Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, April 19, 2011
यशस्वी सर्जनची ‘सर्जनशील’ वाटचाल
-अभय जोशी
मना सर्जना-डॉ. अनिल गांधी
गेल्या काही वर्षांत समाजाच्या विविध घटकांतील मान्यवर व्यक्तींनी मराठी साहित्यात आत्मचरित्रांच्या रुपाने आपल्या अनुभवांची भर घातली आहे. एकेकाळी केवळ लेखक अथवा साहित्यिकांपुरतेच मर्यादित असलेले साहित्य, त्यातही आत्मचरित्रांचे दालन सर्वासाठी खुले होऊ लागले. जाणत्या तसेच सर्वसामान्य वाचकांनीही त्यास लक्षणीय प्रतिसाद दिला, ही बाब उल्लेखनीय ठरते. पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर अनिल गांधी यांचे अलीकडेच प्रसिद्ध झालेले ‘मना सर्जना’ हे आत्मचरित्र असेच वेधक आणि सरस ठरले आहे.
डॉ. गांधी यांचे ‘मना सर्जना’ वाचताना ठळकपणे जाणवतात त्या दोन बाबी. एक म्हणजे डॉक्टर होण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच बांधलेला चंग आणि त्या अनुषंगाने केलेले प्रयत्न.
खरे म्हणजे, डॉक्टर गांधी यांचे वडील सोलापूरमध्ये शाळाशिक्षक होते. सुमारे सात दशकांपूर्वी त्या काळातील कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये असलेलीच जेमतेम आर्थिक परिस्थिती गांधी कुटुंबियांची होती. घरातील सदस्यांचा वाढता पसारा.
परंतु घराला कोणतीही वैद्यकीय पाश्र्वभूमी नसतानाही लहानगा अनिल डॉक्टरकीचा ध्यास धरतो आणि पुढे मोठेपणी त्या दिशेने यशस्वीरीत्या प्रयत्न करून डॉक्टर, सर्जनही होतो.
आपल्याला डॉक्टरकीचे वेध का लागले, याची कारणीमीमांसा करताना त्या काळामध्ये एकूण गरिबी असूनही समाजात असलेला सेवाभाव कसा महत्त्वपूर्ण ठरला, याचे दाखले डॉक्टरांनी आपल्या या वाटचालीची कथा सांगताना या पुस्तकाद्वारे दिले आहेत. डॉक्टर गांधी यांनी आपल्या या पुस्तकात त्यांना सर्व प्रकारची मदत करणारे त्यांचे मित्र, व्यावसायिक सहकारी, अन्य ज्येष्ठ डॉक्टरवर्ग यांचे ऋण मनमोकळेपणाने मान्य केले आहे. हे सर्वजण त्या त्या काळात आपल्याला भेटले नसते आणि त्यांनी आपल्याला सहाय्य केले नसते तर आजचे ‘डॉ. अनिल गांधी’ कदाचित बघायला मिळाले नसते, याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दाखले या पुस्तकामध्ये आपल्याला अनेकदा वाचायला मिळतात.
