Tuesday, May 8, 2012

हस्ताचा पाऊस




कधीकधी मी फार निरुत्साही होतो. खडकावर बेडके बसून राहावीत तशा लेखनकल्पना मनातच राहतात.
आपण एक-एक म्हणता अनेक ओझी डोक्यावर घेऊन चालतो आहोत. अशी जाण मध्येच येते.
सर्वात प्रथम लेखन, बाकी सर्व दुय्यम. त्याच्या वाटेत येणारी कोणतीही गोष्ट घट्ट मनाने बाजूला केली पाहिजे; पण तसे सामर्थ्य नसते आणि आपणच आपल्या शक्ती नासवून टाकतो.
असा विचार मनात येतो, लेखक म्हणून आजवर जे मिळविले ते मोठे आहे, असे मला मनोमनी कधी वाटत नाही. तसे वाटले असते, तरी एका परिने बरे होते.
भाबड्याला मिळते ती शांतता तरी मिळाली असती. मध्येच कधी मन उसळी मारते. उडी घेऊ वाटते. काय घडेल ते खरे!

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १०४
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ, मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सातवी आवृत्ती- मे २०१२


प्रसंगाने माणूस धीट बनतो तशी जनावरेहही बनतात का? काय असेल ते असो! रान तुडवीत गावापासून थोडेफार लांब आल्यावर एकमेकांच्या पायातले कळाव त्यांनी कुरतडून तोडून टाकले आणि मग मोकळ्या पायांनी ती सुसाट निघाली. पाय नेतील तेकडे जाऊ लागली. नीट वाटेने गेले, तर तपास काढणा-यांना माग लागायची भीती होती; आणि जाण्याचे गावच ठरले नव्हते, तर वाटेतचा विचार तरी कशाला?
ओढे, ओहळ,. टेकड, लवण ओलांडून ती जाऊ लागली. मोकळ्या रानातला गार वारा अंगाला थटत होता, तो सोसाट्याने वाहू लागला. वावटळे उठू लागली. धुळीला आणि त्या सोसाट वा-याला न जुमानता ती चालतच होती. चांदण्याने उजळळेल्या आभाळात एक-एक काळा ढग गोळा होऊ लागला. बघता-बघता सारे आभाळ काळेकभिन्न झाले. विजा चमकू लागल्या, आभाळ गर्जू लागले, पावसाने फळी धरली. हस्ताचा पाऊस धो-धो कासळू लागला.



( `हस्ताचा पाऊस` या कथेतून)

No comments:

Post a Comment