Saturday, May 12, 2012

डोहातील सावल्या


पावसाचा महिमा लहानपणापासून आम्ही ऐकला. या देशातल्या माणसाइतका आणखी कुणाला तो कळला असेल की नाही, माला माहित नाही. आमचे सगळे जगणेच पावसावर अवलंबून असते. `इथं..इथं.. बेस रे मोरा.. ` किंवा, `एक होती चिऊ, एक होता काऊ..` प्रमाणे `ये रे ये रे पावसा..` हे गाणे बालपणीच आपल्याला पाठ होते. पावसाने यावे म्हणून त्याला पैसा देण्याचे अमिष दाखवायचे ( ते सुध्दा खोडकर खोटे.) आणि मग मोठा पाऊस आला की नाचायचे, तर बायकांनी जात्यावर ओव्या म्हणायच्या –
पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा,
पाळणा हालतो भावाआधी बहिणीचा..
पावसाबद्दाल एवढा भक्तिभाव का, तर `पर्जन्यात् अन्नसंभवः,`... मुख्य हे की काळी पिकली पाहिजे.
माणूस हा देवपूत्र कसला, ते निसर्गपुत्रच. दुष्काळी मुलखातल्या लहानश्या गावातच बालपण गेले म्हणजे पावसाचा मोठेपणा जास्त कळतो.
काळेनिळे ढग आकाशात जमून कसा गडगडडात होतो..वीजबाई कोसळू नये म्हणून मग घाईगडबडीने अंगणात पहारी टाकायच्या.
धो-धो पाऊ, कोसळला आणि रस्त्यारस्त्यांवर गढूळ तांबड्या पाण्याचे लोट वाहू लागले की.. `अगाबाबा, मायंदाळ पानी आदाळलं आज.. `म्हणून ओढा बघायला धावायचं.
काळा-पांढरी माती भिजून कसा घमघमाट सुटतो.. गुरेवासरे कशी आखडत्या अंगाने उभी राहतात..कोंबड्या फूगुन आडोशाला बसतात.. भिजलेल्या शेरडाकरडांचा वास झोपड्यातून पसरतो. लगेच चार दिवसात नाही तथे नवे-नवे कोंब तरारून येतात. कधी कुठे पडलेला चिंचोका फूटून त्यातून कोंब, कुठे जांभळाचे बी पडले त्यातून कोंब! लिंबोल्यातून, दामुक्यातून रोपे तरारतात. एरवी केराचे डोंगर वाटणा-या उकिरड्यावर कसले-कसले वेल पसरु लागतात. बघता-बघता सगळी धरणी तर हिरवीगार होतेच, पण घराची माळवदे व छपरे सुध्दा पोपटी दिसू लागतात. पावसानंतरची ही दुनिया म्हणजे चमत्काराच असतो.

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८०
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे,२०१२

No comments:

Post a Comment