Saturday, May 12, 2012

वाघाच्या मागावर




मुळशी धरणावर एक भेकर जीपपुढून आडवे पळत गेले. क्षणार्धात मी बार टाकला. माझे बागाईतदार मित्र निंबाळकर जीपखाली उतरुन भेकर घेऊन आले आणि म्हणाले, अरारा! भाऊसाब, गर्भिणी हाये हो!.

कोथरुडला निंबाळकरांच्या बागेत आम्ही भेकर सोलत असताना पुरी वाढ झालेले पोर तिच्या पोटातून बाहेर काढलेले पाहून निंबाळकरांची म्हातारी कळवळून म्हणाली, अरं लेकरानू, का सराप घेतला रे हा!
पण अशा प्रसंगामुळे बंदूक टाकून मी दुर्बीण घेतली, असे म्हणता येणार नाही. अवखळ असे वय सोडले , तर कोणता चांगला माणूस जिवंत पाहण्याचा अधिकार असलेल्या कोणा वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील ..?

लेखक-व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १७६
किंमत- १८० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे २०१२



माझे सन्मित्र जयंतराव टिळक यांच्या सोबतीने मी सिंहगडाच्या जंगलात भटकलो. मुळशी धरणापलीकडचे जंगल हिंडलो. पुण्याच्या परिसरातले डोंगर वेंधलो. कर्नाटकातल्या दड्डीकेरी, कोंडणकेरी, गुंजावती, मासूर ह्या राखीव जंगलात शिकारी केल्या आणि मुख्य म्हणजे जंगल पाहिले!... निसर्गाचा हा आदिअंत नसलेला विशाल ग्रंथ मी पाहिला आणि त्यातली चार अक्षरे मला ओळखता येऊ लागली.
ही अक्षरओळख झाली आणि लवकरच पशू-पक्षी मारण्यातला आनंद नाहीसा झाला. त्यांच्याविषयीचे कुतूहल, जिव्हाळा एवढेच उरले. बंदुकीऐवजी दुर्बीण आणि रेखनचित्राची वही घेऊन रानात जाणे मला जास्ती आनंदाचे वाटू लागले. मला वाटते, हरेक सुसंस्कृत शिकारी ह्याच इयत्ता चढत पदवीपर्यंत जातो. आता मी शपथपूर्वक सांगू शकेन की, समोर कांचनमृगांचा डौलदार कळप बघतितल्यावर मला घरी टांगलेल्या बंदुकीची आठवणसुद्दा होत नाही....

No comments:

Post a Comment