Thursday, May 10, 2012

गावाकडच्या गोष्टी





गोष्ट जेव्हा स्फुरते, तेव्हा ती आपला आकार घऊनच येते...

पण हे नंहमीच होते असे नाही. काही वेळा कथेचे एखादे लहान बीज मनात येऊन पडते- पिंपळाच्या बीजासारखे. अशी बीजे नेहमीच पडत असतात; पण त्यातले गवताचे कोणते आणि पिंपळाचे कोणते, हे मात्र कळते. नेमके कळत नाह;: पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो, त्याच्या पानांची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते.
एकदा माझा मित्र म्हणाला, “मला एक कल्पना सुचली आहे. तिचा काही उपयोग होतो का तुला ते पहा”;
एका लहान खेडेगावात नव्याने मोटार-सर्व्हिस सुरु होते आणि त्यामुळेच त्या गावाचे पूर्वीचे जीवन बदलून जाते.
त्याने एवढेच सांगितले आणि माझ्या मनात एक बीज पडले.
सारं काही अंधूक होते;अश्वत्थाची भयंकर सळसळ मला किती तरी दिवस ऐकू येत होती. त्या सळसळीनं मला झपाटून टाकले होते, त्यातूनच `सर्व्हिस मोटार` या कथेचा जन्म झाला.
कथानकाचे हे बीज मी पुण्यात असताना मिळाले. पण त्याला योग्य माती माझ्याकडे आली, ती माझ्या स्वतःच्या खेड्यातली. हा सारा प्रकार माझ्या गावीच झाला, असे मला वाटू लागले. मग ती मोटार सुटली आणि माझ्या गावात शिरुन माणसे घेण्यासाटी उभी राहिली, ती कुंभाराच्या घरापुढे. वास्तवात ती तिथेच उभी होती. माझे काम पुष्कळ सोपे झाले. गावचा थोराड आणि बुटका कुंभार मला म्हणाला, `या मोटारीनं माझं वाटोळं केले!`.
कुंभाराचा पोरगा आपल्या छातीचे डबरे दाखवित पुढे येऊन म्हणाला, `ह्या म्हता-याला काही काळत नाही.`
इथपर्यंत बरे जमले. त्या दोघांचे म्हणणे मला पटले पण पुढे काय ? वाटोळे कसे झाले? गाव कसे नासले?
- तिसरा माणूस पुढे येईना. त्याला बराच वेळ शोधत बसावे लागले.
- आणि मग एकदा मोटारीच्या ड्रायव्हरने वाकड्या नजरेनं कुंभाराच्या सुनेकडे पाहिले; आणि तसे पाहताना मी नेमके त्याला हेरले.
- तिसरा माणूस सापडला.
- इथपर्य़त विचार झाला आणि लिहायला बसलो. माणसे सापडली होती, ती कशी आहेत. हे ही ठाऊक होते. आता पुढची गोष्ट स्वतःच करणार होती. त्यांना आता माझे हुकूम नको होते.

माझा असा अनुभव आहे की, सुरवातीपासून शेवटपर्य़ंत कथा मनात अशी तयार होतच नाही. प्रत्यक्ष लिहिता-लिहिता ती तयार होते. पात्रे स्वतः सगळे आपणहून करतात. फक्त ती तशी करतील असा विश्वास तेवढा आपल्याला असतो. काही अविश्वासू पात्रे आपल्याला दगाही देतात. ती काही करीत नाहीत किंवा बळबळेच काही करतात आणि त्यांनी बळेच खोटे केले आहे ते कळते.


(`माझ्या लिखाणामागची कळसूत्रे`या पुस्तकासाठी लिहलेल्या प्रस्तावनेतला हा भाग)

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२२
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठ व माडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दहावी आवृत्ती मे २०१२

No comments:

Post a Comment