Saturday, May 12, 2012

गोष्टी घराकडील



वर्षानुवर्षे म्हातारीच असलेली माणसे आपण पाहतो,
तसाच पारावर निंब आहे.
त्याला तरणा कोणी पाहिला असेल का, याची मला शंका आहे.
प्रचंड बुंधा असलेला आणि गुरवाच्या म्हातारीप्रमाणे अंगावर लहान-लहान आवाळे असलेला निंब आपला आहे तसा आहे. निबांचे म्हातारपण एका विशिष्ट जागी येऊन थांबलेच आहे.
चैत्रमासात पुन्हा चमत्कार होतो.
म्हाता-या निंबात पोपटी रंगाची पालवी चहू अंगानी उसळ्या घेऊ लागते.
तिच्या रुपाचा अगदी उजेड पडतो.
उन्हात तगमग होऊ लागली की, पारावर येऊन बसावे-
वाळ्याचे पडदे चहूबाजूंनी सोडले आहेत असे वाटते.


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १०४
किंमत- ११० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती मे २०१२


बाळपण संपले. चांगले कळू लागले. नोकरी करण्यासाठी, शिक्षणासाठी सगळे जण कुठे कुठे फुटले, तरी या वेड्यावाकड्या घराविषयीचे प्रेम कमी झाले नाही. वर्षातून एकदा आम्ही सारी भावंडे गावी एकत्र जमत असू. पसारा एवढा झालेला असे तरी, एवढे घरही गजबजून जाई. मग चांदण्या रात्री अंगणात लिंबाचा गार वारा घेत सर्वांनी बसावे, वडिलांनी रसाळ गोष्टी सांगाव्यात, सकाळी नव्या सोप्यात न्याहरी करीत बाळपण आठवावे, दुपारी बाजानानांनी वाढविलेल्या लिंबावरच्या साळुंक्यांचे मंजूळ बोलणे ऐकत डुलकी घ्यावी, संध्याकाळी दिवस कलल्यावर माळवदावर चढून मावळतीचे झगमगते रंग पहावेत.

ती सांदाडी बालपणी होती, तशीच पुढेही होती. जिज्ञासा आणि भिती गेली, तरीही त्या काळच्या आठवणींमुळे ती प्रिय वाटे. पुर्वी मला मोठा वाटणार सोपा आमची उंची वाढल्यामुळे आतका बुटका वाटे. तरी तुळ्यांवरुन त्याकाळी खडूने लिहिलेली ती वचने वाचून कशा गुदगुल्या होत. आम्ही तिघाही भांवंडाची अक्षरे तिथे होती. `अहिंसा परमो धर्मः`, सत्यमेव जयते, `यदा यदाही धर्मस्य` हा गीतेतील सगळा श्लोक... असे कितीतरी बोधसाहित्य आम्ही तिथे श्रध्देने उतरवून ठेवले होते.
रात्री अजूनही आई करुणाष्टके म्हणत जुन्या सोप्यात बसे. ती अंथरुणात पडल्या-पडल्या ऐकली की, ``रघुपति मति माझी आपलीशी करावी`, असे म्हणत आपणही तिच्या शेजारी बसावे वाटे.

पहाटे उठून वडील जेल्हा `उठा उठा हो सकळीक` ही भूपाळी म्हणत, तेव्हा अंथरुणावर पडायची लाज वाटून अंगण साफ करण्याचा हुरुप येई. तो सकाळचा सडा, ती जात्यावरची गाणी, ते पहाटोचे शेकणे या गोष्टींना काही आगळेच सोंदर्य येई.
त्या घरात असणे म्हणजे बाळपणात फिरुन असणे, प्रत्येक वस्तुवर पडलेल्या आजोबांच्या छायेविषयी भीततियुक्त आदर बाळगणे, बाजीनानांचे पाढरे केस पाहणे, वेड्या आजीच्या कुशीत झोपणे!


( `गोष्टी घराकडील`..कथेतली हा उतारा...नक्कीच ते भारलेपण देईल)

No comments:

Post a Comment