Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Wednesday, April 13, 2011
मंद्र कादंबरीला -सरस्वती सन्मान
कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध...
त्यांच्या मंद्र या पुस्तकाला बिर्ला- सरस्वती सन्मान जाहिर झाला आहे .
मूळ कन्नड़ भाषेतली ही कादंबरी मराठीत मेहता पुब्लिशिंग हाउस यानी प्रकाशित केली आहे. .
उमा कुलकर्णी यानी मराठीत या कादंबरीचा अनुवाद केला आहे. त्यातलेच हे एक प्रकरण ....
तुळशीच्या दाट झुडपांमधोमध असलेली रिकामी जागा. उजवीकडे यमुना. देवळात स्वामी हरिदासांची मूर्ती. देवळात यात्रेकरूंचा गडबड-गोंधळ नहता. बाहेरच्या जगात तानसेनचे गुरूम्हणून प्रसिद्धी पावलेल्या गुरूच्या मंदिरात शिष्याच्या नावाला महत्त्व नहतं. इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असते, तशीच वृंदावनातही यात्रेकरूंची गर्दी होती. पंड्यांची दादागिरी होती. अनेक वस्तू विकणाऱ्याचं आक्रमण होतं. त्यामुळे मोहनलालला या देवळात खूपच शांत वाटलं. तासभर बसून राहिला. नंतर जवळच्या हॉटेलमध्ये आपल्या खोलीवर जाऊन झोपला. सकाळी यमुनेच्या काठावर गेला. तिथं कृष्णानं या झाडावर गोपींची वस्त्रं लपवून ठेवली होती, म्हणून सांगण्यात येणार्या झाडाभोवती फिरून आला. तो दिवस तसाच गेला.
तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे जाग आली. घड्याळ पाहिलं. साडेतीन वाजले होते. हरिदास मंदिराकडे जायची इच्छा झाली. तोंड धुऊन तो अंधारातच बाहेर पडला. देवळापाशी येताच त्याला स्वर ऐकू आले. कुणीतरी देवळात स्वरसाधना करत होतं. क्षणभर वाटून गेलं, हरिदास स्वामींचा आत्मा तर नसेल? पावलांचा आवाज न होऊ देता देवळाजवळ जाऊन तो तिथल्या चौथऱ्यावर बसला. आत खरोखरच कुणीतरी स्वरसाधना करत होतं. त्याचीही एक विशिष्ट पद्धत दिसत होती. तिथं स्वर आकार किंवा स्वरांच्या सरगमनुसार नहता. दीर्घ ओंकार विशिष्ट सुरात लावून ती साधना चालली होती. एकेक ओंकार नाभीतून निघून मस्तकात भिनण्याइतका दीर्घकाळ चालला होता. षड्जापासून सुरुवात करून बाराही स्वरांवर स्थिरावत, प्रत्येक स्वराचा दीर्घ ओंकार चालला होता. मंद्र षड्जाला पोहोचल्यानंतर एकेक स्वर ओंकारात लावत, बाराही स्वरांनंतर मध्य सप्तकातील षड्जाला येऊन पोहोचत होता. तिथून मध्य सप्तकाचे बाराही स्वर अशाच प्रकारे घेतले जात होते. त्यानंतर तार सप्तकातील बारा पायऱ्या. अशा प्रकारे मंद्र षड्ज ते तार षड्ज आणि तार षड्ज ते पुन्हा मंद्र षड्ज असं आवर्तन पुरं करताना बहात्तर ओंकार झाले. प्रत्येक स्वर पक्का होता. इतका की तिथं स्वरांच्या अतिक्रमणाला वाव नहता, तशीच स्वरसंकोचालाही जाग नहती. श्वासाच्या दमदारपणातही किंचितही भेदाभेद नहता. प्रत्येक स्वर किमान मिनिटभर तरी होता असं धरलं तरी एका आवर्तनाला बहात्तर मिनिटं लागली असली पाहिजेत. त्यांनी या आवर्तनांना केहा सुरुवात केली आणि हे कितवं आवर्तन याची मोहनलालला कल्पना नहती. पहाट व्हायच्या वेळी त्यांनी आपली स्वरसाधना संपवली. त्यानंतर संपूर्ण मौन! हा शुद्ध स्वरांचा क्रम. यात कुठलाही विशिष्ट राग दिसत नहता. सगळ्या रागांना आधारभूत असणार्या सगळ्या स्वरांची ती साधना होती.
संगीताच्या खोलीचा प्रत्यय आला आणि पाठोपाठ राजासाहेबांच्या शिवमंदिरात करत असलेल्या स्वरसाधनेची आठवण आली.
नाही! त्याहीपेक्षा ही ओंकाराची स्वरसाधना अधिक गहिरी आहे!
