Monday, January 24, 2011

मोठ्या मनाचे स्वरभास्कर


बाजीराव रोड पुणे शाखेत असताना एक दिवस संगीतप्रेमी विजय दीक्षित यांचा फोन आला.
भीमसेन जोशींना वीस हजार रुपयाचं कर्ज बँकेकडून हवं आहे. अट एकच आहे.
आत्ता त्वरित हवंय.
देतो. बँकेत या. तुम्ही या कर्जाला जामीनदार राहा.
ठीक आहे. अध्र्या तासात पोहोचतो.
अर्जदार नामवंत होते. त्यांना कर्ज देणं हे त्यांना सेवा देण्याची बँकेला
मिळालेली संधीच होती. अशा वेळी मन दोन प्रकारे विचार करीत होतं.
एक म्हणजे कर्जाविषयी फारसं बोलणं हे या महान व्यक्तिमत्त्वाच्याबाबतीत
बरं दिसणार नाही. तेव्हा आपण प्रत्यक्षात त्यांना कर्जाचे कारण, परतफेड
कालावधी असले काहीही विचारायचे नाही. कर्ज हा विषयच काढायचा नाही.
सन्मानाने पौसे सुपूर्त करायचे.
दुसरं व्यवहारी मन सांगत होतं. अर्जामध्ये कर्जाचे कारण काय लिहिणार?
मग वौयक्तिक कारण लिहायचं ठरवलं. कागदपत्रात फक्त प्रॉमिसरी नोट घ्यायची
व कोणतेही तारण घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. माझ्या मंजुरी अधिकारात
एकाच्या सहीनं हे कर्ज देता येत नव्हतं. त्यासाठी दीक्षित यांना जामीनदार
म्हणून घेतलं. सर्व कागदपत्रे तयार ठेवली. कॅशिअरना रु. 20,000च्या
कोर्या नोटा घेऊन माझ्या केबिनमध्ये बोलवलं. एक गुलाब मागवून घेतला.
स्वरभास्कर शाखेत येणार यामुळे आम्हा कर्मचार्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
निर्माण झालं होतं.
स्वरभास्कर भीमसेन जोशी केबिनमध्ये आले. मी उभं राहून त्यांना अभिवादन
केलं. त्यांना बसण्याची विनंती केली. ते बसताच मी व कॅशिअरने मिळून
रु.20,000च्या कोर्या नोटा असलेले बंद पाकीट व गुलाब त्यांना दिले.
त्यांनी ते स्वीकारले. मी चहा मागविला होताच. तो येईपय|त अगदी मोजक्या
अशा कागदपत्रांवर सह्या घेऊन टाकल्या. बँकेच्या आठवणी, सवाई गंधर्व
महोत्सव अशा विषयांवर बोलणं झालं. कोठेही कर्जाबद्दल विषयही काढला नाही.
चहापानानंतर स्वरभास्कर गेले.
एका महान व्यक्तिमत्त्वाला सेवा दिल्याचा आनंद मला मिळाला. थोड्याच वेळात
आमच्या हेड आॅफिसमधून फोन आला. बँकेचे जनरल मॅनेजर ही. बी. गांधीसाहेब
बोलणार होते. काही काम करायचे राहिले की साधारणत: त्यांचा फोन यायचा.
थोड्याशा विवंचनेतच फोन घेतला. आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं अभिनंदन
करण्यासाठी फोन केला होता. माननीय भीमसेन जोशी यांनी गांधीसाहेबांना फोन
करून बँकेत उत्कृष्ट सेवा मिळाल्याचं सांगितलं होतं.
भीमसेन जोशींकडून झालेलं कौतुक सदैव स्मरणात राहील.
वेळेपूर्वीच कर्जाची परतफेड झाली होती. बँकेने वौयक्तिक कर्ज देण्याचे
अधिकार दिलेले असल्यामुळे अशी सेवा देता आली.
मी केवळ उत्सुकता म्हणून हे पैसे कशासाठी घेतले याची माहिती मिळविली.
भीमसेनजींना चांगल्या गाड्या वापरायला आवडत. ते स्वत: कौशल्यानं गाडी
चालवत. ते विलंबित रागात गाणारे असले तरी गाडी मात्र द्रुतगतीनं चालवत.
गाड्यांची देखभाल व्यवस्थित होते ना हे पाहण्यास स्वत: मोटर गॅरेजमध्ये
जात. त्यामुळे गॅरेजमधील मेकॅनिक मंडळींमध्ये त्यांच्याबद्दल आदर होता.
या मेकॅनिक लोकांना बक्षिसी म्हणून ती रक्कम त्यांनी दिली होती.
केवढ्या मोठ्या मनाचं हे व्यक्तिमत्त्व!


श्याम भुर्के, पुणे


(श्याम भुर्के यांच्या `आनंदाचे पासबुक` या मेहता पुब्लीशिंग हाउसने
प्रकाशित कलेल्या पुस्तकातून )