Friday, October 7, 2011

चाय, चाय...



रेल्वेचा आवाज आणि शिट्ट्या यांचा सहवास लाभलेल्या जंक्शनचे नागरी प्रवास वर्णन

भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानके जीवनाच्या स्वादापासून पूर्ण भिन्न असतात. रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जिवन जाणून घण्यासाठी लेखक विश्वनाथ घोष मुद्दाम ह्या शहरात फिरले......
`बळी तो कान पिळी` ह्या उक्तीच्या अगदी विरुध्द वर्तणुकीचा प्रारंभ होतो, तो मध्यप्रदेशातील इटारसी ह्या मोठ्या रेल्वे जंक्शनपासून. उत्तर व दक्षिण भारताला भौगोलिक पातळीवर वेगळे करणा-या विंध्य पर्वताच्या कुशीत हे चिमुकले शहर वसलेले आहे. बहुतेक रेल्वे गाड्या इटारसीला थोडा वेळ जास्त थांबतात. इथे मी दोन आलू बोंडे विकत घेतले, ते हिरव्या मिरचीबरोबर कागदात बांधून दिले जातात. चमचमीत उत्तर भारतीय पदार्थ चाखण्याची ही माझी शेवटची संधी होती. दुस-या दिवशी सकाळपासून बोड्यांपासून सगळे पदार्थ दक्षिण भारतीय शैलीचे असणार होते. मी फलाटावर उभा राहुन आलू बोंड्यांचा आस्वाद घेत होतो. तेव्हा येणा-या, जाणा-या , उशीर झालेल्या किंवा होणा-या रेल्वे गाड्यांची घोषणा करणारा स्त्रीचा आवाज माझ्या कानावर पडत होता: बोंडे संपवायला मला जो काही क्षणांचा वेळ लागला, तेवढ्या वेळात मी भारताच्या कानाकोप-यातील बहुतांशी स्थानकांची नावे ऐकली- अमृतसर, मुंबई, गुवाहाटी, त्रिवेंद्रम, हावरा, मद्रास. थोडक्यात सांगायचे तर देशाच्या एका कोप-यापासून दुस-या कोप-यापर्यंत प्रवास करणा-या प्रतेकाला `इटारसी` हे स्थानक मध्ये लागणार होते. मग ते मुंबई-कोलकत्ता असो, दिल्ली-मद्रास असो, कोची-गुवाहाटी असो किंवा अगदी अहमदाबाद-हैद्राबाद असो. इटारसीचे रेल्वे नकाशावरचे पद इतके अढळ अणि महत्वाचे आहे की, जर कुणी इटारसी स्टेशनचे रेल्वे रुळ उडवून लावले तर सगळ्या देशामध्ये अनेक दिवस गोंधळ माजेल आणि संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत होईल. पण तरीही भारताच्या राजकीय नकाशावर मात्र इटारसीला काहीही अस्तित्व नाही.
इटारसी मध्ये काम करणारी व्यक्ती तुम्हाला क्वचितच भेटेल. इटारसीच्या पत्त्यावर तुम्ही पत्र टाकण्याची शक्यता नाही. इटारसी हे फक्त रेल्वे स्थानक आहे. जिथे तुम्ही चहा प्यायला किंवा थोडे फार खायला उतरता आणि पुढच्या प्रवासाला लागता. परंतु ज्या शहरातून दर क्षणाला वेगवेगळ्या संस्कृतिचे आणि पंरपरेचे लोक पुढे जातात, ते शहर रेल्वे स्थानकाबाहेर कसे दिसत असेल?
अशाच प्रकारे मुघल सराईच्या उल्लेखामुळे एखाद्या बंगाली किंवा बिहारी माणसाच्या मनात केवळ एका गजबजलेल्या रेल्वे फलाटाची प्रतिमा उभी राहिल. तसेच दक्षिणेमध्ये नियमित प्रवास करणा-या एखाद्या तामीळ किंवा मल्याळी व्यक्तिच्या बाबतीत जोलारपेटमुळे होईल.
ह्या शहरांची इतर गजबजलेल्या शहरांप्रमाणे कल्पना करणे, ह्या लोकांना अशक्य वाटेल. ह्या शहरातील लोकांचा सुध्दा इतर शहरातील लोकांप्रमाणेच रोजचा दिनक्रम असेल अशी कल्पनाच करता येणार नाही. कारण ही स्थळे म्हणजे त्यांच्या मुक्कामाची स्थळे कधीच नसतात. तर ती मुक्कामाच्या स्थळी पोचण्याच्या मार्गाचा केवळ एक भाग असतात.
मग रेल्वे कंपार्टमेंटच्या दारात उभे राहून `चाय, चाय.`..ओरडणा-या चहावाल्याची वाट बघत उभे रहाण्यापेक्षा गंमत म्हणून या स्थळांना भेट द्यायला काय हरकत आहे ? ती स्थळे सुध्दा त्यांच्या कथा ऐकायला कोणीतरी यावे म्हणून कदाचित वाट बघत असतील......

बिश्वनाथ घोष
अनुवाद- पूर्णिमा कुंडेटकर
पृष्टे- १६६
किंमत- १५० रुपये