सूर्योदय झाला. सगळा परिसर सूर्यकिरणांनी भरून गेला. एवढा वेळ नादसाधना करणारे गर्भगृहाबाहेर आले. ते एक साधू होते. काळ्या केसांच्या जटा वळल्या होत्या. चाळिशीचं वय असेल. कमरेला एक जुनं तोकडं वस्त्र काचा मारून आवळलं होतं. कपाळावर लावलेलं गंध सुकून पडून गेलं होतं.
त्यानं पटकन उठून त्यांचे पाय धरले. नासिकेवर एकाग्र झालेली त्यांची नजर त्याच्याकडे वळली. मोहनलालला काय बोलावं ते सुचलं नाही. ते निघून गेले. कुठं गेले ते जाऊन पाहायची त्यालाही इच्छा झाली नाही.
तो संपूर्ण दिवस मोहनलाल त्या ओंकार स्वरांतच बुडून गेला होता. आपण करत असलेल्या मंद्र-साधनेपेक्षाही अधिक गहिरी आणि अतीताचं दर्शन घडवण्याइतकी सधन आहे त्यांची स्वरशक्ती! अंथरुणावर पडलं तरी त्याला झोप येईना. रात्री लवकर जेवण करून तो झोपला. झोप लागली; पण मध्यरात्री कानांमध्ये ओंकार नाद भरल्यासारखा होऊन जाग आली. घड्याळ पाहिलं, साडेबारा वाजले होते. तो उठला, डोळ्यांना पाणी लावून हरिदास मंदिराच्या दिशेनं चालू लागला. आकाशात फिकट चांदणं होतं. अंधारात आजच यापारी वृत्तीनं सडलेलं वृंदावन नष्ट होऊन त्या फिक्या उजेडात मूळ वृंदावनाचा भास निर्माण होत होता. यमुना, कृष्ण, राधा, गोप-स्त्रियांचा रास, कृष्णाची बासरी सारं काही मन:चक्षूंपुढे साकार झाल्याचा अनुभव येत होता. तसाच तो तुळशीच्या झाडांमधल्या देवळापाशी जाऊन पोहोचला, तेहा तर ती दृश्येही नाहीशी झाली आणि वातावरणात भरून राहिलेल्या शुद्ध ओंकाराचा अनुभव आला.
म्हणजे यांची स्वरसाधना रात्रभर चालते तर! तो पुन्हा हलक्या पावलांनी कालच्याच जागेवर जाऊन बसला. त्यांचा प्रत्येक ओंकार कुठला स्वर सांगतो हे वेगळं सांगायची गरज नहती. क्षणभर त्यालाही त्या स्वरांमध्ये आपला स्वर मिसळण्याचा अनावर मोह झाला, तरी त्यानं ते आवरलं. कारण त्यामुळे त्यांची अतिसूक्ष्म अवस्था भंग पावून ते आपल्यावर संतापतील हे दिसत होतं. त्यामुळे तो मूकपणेच त्यांच्या प्रत्येक स्वर-भावाशी तल्लीन होऊन ऐकू लागला.
आदले दिवशीप्रमाणे पहाटेच्या वेळी त्यांच्या स्वरसाधनेची समाप्ती झाली. थोडा वेळ गर्भगृह मौनानं भरून गेलं. आकाशात सूर्यकिरणे पसरायच्या वेळी ते बाहेर आले. त्यानं आदले दिवशीसारखाच नमस्कार केला. त्यांनी नासिकाग्रावरची दृष्टी त्याच्याकडे वळवून विचारलं, `तुम्ही गायक आहात काय?
होय. माझं नाव मोहनलाल!
मनात आलेल्या ङयंदाचा तानसेन पुरस्कार-विजेताछ ह्या शब्दांचा उच्चार करायचं मात्र टाळलं. क्षणभर वाटलं, आपण योग्यच केलं. केवळ मोहनलाल म्हटलं तरी त्यांना समजेल. गायनाच्या क्षेत्रात हे नाव ठाऊक नाही, असं आहे तरी कोण? पण पाठोपाठ वाटलं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही एवढंच होतं. तिथं नाव सांगायची गरजच नहती. त्या नावाचा त्यांच्यावरही काही परिणाम झालेला दिसला नाही.
काल पहाटे आला होतात. मध्यरात्रीही आलात. निर्जन जागी स्वरसाधना करायची म्हणून मी ही जागा निवडली आहे.
आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमा करा!
असू दे. यानंतर मात्र येऊ नका.
आपली आज्ञा असेल तर मी येणार नाही. आपलं गायन ऐकून मी संगीतातील ज्ञात शक्ती शिकू शकेन, असं वाटलं. म्हणून आलो होतो. माझा शिष्य म्हणून स्वीकार केलात तर मी कृतार्थ होईन!
मी संगीत साधना करत नाही. ही योग-साधनेची एक पद्धत आहे, एवढंच.
