Saturday, May 12, 2012

डोहातील सावल्या


पावसाचा महिमा लहानपणापासून आम्ही ऐकला. या देशातल्या माणसाइतका आणखी कुणाला तो कळला असेल की नाही, माला माहित नाही. आमचे सगळे जगणेच पावसावर अवलंबून असते. `इथं..इथं.. बेस रे मोरा.. ` किंवा, `एक होती चिऊ, एक होता काऊ..` प्रमाणे `ये रे ये रे पावसा..` हे गाणे बालपणीच आपल्याला पाठ होते. पावसाने यावे म्हणून त्याला पैसा देण्याचे अमिष दाखवायचे ( ते सुध्दा खोडकर खोटे.) आणि मग मोठा पाऊस आला की नाचायचे, तर बायकांनी जात्यावर ओव्या म्हणायच्या –
पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा,
पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा..
पावसाबद्दाल एवढा भक्तिभाव का, तर `पर्जन्यात् अन्नसंभवः,`... मुख्य हे की काळी पिकली पाहिजे.
माणूस हा देवपूत्र कसला, ते निसर्गपुत्रच. दुष्काळी मुलखातल्या लहानश्या गावातच बालपण गेले म्हणजे पावसाचा मोठेपणा जास्त कळतो.
काळेनिळे ढग आकाशात जमून कसा गडगडडात होतो..वीजबाई कोसळू नये म्हणून मग घाईगडबडीने अंगणात पहारी टाकायच्या.
धो-धो पाऊ, कोसळला आणि रस्त्यारस्त्यांवर गढूळ तांबड्या पाण्याचे लोट वाहू लागले की.. `अगाबाबा, मायंदाळ पानी आदाळलं आज.. `म्हणून ओढा बघायला धावायचं.
काळा-पांढरी माती भिजून कसा घमघमाट सुटतो.. गुरेवासरे कशी आखडत्या अंगाने उभी राहतात..कोंबड्या फूगुन आडोशाला बसतात.. भिजलेल्या शेरडाकरडांचा वास झोपड्यातून पसरतो. लगेच चार दिवसात नाही तथे नवे-नवे कोंब तरारून येतात. कधी कुठे पडलेला चिंचोका फूटून त्यातून कोंब, कुठे जांभळाचे बी पडले त्यातून कोंब! लिंबोल्यातून, दामुक्यातून रोपे तरारतात. एरवी केराचे डोंगर वाटणा-या उकिरड्यावर कसले-कसले वेल पसरु लागतात. बघता-बघता सगळी धरणी तर हिरवीगार होतेच, पण घराची माळवदे व छपरे सुध्दा पोपटी दिसू लागतात. पावसानंतरची ही दुनिया म्हणजे चमत्काराच असतो.

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८०
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे,२०१२

काळी आई




जेव्हा मला बघितले, माझ्या आईला मला पाजताना पाहिले, तेव्हा गुणा आईला कसनुसे वाटले.
कधी नाही ते आपल्या हातून घडावे, असे वाटले.
तो तिच्यात कधी नव्हते, ते एकाएकी उफाळून आले.
तिचे स्त्रीत्व झडझडून उठले आणि त्या नव्या अनुभूतीने माझी गुणा आई फार बेचैन झाली;
पण आता फार उशीर झाला होता.
मग एके दिवशी तिने काही ठरविले आणि आठ दिवस काही न खाता-पिता, न बोलता ती रानातल्या झोपडीत पडून राहिली.
विहिरीत पडून किंवा अन्य मार्गाने मरुन तिने माझ्या बापाला आणि गावाला धोक्यात आणले नाही.
सांगून-सवरुन ती शांतपणे रानातल्या झोपडीत राहिली आणि मरुन गेली....

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२८
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
आठवी आवृत्ती- मे २०१२

वाघाच्या मागावर




मुळशी धरणावर एक भेकर जीपपुढून आडवे पळत गेले. क्षणार्धात मी बार टाकला. माझे बागाईतदार मित्र निंबाळकर जीपखाली उतरुन भेकर घेऊन आले आणि म्हणाले, अरारा! भाऊसाब, गर्भिणी हाये हो!.

कोथरुडला निंबाळकरांच्या बागेत आम्ही भेकर सोलत असताना पुरी वाढ झालेले पोर तिच्या पोटातून बाहेर काढलेले पाहून निंबाळकरांची म्हातारी कळवळून म्हणाली, अरं लेकरानू, का सराप घेतला रे हा!
पण अशा प्रसंगामुळे बंदूक टाकून मी दुर्बीण घेतली, असे म्हणता येणार नाही. अवखळ असे वय सोडले , तर कोणता चांगला माणूस जिवंत पाहण्याचा अधिकार असलेल्या कोणा वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील ..?

