
सच्चा आवाज.
बालपणीच्या धास्तीभरल्या आठवणी जाग्या करता करता उदात्ततेला आवाहन करणारी
आणि वास्तवापुढे मान तुकवणा-या निरागसतेची वेदना टिपणारा सच्चा आवाज़!
सोफी लगूनानं रेखाटलेलं जग, व्यक्तिरेखा आणि व्यक्तिरेखेला साजेशी भाषा यात
वाचक गुंगून जातो.
हे सारं एका दारुण वास्तवाच्या कथानकाला हाताळताना,
एवढ्या तीव्र आणि प्रभावशाली शैलीत ती करु शकली आहे,
हीच तिच्या ठायीच्या चातुर्य, कलाकौशल्य आणि परिपक्वता
या गुणांना मिळालेली पावती म्हटली पाहिजे.
भडक पत्रकारितेच्या हे सर्वस्वी विरुध्द आहे.
हे माणुसकी, मनोविकार आणि सत्य यांनी ओतप्रोत भरलेलं आहे.
मूळ लेखक- सोफी लगूना
अनुवाद- सुनीति काणे
पुष्ठे- १५८
किंमत- १६० रुपये.
मी चित्र रेखाटत असताना पेन्सिल माझ्याशी कुजबुजत असे. ती म्हणते असे, “मी कल्पांतापर्यंत तुझी मैत्रीण राहीन.” मी तिला प्रश्न करत असे, “ कल्पान्त म्हणजे काय?” पेन्सिल उत्तर देत असे,”कल्पान्त म्हणजे जमीन भिंती नसलेली अमर्याद पोकळी.”
एकलकोंड्या आणि धर्मवेड्या आई-बापांनी त्यांच्या लेकराला घरात बंदिवासात ठेवलं आहे. हेस्टर कधीही दुस-या कुणा लहान मुलीशी बोलू शकलेली नाही किंवा तिनं घराबाहेरचं जगही पाहिलेलं नाही. मुलांसाठीचं सचित्र बायबल ही तिची एकमेव दौलत आहे. त्यातली कल्पनासृष्टी हा तिला बाहेरच्या जगाशी जोडणारा एकमेव दुवा आहे. तिचे सवंगडी आहेत घरातलं मांजर आणि चमचा, दरवाजा, दरवाज्याची मूठ, झाडू, बागेतलं झाड अशा गोष्टी! आणि याच गोष्टी कधी कधी तिला काय करावं याबद्दल सल्ला देत असतात.
एकदा दरवाज्याची मूठ तिला सांगते,” हेस्टर... मला धरून फिरव... मला धरून फिरव.”तसं केल्यावर तो दरवाजा उघडतो आणि बाहेरचं निषिध्द जग तिच्यापुढे खुलं करतो. बाहेरचा प्रकाश, मोकळं आकाश आणि खुला निसर्ग पाहून ती अवाक होते. या गोष्टी पाहून मनी दाटून आश्र्चर्याला वाचा फोडायला तिला लेखणीनं चित्र रेखाटावी लागतात.
या क्षणापासून हेस्टरला जाणीव होते, की काही गाष्टी ती आई-वडिलांना सांगू शकणार नाही. तिला उमगतं, की` गुपित नेहमी मुकं असतं. ते तुमच्या मनाच्या काळोख्या कोप-यात दडून वाट पाहत असंत.` हेस्टरच्या मनात दडलेली गुपितं वाढतच जातात आणि मुक्त होण्याचा पर्याय सापडेपर्यंत प्रतीक्षा करणं तिला भाग पडतं.
`वन फूट रॉंग`मध्ये सांगितलेली कहाणी बरेचदा उदास करणारी आणि भीषण वाटते; परंतु सोफी लगूनच्या भाषेचं झळाळतं तेज, तिची कल्पकता आणि तिनं उभी केलेल्या कल्पनासृष्टी पुस्तकाचं प्रत्येक पान उजळून टाकते आणि या कादंबरीला मनोवेधक, प्रबोधक आणि वास्तव बनवते. `मिट्ट काळोखातच तारे झळाळून चमकतात.`