वात मोठा ज्ञानकोश सिद्ध झाला.
तो सतत वर्धिष्णू राहावा, ताजा अद्ययावत राहावा अशी यंत्रणा कार्यरत झाली.
एकूण 260 भाषांमध्ये आणि भारतातील 20 भाषांमध्ये विकिपिडियाचा व्याप वाढू लागला.

इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्थान भक्कम करीत राहण्याची प्रक्रियाही भारतात वेग धरीत आहे.
त्यामुळे विकिपिडियाला भारतात आपली शाखा उघडण्याची गरज भासली. जानेवारी 2011 मध्ये विकिपिडियाने
आपला दहावा वर्धापन दिन भारतात साजरा केला आणि आपल्या पहिल्या ओहरसीज कार्यालयाचा शुभारंभ केला.
`विकिमिडिया डॉट इनछ हे संकेतस्थळ कार्यान्वित केले गेले.

भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अत्यंत भक्कम आहे त्याचप्रमाणे विविध मनमतांतरांचा आदर करण्याची
आणि परस्पर संवाद साधण्याची प्रदीर्घ परंपरा भारतात भाषिक विविधतेचे आणि स्वागतशील मानसिकतेचे आकर्षण वाटते
असे संस्थापक जिमी वेल्सने म्हटले आहे. त्यामुळेच भारतात आपले अधिकृत केंद्र विकिपिडियाने सुरूकरण्याचा
निर्णय घेतला. दहाया वर्धापनदिनाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये 97 ठिकाणी विकिपिडियाचे कार्यक्रम झाले.
विकिपिडियासाठी एखाद्या विषयावर निबंध लिहिण्याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात कलकत्त्याच्या
जादवपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. इंग्लिश साहित्य हा विषय एम.ए.साठी घेणाऱ्या विद्यर्थ्यांना
विकिपिडियासाठी एक निबंध लिहावा लागतो. त्याचे मूल्यमापन त्यातील संशोधन, आशय आणि नावीन्य या निकर्षावर केले जाते. तेथील बहुसंख्य विद्यार्थी विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी आणि संदर्भ मिळवण्यासाठी
विकिपिडियाचा वापर करतात, असे आढळून आले आहे. विकिपिडिया या एकमेव साधनावर अवलंबून राहणे
आणि त्याची कॉपी करणे हे जर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू लागले तर तेही गैरच ठरेल.
त्यामुळे विकिपिडियाबाहेरचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न चोखंदळ आणि हुशार विद्यार्थी करतात
आणि आपले वेगळेपण प्रकट करतात असाही अनुभव येतो.

विकिपिडियामुळे इंग्रजी भाषेप्रमाणेच जगातील प्रमुख भाषांमध्येही आॅनलाइन ज्ञानकोश निर्मितीला चालना मिळाली आहे. इंग्लिशमधील 30 लाख लेख विकिपिडियावर आहेत, त्याचप्रमाणे जर्मन, फ्रेंच, इटालियन स्पॅनिश या भाषांमध्येही
प्रत्येकी सुमारे 10 लाख लेख आहेत. भारतातील 20 भाषांना विकिपिडियामध्ये स्थान मिळाले आहे.
त्यात हिंदी, भोजपुरी, सिंधी, मराठी, तामिळ, तेलगू, कानडी वगैरे भाषांचा समावेश आहे.
आश्चर्य म्हणजे काही बोलीभाषांचेही भाग्य विकिपिडियामुळे उजळले आहे. त्यांना जीवदान मिळाले आहे.
बिहारमधील प्राचीन आंगिका ही बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.
परंतु विकिपिडियात त्या भाषेतील काही नोंदी आंगिकाचे पुरस्कर्ते करूलागले आहेत आणि तिचा वापर वाढू लागला आहे.
एकीकडे जागतिकीकरणामुळे आणि इंटरनेटमुळे इंग्रजी वगैरे भाषांचा वापर वाढून बऱ्याच भाषांचा प्रभाव कमी होत आहे तर दुसरीकडे फारशा प्रचलित नसलेल्या बोलीभाषा वा छोट््या प्रादेशिक भाषा कात टाकून नया परिवेशात पुढे येत आहेत.