लेखक-व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १७६
किंमत- १८० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे २०१२



माझे सन्मित्र जयंतराव टिळक यांच्या सोबतीने मी सिंहगडाच्या जंगलात भटकलो. मुळशी धरणापलीकडचे जंगल हिंडलो. पुण्याच्या परिसरातले डोंगर वेंधलो. कर्नाटकातल्या दड्डीकेरी, कोंडणकेरी, गुंजावती, मासूर ह्या राखीव जंगलात शिकारी केल्या आणि मुख्य म्हणजे जंगल पाहिले!... निसर्गाचा हा आदिअंत नसलेला विशाल ग्रंथ मी पाहिला आणि त्यातली चार अक्षरे मला ओळखता येऊ लागली.
ही अक्षरओळख झाली आणि लवकरच पशू-पक्षी मारण्यातला आनंद नाहीसा झाला. त्यांच्याविषयीचे कुतूहल, जिव्हाळा एवढेच उरले. बंदुकीऐवजी दुर्बीण आणि रेखनचित्राची वही घेऊन रानात जाणे मला जास्ती आनंदाचे वाटू लागले. मला वाटते, हरेक सुसंस्कृत शिकारी ह्याच इयत्ता चढत पदवीपर्यंत जातो. आता मी शपथपूर्वक सांगू शकेन की, समोर कांचनमृगांचा डौलदार कळप बघतितल्यावर मला घरी टांगलेल्या बंदुकीची आठवणसुद्दा होत नाही....

वाळूचा किल्ला


वाळूच्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगूर असतं, पण एका चिमुरडीसाठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते...
हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक क्रौर्य आहे...
अनिकेतला कळून चुकलं की, आता काही घडणार नाही;
आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक..सगळं सारखचं....
पहिलवान गड्यांनाही न जुमानता एका खोंडापुढे तेरा वर्षाची लिलू धिटाईनं उभी राहिली,
त्या दोघांमधलं नातं खास होतं..
एका राजाला व्याधीमुक्तीसाठी वैद्याच्या औषधापेंक्षाही एक `धक्का` रामबाण उपाय ठरला...
`वाळुच्या किल्ल्यां`सारखा असणारी मानवी भावभावनांचा हा बंध...
आपल्या सजग वेखणूतुन `तात्यांनी` साकारला आहे...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८४
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती, मे २०१२

वाटा


आजकालच्या प्रवासात अनेक `वाटा` तुडवाव्या लागल्या.
...फार लवकर घराबाहेर पडलो. सोळाव्या वर्षीच या `वाटा` संपल्या आणि मी दिशाहिन भरकटत राहिलो.
पाय नेतील ती वाट,असा प्रकार झाला. सोबत नाहीच.
...इतकी वर्षे झाली, पण अजूनही पायाखाली मळलेली वाट आहे, असा भरवसा नाही.
हीच का `वाट` , असा सारखा संशय!
..तशाच जीवनातील अनेक `वाटा` चोखून पाहाव्यात !

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १००
किंमत- ११० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सहावी आवृती, मे २०१२

गोष्टी घराकडील



वर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो,
तसाच पारावर निंब आहे.
त्याला तरणा कोणी पाहिला असेल का, याची मला शंका आहे.
प्रचंड बुंधा असलेला आणि गुरवाच्या म्हातारीप्रमाणे अंगावर लहान-लहान आवाळे असलेला निंब आपला आहे तसा आहे. निबांचे म्हातारपण एका विशिष्ट जागी येऊन थांबलेच आहे.
चैत्रमासात पुन्हा चमत्कार होतो.
म्हाता-या निंबात पोपटी रंगाची पालवी चहू अंगानी उसळ्या घेऊ लागते.
तिच्या रुपाचा अगदी उजेड पडतो.
उन्हात तगमग होऊ लागली की, पारावर येऊन बसावे-
वाळ्याचे पडदे चहूबाजूंनी सोडले आहेत असे वाटते.


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १०४
किंमत- ११० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती मे २०१२


बाळपण संपले. चांगले कळू लागले. नोकरी करण्यासाठी, शिक्षणासाठी सगळे जण कुठे कुठे फुटले, तरी या वेड्यावाकड्या घराविषयीचे प्रेम कमी झाले नाही. वर्षातून एकदा आम्ही सारी भावंडे गावी एकत्र जमत असू. पसारा एवढा झालेला असे तरी, एवढे घरही गजबजून जाई. मग चांदण्या रात्री अंगणात लिंबाचा गार वारा घेत सर्वांनी बसावे, वडिलांनी रसाळ गोष्टी सांगाव्यात, सकाळी नव्या सोप्यात न्याहरी करीत बाळपण आठवावे, दुपारी बाजानानांनी वाढविलेल्या लिंबावरच्या साळुंक्यांचे मंजूळ बोलणे ऐकत डुलकी घ्यावी, संध्याकाळी दिवस कलल्यावर माळवदावर चढून मावळतीचे झगमगते रंग पहावेत.