डॉ. गांधी यांनी आज वयाची सत्तरी पार केली आहे आणि ज्या काळात त्यांनी डॉक्टरीचा नेटाने अभ्यास करून आजचे स्थान मिळविले, तो काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती निश्चितच वेगळी होती. आजच्यासारखी ‘कट-फी’, अनावश्यक चाचण्या, असा प्रकार त्या काळात कदापि नव्हता. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना केवळ नित्याचीच नव्हती तर त्या काळातील डॉक्टर एखाद्या ‘फॅमिली फ्रेण्ड’ प्रमाणे आपल्या रुग्णांच्या घरचे निकटचे मित्रच होते. त्या काळात डॉक्टर आपल्या रुग्णांच्या घरगुती समस्यांवरही तोडगा काढीत असत. आपल्या रुग्णांची नातेवाईकांप्रमाणे काळजी घेण्याबरोबरच त्याला धीर देऊन त्याचा आजार दूर करण्यासाठी एखाद्या निष्णात सर्जनाप्रमाणे शरीराबरोबरच त्याच्या मनावरही यशस्वी उपचार केल्याची उदाहरणे या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. ‘चालला..लमाणांचा तांडा’ या प्रकरणात डॉक्टरांनी आपल्या डॉक्टरकीच्या वाटचालीतील अनेक रुग्णांच्या कथा नावानिशी दिल्या आहेत. ‘लमाणांचा तांडा’ याच प्रकरणात जिन्यातून उलटय़ा दिशेने येणाऱ्या आजीबाईंचा डॉक्टरांनी सांगितलेला किस्सा आपल्याला नकळत हसवून जातो. पुण्यात डॉक्टरकी केल्यामुळे पुणेकरांचे काही ‘अस्सल’ अनुभवही डॉक्टरांना आले. अर्थात ते फार कमी असल्याचेही डॉक्टर नमूद करतात. सध्या गाजत असलेल्या ‘स्वेच्छामरणा’च्या विषयावरही याच प्रकरणात डॉक्टरांनी आपले मत थोडक्यात पण अत्यंत नेमकेपणाने मांडले आहे. प्रारंभीच्या पहिल्या प्रकरणातील मंजुश्री सारडा प्रकरणात आलेले अनुभव डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहेत.
वरती म्हटल्याप्रमाणे डॉक्टर गांधी यांना आपले इप्सित साध्य करण्यासाठी अनेक संकटे, कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. त्यामधून त्यांनी यशस्वीपणे मार्गही काढले. हे करताना डॉक्टरांनी अडचणीच्या परिस्थितीचा बाऊ केला नाही, हे महत्त्वाचे ठरते. आजकाल परीक्षेत कमी मार्क मिळण्याच्या भीतीमुळे आत्महत्येचा वाईट मार्ग अनुसरणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे, असे सुचवावेसे वाटते. या पुस्तकातील शेवटचे मी ‘सर्जन’शील..? हे प्रकरण गांभीर्याने वाचावे असेच आहे. त्या काळातील सामाजिक भान, दुसऱ्यांना मदत करण्याची एकूण वृत्ती, त्यासंदर्भात डॉक्टरांना जाणत्या वयात आलेले अनुभव आणि विवाहानंतरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी वर्षां यांनी दिलेले निरपेक्ष सहकार्य, आदी मुद्दय़ांचा डॉक्टरांनी अत्यंत मनमोकळेपणाने ऋणपूर्वक उल्लेख केला आहे. ध्येयपूर्तीसाठी प्रसंगी घरातल्या जवळच्या व्यक्तींना आपण अनेकदा दुखावल्याची खंतही डॉक्टरांनी प्रांजळपणे व्यक्त केली आहे. या पुस्तकात डॉक्टर गांधी यांनी आपला व्यवसाय संभाळून आश्रमशाळा, आर्थिक गुंतवणूक, आदी क्षेत्रांतही योगदान दिले आहे.
‘सर्जन’ या शब्दाचा मराठी अर्थ शल्यचिकित्सक असून मराठी साहित्यातील ‘सर्जनशील’ अथवा ‘सृजनशील’ या शब्दाचा अर्थ निर्मितीशी येतो. त्यामुळे व्यवसायाने ‘सर्जन’ असलेल्या डॉ. गांधी यांनी ‘मना सर्जना’ या आत्मकथनात्मक पुस्तकाद्वारे आपल्यातील ‘सर्जनशील’ लेखकही तितक्याच यशस्वीपणे रंगविला आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : २२०
मूल्य : २०० रुपये
(लोकसत्ताच्या लोकरंग य़ा रविवारच्या १७ एप्रिल २०११ च्या अंकात `मना सर्जना`
पुस्तकाचे परिक्षण आले आहे , ते येथे देत आहोत .)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment