Sunday, April 17, 2011

पुस्तक तुमच्याशी बोलते-राहूल सोलापूरकर



बॅंकेच्या समृध्द जिवन अनुभवातून लिहलेले आनंदाचे पासबुक हे पुस्तक तुमच्याशी बोलते. सामाजिक क्षेत्रातले, संगीतातले,नाटकातले लोक आणि त्याच्यांबरोबरचे संबंध यातून श्याम भुर्के यांनी जे लिहले आहे ते वाचकांनी वाचावे असेच आहे, असे मत अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केले.

मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केलेल्या श्री. श्य़ाम भुर्के यांच्या आनंदाचे पासबुकचे प्रकाशन राहूल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. शनिवारी (१६ एप्रिल) अक्षरधाराच्या बुक गॅलरीच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर संगीतकार आनंद मोडक यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ रंगतदार झाला.

राहूल सोलापूरकरांची खंत एकच होती की भुर्के यांनी ब-याच माणसांवरचे अनुभव त्रोटक स्वरूपात लिहले आहेत. अजुन त्यातल्या प्रत्येकाच्या ब-याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यांच्या मते आयुष्यातल्या कटू अनुभवांना फाटा देऊन क्रेडिट देणारे आनंदाचे क्षणच या पुस्तकात भुर्कें यांनी टिपले आहेत. माणूस शिकतो ते दुःखात ते अनुभवही वाचकांना वाचायला आवडतील. त्यांच्या या मैफलीत केवळ आनंद भारलाय. साताराहून पुण्यात आलेला हा लेखक या रुपाने वाचकांच्या हाती सातारी कंदी पेढाच देतो आहे ही भावना आपल्या मनाला स्पर्शून गेली, असेही सोलापूरकर म्हणतात.

आपण जणू मित्रांशी गप्पा मारतोय अशा रसरशीतपणे जिवंत अनुभव देत त्यांचे लेखन झाल्याचे संगीतकार आनंद मोडक सांगतात. एकदा पुस्तक वाचायला घेतल्यावर ते आणखी वाचावे असे वाटते. ज्ञान सतत मिळवत रहाणे, सातत्याने विद्यार्थीपण जपत रहाणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. भुर्के जसे जगले ते विलक्षण आहे. तेही निष्ठेने. यात लेखक, वाचक, रसिक आणि सामाजिक भान सर्वांचा प्रत्यय येतो. साहित्य ही तुमची आमची भूक आहे. त्यातल्या अनुभवावरच आयुष्य उलघडत जाते. भुर्के यांचे पुस्तक तुम्हाला सकारात्मक दृष्टी देईल, असा विश्वास मोडक यांनी व्यक्त केला.

श्याम भुर्के यांच्या मते सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलने मराठी साहित्याचा ओढा आपल्या मनात लहानपणी निर्माण केला. शाळेतल्या विविध उपक्रमातून भाग घेऊन बळ आले. तेच बळ घेऊन पुण्याला आलो. बॅंक ऑफ महाराष्ट्रने समृध्द जिवन घडविले. त्यातूनच आलेल्या अनुभवांतून ह्या ६० वयापर्यतच्या आठवणी...एका अर्थाने आत्मवृत्त आनंदाचे पासबूक या पुस्तकातून लिहण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे ते सांगतात.
मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनिल मेहता यांनी भुर्केयांच्या पुस्तकाचे वेगळेपण सांगितले.
तर अक्षरधाराचे लक्ष्मण राठीवडकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष इनामदार यांनी केले होते.

No comments:

Post a Comment