ती सांदाडी बालपणी होती, तशीच पुढेही होती. जिज्ञासा आणि भिती गेली, तरीही त्या काळच्या आठवणींमुळे ती प्रिय वाटे. पुर्वी मला मोठा वाटणार सोपा आमची उंची वाढल्यामुळे आतका बुटका वाटे. तरी तुळ्यांवरुन त्याकाळी खडूने लिहिलेली ती वचने वाचून कशा गुदगुल्या होत. आम्ही तिघाही भांवंडाची अक्षरे तिथे होती. `अहिंसा परमो धर्मः`, सत्यमेव जयते, `यदा यदाही धर्मस्य` हा गीतेतील सगळा श्लोक... असे कितीतरी बोधसाहित्य आम्ही तिथे श्रध्देने उतरवून ठेवले होते.
रात्री अजूनही आई करुणाष्टके म्हणत जुन्या सोप्यात बसे. ती अंथरुणात पडल्या-पडल्या ऐकली की, ``रघुपति मति माझी आपलीशी करावी`, असे म्हणत आपणही तिच्या शेजारी बसावे वाटे.

पहाटे उठून वडील जेल्हा `उठा उठा हो सकळीक` ही भूपाळी म्हणत, तेव्हा अंथरुणावर पडायची लाज वाटून अंगण साफ करण्याचा हुरुप येई. तो सकाळचा सडा, ती जात्यावरची गाणी, ते पहाटोचे शेकणे या गोष्टींना काही आगळेच सोंदर्य येई.
त्या घरात असणे म्हणजे बाळपणात फिरुन असणे, प्रत्येक वस्तुवर पडलेल्या आजोबांच्या छायेविषयी भीततियुक्त आदर बाळगणे, बाजीनानांचे पाढरे केस पाहणे, वेड्या आजीच्या कुशीत झोपणे!


( `गोष्टी घराकडील`..कथेतली हा उतारा...नक्कीच ते भारलेपण देईल)

Thursday, May 10, 2012

गावाकडच्या गोष्टी





गोष्ट जेव्हा स्फुरते, तेव्हा ती आपला आकार घऊनच येते...

पण हे नंहमीच होते असे नाही. काही वेळा कथेचे एखादे लहान बीज मनात येऊन पडते- पिंपळाच्या बीजासारखे. अशी बीजे नेहमीच पडत असतात; पण त्यातले गवताचे कोणते आणि पिंपळाचे कोणते, हे मात्र कळते. नेमके कळत नाह;: पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो, त्याच्या पानांची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते.
एकदा माझा मित्र म्हणाला, “मला एक कल्पना सुचली आहे. तिचा काही उपयोग होतो का तुला ते पहा”;
एका लहान खेडेगावात नव्याने मोटार-सर्व्हिस सुरु होते आणि त्यामुळेच त्या गावाचे पूर्वीचे जीवन बदलून जाते.
त्याने एवढेच सांगितले आणि माझ्या मनात एक बीज पडले.
सारं काही अंधूक होते;अश्वत्थाची भयंकर सळसळ मला किती तरी दिवस ऐकू येत होती. त्या सळसळीनं मला झपाटून टाकले होते, त्यातूनच `सर्व्हिस मोटार` या कथेचा जन्म झाला.
कथानकाचे हे बीज मी पुण्यात असताना मिळाले. पण त्याला योग्य माती माझ्याकडे आली, ती माझ्या स्वतःच्या खेड्यातली. हा सारा प्रकार माझ्या गावीच झाला, असे मला वाटू लागले. मग ती मोटार सुटली आणि माझ्या गावात शिरुन माणसे घेण्यासाटी उभी राहिली, ती कुंभाराच्या घरापुढे. वास्तवात ती तिथेच उभी होती. माझे काम पुष्कळ सोपे झाले. गावचा थोराड आणि बुटका कुंभार मला म्हणाला, `या मोटारीनं माझं वाटोळं केले!`.
कुंभाराचा पोरगा आपल्या छातीचे डबरे दाखवित पुढे येऊन म्हणाला, `ह्या म्हता-याला काही काळत नाही.`
इथपर्यंत बरे जमले. त्या दोघांचे म्हणणे मला पटले पण पुढे काय ? वाटोळे कसे झाले? गाव कसे नासले?
- तिसरा माणूस पुढे येईना. त्याला बराच वेळ शोधत बसावे लागले.
- आणि मग एकदा मोटारीच्या ड्रायव्हरने वाकड्या नजरेनं कुंभाराच्या सुनेकडे पाहिले; आणि तसे पाहताना मी नेमके त्याला हेरले.
- तिसरा माणूस सापडला.
- इथपर्य़त विचार झाला आणि लिहायला बसलो. माणसे सापडली होती, ती कशी आहेत. हे ही ठाऊक होते. आता पुढची गोष्ट स्वतःच करणार होती. त्यांना आता माझे हुकूम नको होते.