भारतात विकिपिडियामुळे विविध विषयां बद्दललची माहिती सुलभपणे उपलब्ध होईल हे तर स्पष्टच आहे, पण त्याबरोबर वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये संदर्भबहुल बीजग्रंथांचा अभ्यास होऊ लागेल. ज्ञानभाषा म्हणून त्यांची क्षमता विकसित होत राहील. लोकसाहित्याचे संकलन तसेच बोलीभाषांचे संवर्धन अधिक साक्षेपाने होऊ लागेल. पुस्तकांपेक्षा दृकश्राय माध्यमामुळे लोकसाहित्य आणि बोलीभाषा यांचा अभ्यास आणि प्रसार अधिक सहजतेने होऊ लागेल.

तामीळ विकिपिडियात इ.स 2003 पासून आजवर 25 हजार लेखांची भर पडली आहे. या लेखांचे लेखन वा अनुवाद
सुमारे 250 उत्साही यक्तींनी केले आहे. दररोज एक लाखावर अभ्यासक त्याचा लाभ घेतात.
जून 2010 मध्ये तामीळनाडू सरकारने महाविद्यालयीन विद्याथ्या|साठी तामीळ विकिपिडियासाठी एक लेखस्पर्धा आयोजित केली होता. स्पर्धेतील 2000 लेखांपौकी 1200 लेख विकिपिडियासाठी निवडण्यात आले.
त्याचप्रमाणे दीड लाख तामीळ शब्दांचा समावेश असणार्या शब्दकोशाची सीडी तामीळनाडू सरकारने वितरित केली.
त्याशिवाय 500 लेखांची विकी सीडी तयार करून तामीळनाडूमध्ये विकिपिडियातर्फे वाटण्यात आली.
एका संगणकाभोवती विद्यर्थ्यांना जमा करून या सीडीतले लेख वाचून दाखवले जातात. संगणक व इंटरनेट सेवा मर्यादित असल्याने विकिपिडियाचा वापर अशा क्लासेसद्वारे यापक पातळीवर होऊ शकतो.
केरळमध्येही तेथील सरकारच्या पुढकाराने अशीच सीडी तयार करून 60 हजार शिक्षकांना संदर्भासाठी पुरवण्यात आली आहे. मल्याळी भाषेत उपलब्ध नसलेल्या विविध विषयांवरील माहितीचा खजिना या सीडी द्वारे शिक्षकांना आणि विद्यर्थ्यांना सहजगत्या हस्तगत होऊ शकते.

आपापल्या भाषेत विकिपिडियाचा भक्कम पाया घालण्यासाठी स्वयंस्फूर्तीने लेखन-संपादन करणाऱ्या व्यक्तींच्या संघटना आता स्थापन होऊ लागल्या आहेत. पुणे, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, कलकत्ता येथे संपादकांचे गट तयार झाले असून,
नियमितपणे एकत्र येऊन नवनया विषयांवरचे लेखन मिळवण्यात येते. विकिपिडियासाठी संपादन कसे करावे याचे
प्रशिक्षणही अशा कार्यशाळांमध्ये देण्यात येते!

`विकिअॅकडमी, विकिएक्सपर्ट असे नवे शब्दही त्यामुळे प्रचारात येत आहेत. एनस्लायकोपिडीया ब्रिटानिकासारखे ज्ञानकोश हजारो रुपये खर्च करून संग्रही बाळगणे फार थोड्या लोकांना परवडते. विकिपिडियामुळे ब्रिटानिकापेक्षाही अधिक नोंदी असणार्या आॅनलाइन ज्ञानकोशातील माहिती कसलीही धावपळ न करता तीस सेकंदाच्या आत बसल्या जागी मिळवता येते. मिळू शकते. विकिपिडियाने माहितीचे संकलन आणि वर्गीकरण, माहितीची उपलब्धता आणि अद्ययावतता याबाबत अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे भारतात कार्यालय उघडून विकिपिडिया भारतीय भाषा आणि प्राचीन भारतीय ग्रंथसंपदा आणि संस्कृती यांना नवा उजाळा देऊ शकेल. मराठीसाठीही विकिपिडिया हे एक वरदान ठरू शकेल.