माझा असा अनुभव आहे की, सुरवातीपासून शेवटपर्य़ंत कथा मनात अशी तयार होतच नाही. प्रत्यक्ष लिहिता-लिहिता ती तयार होते. पात्रे स्वतः सगळे आपणहून करतात. फक्त ती तशी करतील असा विश्वास तेवढा आपल्याला असतो. काही अविश्वासू पात्रे आपल्याला दगाही देतात. ती काही करीत नाहीत किंवा बळबळेच काही करतात आणि त्यांनी बळेच खोटे केले आहे ते कळते.


(`माझ्या लिखाणामागची कळसूत्रे`या पुस्तकासाठी लिहलेल्या प्रस्तावनेतला हा भाग)

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२२
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठ व माडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दहावी आवृत्ती मे २०१२

वारी



लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११०
किंमत- १२० रुपये.
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे २०१२



अर्जुना पंढरीची वारी करुन पुन्हा आपल्या खोपटात आला होता,
...पण पांड़ुरंगाचं दर्शन न घेताच.
जंगलातल्या वाटेवरील वाटसरु चा कर्दनकाळ ठरणारा भाल्या धनगर,..
पण एका जिगरबाज फौजदाराच्या हाती लागला.
तळ्यामुळे गावचा विकास झाला, सरकारने नुकसान भरपाई दिली,..
पण गावाचं सगळं गेलं.
उमा रामोशाने दुष्काळातही गाईचा सांभाळ केला,..
पण दारुच्या नशेत त्याच्या हातून पाप घडलं.
वीस वर्षे जे कुटुंबाचे दुःख होतते, तेच त्या बहिणाचेही द्ख होते,
..पण आज एकाएकी ती श्रीमंत झाली होती.
रेल्वेतनं येताना एका आंधळ्याची सोबत होती,
..पण तरीही मंजुळा घरी पोहोचनी नाही.
जन्मगाठीच्या बंधनात अडकण्यास रंगनाथ तयार झाला होती, .
.पण त्याने जन्मात लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

अर्जुन, भाल्या, उमाजी, भालू, मंजुळापासून..रंगनाथपर्यत `वारी`तील वारक-यांचा हा जीवनप्रवास..

Tuesday, May 8, 2012

हस्ताचा पाऊस




कधीकधी मी फार निरुत्साही होतो. खडकावर बेडके बसून राहावीत तशा लेखनकल्पना मनातच राहतात.
आपण एक-एक म्हणता अनेक ओझी डोक्यावर घेऊन चालतो आहोत. अशी जाण मध्येच येते.
सर्वात प्रथम लेखन, बाकी सर्व दुय्यम. त्याच्या वाटेत येणारी कोणतीही गोष्ट घट्ट मनाने बाजूला केली पाहिजे; पण तसे सामर्थ्य नसते आणि आपणच आपल्या शक्ती नासवून टाकतो.
असा विचार मनात येतो, लेखक म्हणून आजवर जे मिळविले ते मोठे आहे, असे मला मनोमनी कधी वाटत नाही. तसे वाटले असते, तरी एका परिने बरे होते.
भाबड्याला मिळते ती शांतता तरी मिळाली असती. मध्येच कधी मन उसळी मारते. उडी घेऊ वाटते. काय घडेल ते खरे!