-सुनील मेहता

Tuesday, April 19, 2011

ए रशियन डायरी


अॅना पोलितकोवस्क्या एक निर्भिड पत्रकार 2003 ते 2005 च्या अखेरपर्यंत,
रशियात भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणूका,
बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ,
चेचन्याची शोकांन्तिका



ब्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणाऱ्या आणि हादरवून टाकणाऱ्या सत्यांना
अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे,
त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मारून टाकणारच होतं
आणि एका प्रकारे ती एवढे दिवस जगली, हाच एक चमत्कार म्हणावा लागेल!
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट तर ही म्हणावी लागेल की, सोव्हिएतनंतरच्या अस्थिरतेच्या काळात
एक अशी पत्रकार उभी राहिली, जिने जवळजवळ एकहाती चेचन्याची कुप्रसिद्ध दु:खान्तिका,
तसंच आधुनिक रशियाची गैरकृत्यं जगाच्या नजरेसमोर आणली. राजकीय आणि
मानवी हक्कांची व्यवस्थेतच मोठ्या प्रमाणावर घडून आलेली पायमल्ली,
याचा तिने बुरखा फाडला आणि
'रशियन डायरी'त केलेल्या नोंदीतून तिने ते काम सुरूच ठेवलं.
हीच ती डायरी,
डिसेंबर 2003 ते 2005च्या अखेरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पार्लमेंटरी निवडणुका आणि
बेसलानच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर उठलेला गदारोळ यांच्या नोंदी ठेवणारी!
अॅना पोलितकोवस्क्याला जगू देण्यात आलं नसतं,
याची जणूकाही भविष्यवाणीच तिची 'ए रशियन डायरी' वाचताना झाल्यासारखी भासते.
तिच्या मॉस्को येथील अपार्टमेंट ब्लॉकच्या जिन्यात,
सुपारी घेऊन एका भाडोत्री मारेकऱ्याने केलेली तिची भयानक हत्या घडल्याचं तुम्हाला ठाऊक असल्याने
तिचा हा शेवट अटळ होता, हे प्रकर्षाने जाणवतं.


मूळ लेखक : अॅना पोलितकोवस्क्या
अनुवादक : शोभना शिकनीस


पृष्ठे : 318
किंमत : 300

यशस्वी सर्जनची ‘सर्जनशील’ वाटचाल



-अभय जोशी


मना सर्जना-डॉ. अनिल गांधी
गेल्या काही वर्षांत समाजाच्या विविध घटकांतील मान्यवर व्यक्तींनी मराठी साहित्यात आत्मचरित्रांच्या रुपाने आपल्या अनुभवांची भर घातली आहे. एकेकाळी केवळ लेखक अथवा साहित्यिकांपुरतेच मर्यादित असलेले साहित्य, त्यातही आत्मचरित्रांचे दालन सर्वासाठी खुले होऊ लागले. जाणत्या तसेच सर्वसामान्य वाचकांनीही त्यास लक्षणीय प्रतिसाद दिला, ही बाब उल्लेखनीय ठरते. पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर अनिल गांधी यांचे अलीकडेच प्रसिद्ध झालेले ‘मना सर्जना’ हे आत्मचरित्र असेच वेधक आणि सरस ठरले आहे.
डॉ. गांधी यांचे ‘मना सर्जना’ वाचताना ठळकपणे जाणवतात त्या दोन बाबी. एक म्हणजे डॉक्टर होण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच बांधलेला चंग आणि त्या अनुषंगाने केलेले प्रयत्न.
खरे म्हणजे, डॉक्टर गांधी यांचे वडील सोलापूरमध्ये शाळाशिक्षक होते. सुमारे सात दशकांपूर्वी त्या काळातील कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये असलेलीच जेमतेम आर्थिक परिस्थिती गांधी कुटुंबियांची होती. घरातील सदस्यांचा वाढता पसारा.
परंतु घराला कोणतीही वैद्यकीय पाश्र्वभूमी नसतानाही लहानगा अनिल डॉक्टरकीचा ध्यास धरतो आणि पुढे मोठेपणी त्या दिशेने यशस्वीरीत्या प्रयत्न करून डॉक्टर, सर्जनही होतो.
आपल्याला डॉक्टरकीचे वेध का लागले, याची कारणीमीमांसा करताना त्या काळामध्ये एकूण गरिबी असूनही समाजात असलेला सेवाभाव कसा महत्त्वपूर्ण ठरला, याचे दाखले डॉक्टरांनी आपल्या या वाटचालीची कथा सांगताना या पुस्तकाद्वारे दिले आहेत. डॉक्टर गांधी यांनी आपल्या या पुस्तकात त्यांना सर्व प्रकारची मदत करणारे त्यांचे मित्र, व्यावसायिक सहकारी, अन्य ज्येष्ठ डॉक्टरवर्ग यांचे ऋण मनमोकळेपणाने मान्य केले आहे. हे सर्वजण त्या त्या काळात आपल्याला भेटले नसते आणि त्यांनी आपल्याला सहाय्य केले नसते तर आजचे ‘डॉ. अनिल गांधी’ कदाचित बघायला मिळाले नसते, याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दाखले या पुस्तकामध्ये आपल्याला अनेकदा वाचायला मिळतात.
डॉ. गांधी यांनी आज वयाची सत्तरी पार केली आहे आणि ज्या काळात त्यांनी डॉक्टरीचा नेटाने अभ्यास करून आजचे स्थान मिळविले, तो काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती निश्चितच वेगळी होती. आजच्यासारखी ‘कट-फी’, अनावश्यक चाचण्या, असा प्रकार त्या काळात कदापि नव्हता. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना केवळ नित्याचीच नव्हती तर त्या काळातील डॉक्टर एखाद्या ‘फॅमिली फ्रेण्ड’ प्रमाणे आपल्या रुग्णांच्या घरचे निकटचे मित्रच होते. त्या काळात डॉक्टर आपल्या रुग्णांच्या घरगुती समस्यांवरही तोडगा काढीत असत. आपल्या रुग्णांची नातेवाईकांप्रमाणे काळजी घेण्याबरोबरच त्याला धीर देऊन त्याचा आजार दूर करण्यासाठी एखाद्या निष्णात सर्जनाप्रमाणे शरीराबरोबरच त्याच्या मनावरही यशस्वी उपचार केल्याची उदाहरणे या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. ‘चालला..लमाणांचा तांडा’ या प्रकरणात डॉक्टरांनी आपल्या डॉक्टरकीच्या वाटचालीतील अनेक रुग्णांच्या कथा नावानिशी दिल्या आहेत. ‘लमाणांचा तांडा’ याच प्रकरणात जिन्यातून उलटय़ा दिशेने येणाऱ्या आजीबाईंचा डॉक्टरांनी सांगितलेला किस्सा आपल्याला नकळत हसवून जातो. पुण्यात डॉक्टरकी केल्यामुळे पुणेकरांचे काही ‘अस्सल’ अनुभवही डॉक्टरांना आले. अर्थात ते फार कमी असल्याचेही डॉक्टर नमूद करतात. सध्या गाजत असलेल्या ‘स्वेच्छामरणा’च्या विषयावरही याच प्रकरणात डॉक्टरांनी आपले मत थोडक्यात पण अत्यंत नेमकेपणाने मांडले आहे. प्रारंभीच्या पहिल्या प्रकरणातील मंजुश्री सारडा प्रकरणात आलेले अनुभव डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहेत.
वरती म्हटल्याप्रमाणे डॉक्टर गांधी यांना आपले इप्सित साध्य करण्यासाठी अनेक संकटे, कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्यामधून त्यांनी यशस्वीपणे मार्गही काढले. हे करताना डॉक्टरांनी अडचणीच्या परिस्थितीचा बाऊ केला नाही, हे महत्त्वाचे ठरते. आजकाल परीक्षेत कमी मार्क मिळण्याच्या भीतीमुळे आत्महत्येचा वाईट मार्ग अनुसरणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे, असे सुचवावेसे वाटते. या पुस्तकातील शेवटचे मी ‘सर्जन’शील..? हे प्रकरण गांभीर्याने वाचावे असेच आहे. त्या काळातील सामाजिक भान, दुसऱ्यांना मदत करण्याची एकूण वृत्ती, त्यासंदर्भात डॉक्टरांना जाणत्या वयात आलेले अनुभव आणि विवाहानंतरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी वर्षां यांनी दिलेले निरपेक्ष सहकार्य, आदी मुद्दय़ांचा डॉक्टरांनी अत्यंत मनमोकळेपणाने ऋणपूर्वक उल्लेख केला आहे. ध्येयपूर्तीसाठी प्रसंगी घरातल्या जवळच्या व्यक्तींना आपण अनेकदा दुखावल्याची खंतही डॉक्टरांनी प्रांजळपणे व्यक्त केली आहे. या पुस्तकात डॉक्टर गांधी यांनी आपला व्यवसाय संभाळून आश्रमशाळा, आर्थिक गुंतवणूक, आदी क्षेत्रांतही योगदान दिले आहे.
‘सर्जन’ या शब्दाचा मराठी अर्थ शल्यचिकित्सक असून मराठी साहित्यातील ‘सर्जनशील’ अथवा ‘सृजनशील’ या शब्दाचा अर्थ निर्मितीशी येतो. त्यामुळे व्यवसायाने ‘सर्जन’ असलेल्या डॉ. गांधी यांनी ‘मना सर्जना’ या आत्मकथनात्मक पुस्तकाद्वारे आपल्यातील ‘सर्जनशील’ लेखकही तितक्याच यशस्वीपणे रंगविला आहे.

मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : २२०
मूल्य : २०० रुपये

(लोकसत्ताच्या लोकरंग य़ा रविवारच्या १७ एप्रिल २०११ च्या अंकात `मना सर्जना`
पुस्तकाचे परिक्षण आले आहे , ते येथे देत आहोत .)

Sunday, April 17, 2011

पुस्तक तुमच्याशी बोलते-राहूल सोलापूरकर



बॅंकेच्या समृध्द जिवन अनुभवातून लिहलेले आनंदाचे पासबुक हे पुस्तक तुमच्याशी बोलते. सामाजिक क्षेत्रातले, संगीतातले,नाटकातले लोक आणि त्याच्यांबरोबरचे संबंध यातून श्याम भुर्के यांनी जे लिहले आहे ते वाचकांनी वाचावे असेच आहे, असे मत अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केले.

मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केलेल्या श्री. श्य़ाम भुर्के यांच्या आनंदाचे पासबुकचे प्रकाशन राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. शनिवारी (१६ एप्रिल) अक्षरधाराच्या बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर संगीतकार आनंद मोडक यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ रंगतदार झाला.

राहूल सोलापूरकरांची खंत एकच होती की भुर्के यांनी ब-याच माणसांवरचे अनुभव त्रोटक स्वरूपात लिहले आहेत. अजुन त्यातल्या प्रत्येकाच्या ब-याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यांच्या मते आयुष्यातल्या कटू अनुभवांना फाटा देऊन क्रेडिट देणारे आनंदाचे क्षणच या पुस्तकात भुर्कें यांनी टिपले आहेत. माणूस शिकतो ते दुःखात ते अनुभवही वाचकांना वाचायला आवडतील. त्यांच्या या मैफलीत केवळ आनंद भारलाय. साताराहून पुण्यात आलेला हा लेखक या रुपाने वाचकांच्या हाती सातारी कंदी पेढाच देतो आहे ही भावना आपल्या मनाला स्पर्शून गेली, असेही सोलापूरकर म्हणतात.

आपण जणू मित्रांशी गप्पा मारतोय अशा रसरशीतपणे जिवंत अनुभव देत त्यांचे लेखन झाल्याचे संगीतकार आनंद मोडक सांगतात. एकदा पुस्तक वाचायला घेतल्यावर ते आणखी वाचावे असे वाटते. ज्ञान सतत मिळवत रहाणे, सातत्याने विद्यार्थीपण जपत रहाणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. भुर्के जसे जगले ते विलक्षण आहे. तेही निष्ठेने. यात लेखक, वाचक, रसिक आणि सामाजिक भान सर्वांचा प्रत्यय येतो. साहित्य ही तुमची आमची भूक आहे. त्यातल्या अनुभवावरच आयुष्य उलघडत जाते. भुर्के यांचे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टी देईल, असा विश्वास मोडक यांनी व्यक्त केला.

श्याम भुर्के यांच्या मते सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलने मराठी साहित्याचा ओढा आपल्या मनात लहानपणी निर्माण केला. शाळेतल्या विविध उपक्रमातून भाग घेऊन बळ आले. तेच बळ घेऊन पुण्याला आलो. बॅंक ऑफ महाराष्ट्रने समृध्द जिवन घडविले. त्यातूनच आलेल्या अनुभवांतून ह्या ६० वयापर्यतच्या आठवणी...एका अर्थाने आत्मवृत्त आनंदाचे पासबूक या पुस्तकातून लिहण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे ते सांगतात.
मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनिल मेहता यांनी भुर्केयांच्या पुस्तकाचे वेगळेपण सांगितले.
तर अक्षरधाराचे लक्ष्मण राठीवडकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष इनामदार यांनी केले होते.