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १०४
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ, मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सातवी आवृत्ती- मे २०१२


प्रसंगाने माणूस धीट बनतो तशी जनावरेहही बनतात का? काय असेल ते असो! रान तुडवीत गावापासून थोडेफार लांब आल्यावर एकमेकांच्या पायातले कळाव त्यांनी कुरतडून तोडून टाकले आणि मग मोकळ्या पायांनी ती सुसाट निघाली. पाय नेतील तेकडे जाऊ लागली. नीट वाटेने गेले, तर तपास काढणा-यांना माग लागायची भीती होती; आणि जाण्याचे गावच ठरले नव्हते, तर वाटेतचा विचार तरी कशाला?
ओढे, ओहळ,. टेकड, लवण ओलांडून ती जाऊ लागली. मोकळ्या रानातला गार वारा अंगाला थटत होता, तो सोसाट्याने वाहू लागला. वावटळे उठू लागली. धुळीला आणि त्या सोसाट वा-याला न जुमानता ती चालतच होती. चांदण्याने उजळळेल्या आभाळात एक-एक काळा ढग गोळा होऊ लागला. बघता-बघता सारे आभाळ काळेकभिन्न झाले. विजा चमकू लागल्या, आभाळ गर्जू लागले, पावसाने फळी धरली. हस्ताचा पाऊस धो-धो कासळू लागला.



( `हस्ताचा पाऊस` या कथेतून)

पुढचं पाऊल




देवडीच्या देवी महाराच्या पोरानं तराळकीचं काम करायला नकार देऊन:
जातीव्यवस्थेनं लादलेलं `जू` झुगारून दिलं...
अन् आपल्या स्वप्नांच्या शोधात त्यानं मुंबई गाठली..
पोरानं जातीचा बट्टा लावला म्हणून, देवा महारानं हाय खाल्ली..
तर, आपला बाप, आपली बायका-मुलं, धाकटा भाऊ यांच्या मायेचे पाश तोडून,
कृष्णा त्या स्वप्ननगरीत दाखला झाला...

त्या मायावी नगरीत त्याला आपली वाट सापडली का?
आपले स्वप्न तो साकारु शकला का?
या सर्वांचा भावोत्कट मागोवा म्हणजेच..`पुढचं पाऊल!.`...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठै- १०८
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे २०१२



गावओढ्याच्या काठावर महारवाडा पसरला होता. ओबडधोबड खोपटं पडवळ, घोसावळ्याचे वेल पांघरून उभी होती. कुठं एखादं शेवग्याचे शेलाटं झाड हालत होतं, कुठे एकादा लिंबारा तरारला होता. वाटेवर वाहणा-या सांडपाण्यात मुस्कट बुचकळत डुकरं हिडत होती.. चमत्कारिक आवाजात ओरडत होती.
काळ्या बे-या कोंबड्या हवेला लाथा देत खुराड्याकडे पळत होत्या, केसात शिरुन डसणा-या गोमाशांमुळे वैतागलेली कुत्री धुळीत लोळण घेत होती, महारांची नागडी उघडी पोरं खेळत होती, भांडत होती, रडत होती आणि एकमेकांना शिव्या घालत होती. खोपटाच्या दारात बसून तान्ह्या पोराला पाजता पाजता कुणी लेकुरवाळी शेजारणीशी बोलत होती. एखादा खवीस म्हतारा सुनेवर तोंड टाकत होता. एखादी बया आंगणात बसून सर्पणासठी काटेरी फांजर मोडता माडता आपल्या मवाळ नव-याच्या नावानं कोकलत होती. दिवस बुडाला होता, झांजड पडत होती आणि दुपारी निवांत असेला महारवाडा हलू- बोलू लागला होता....



(पुस्तकाच्या आरंभीच महारवाड्याचे चित्र शब्दात मांडणारा माडगूळकर शेलीचा हा नमूना)

करुणाष्टक






ही आहे एक कुटुंबकहाणी..
दादा, आई, सहा मुलं आणि दोन मुली यांची..
आईचा कडक स्वभाव आणि फाडफाड बोलणं.. यामुळे दादा तिला म्हणायचे `फौजदार..`
पण सगळ्या कुंटुंबाला सावली देणारं घर जळालं. दादा खचले, वारले आणि आई अबोल झाली.
स्वतःच्या संसारात अलिप्तासारखी वागू लागली.

मुलं मोठी होत होती.
या मुलांच्या रुपाने आईपुढे आठ समस्या उभ्या राहिल्या.
जणू ही आठ मुलं म्हणजे नियतीनं आईला घालून ठेवलेली आठ कोडी.
हेच तिचं करुणाष्टक..

खऱं म्हणजे कोणत्याही आईचं.
कारण, वाट चालताना ओझं वागवणं हे स्त्रीच्या भाळी अगदी इतिहासपूर्व काळापासून आलेलं आहे.
तेव्हापासून आपल्या स्त्रीत्वाला आलेलं फळ-मूळ हे सुद्दा आईला ओझचं हाऊन राहिलं असले पाहिजे....


लेखक- व्यकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२८
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठालरील चित्र- व्यंकटेश माडगूळकर
मुखपृष्ठावरील अक्षरे,मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सातवी आवृत्ती मे २०१२