तेच म्हणतोय मी. संगीतातली अज्ञात शक्ती मला शिकायची आहे. आपण ती शिकवलीत तर माझ्या गाण्याला नवी शक्ती प्राप्त होईल. तानसेननं दीपक राग म्हणून आग लावली आणि मुलीकडून आणि गुरुभगिनीकडून मेघराग गायला लावून ती विझवली, हे सगळं गुरूनं शिकवलेल्या योग-सामथ्र्यामुळेच ना? आपण कृपावंत होऊन ते सामथ्र्य मला दिलंत तर मी धन्य होऊन जाईन!
त्यानं नतमस्तक होऊन विनंती केली.
ओह! तानसेनच्या संदर्भात गायकांनी रचलेल्या असल्या मंत्र-सिद्धीच्या कथांवर संगीतप्रेमी विश्वास ठेवतात, हे मीही ऐकलं आहे. अकबर बादशहाच्या मोठेपणाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. ही कथाही त्यापौकीच एक आहे. अकबर बादशहा त्या गोष्टीतून बाजूला काढला तर तानसेननं दीपक राग गाऊन केलेली कथाच तयार होऊ शकणार नाही! खरं की नाही?
अगदी खरं आहे ते! बादशहा फार मोठा संगीतप्रेमी! आपल्या इतर मंत्र्यांपेक्षा तानसेनला तो जास्त पगार द्यायचा!
खरी गोष्ट काय आहे, सांगू? स्वामी हरिदासांनी लंकादहन सारंग राग म्हणायला सुरुवात केल्यावर या वृंदावनात त्या वेळी असलेल्या अरण्यात वणवा पेटला. त्या वेळी त्यांनी मेघ गाऊन तो वणवा विझवला. स्वामी हरिदास फक्त गायक नहते. ते फार मोठे योगी होते. योग्याचा पहिला गुण कोणता? अकबर बादशहानं अनेकदा निरोप पाठवूनही त्यांनी याच जागी असलेला आपला आश्रम सोडला नाही आणि ते राजाश्रयासाठीही गेले नाहीत. बादशहाला आपल्या गुरूचं गाणं ऐकवण्यासाठी तानसेननं त्याला वेषांतर करून इथं आणलं होतं. नंतर त्याला बाहेरच बसवून स्वत: आत गेला आणि अमूक राग गायची विनंती केली. बादशहाही बाहेरूनच गाणं ऐकून माघारी वळला. हा गुण तानसेनमध्ये होता काय? त्यानं राजाश्रय स्वीकारला होता ना? बादशहाचा गुणगौरव करणाऱ्या काही संगीतरचना त्यानं केल्या ना? आपल्या मुलांकडूनही त्यानं बादशहाची स्तुती करणार्या रचना करवून घेतल्या, त्या स्वत: तपासून दिल्या आणि त्यांना राजदरबारात मोठ्या पगाराच्या आणि इनामाच्या जागा मिळवून दिल्या. खरं की नाही? त्यानं रचलेल्या रागांमध्येही बादशहाच्या आवडीचा आणि अभिरुचीचा विचारच होता की नाही? आवडलेल्या मुलीशी विवाहबद्ध होण्यासाठी त्यानं आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला होता ना? या धर्माचा स्वीकार केल्यामुळे त्याचं बादशहाच्या दरबारातलं स्थान अधिक बळकट झालं की नाही? तो एक मोठा गायक होता. त्याची कला-प्रतिभा मोठी होती; पण म्हणून केवळ योग्यालाच प्राप्त होऊ शकणारी शक्ती त्याच्या गाण्याला होती असं आपल्यासारखे कलाकारच म्हणतात! तो राजाश्रय आणि राजभोगाची आमिषं यांना बळी पडला, त्यानं स्वधर्माचा त्याग केला. तरीही योगसिद्धी प्राप्त असलेल्या महायोगी हरिदासांनी त्याचा तिरस्कार केला नाही, त्याला शापही दिला नाही! हे त्यांच्या योगसिद्धीचं आणखी एक लक्षण.
ते उभ्यानंच हे बोलत होते. तो काही अंतरावर नम्रपणे उभा राहून ऐकत होता. त्यांनी नजरेनंच विचारलं,
आणखी काही विचारायचं आहे काय?
त्याला काही सुचलं नाही. त्यांची नजर पुन्हा नासिकाग्रावर खिळली. ते नदीच्या दिशेनं चालू लागले. तो त्यांच्या पावलांच्या ठश्यांकडे पाहत उभा होता.
हॉटेलमध्ये परतून अंघोळ-नाश्ता आटोपला. पलंगावर आडवं होऊन विश्रांती घेताना मनात एक प्रकारचं समाधान होतं, पाठोपाठ असमाधानही धावून आलं. तानसेनही माझ्यासारखा एक गायक होता. भरपूर प्रतिभावंत. मला जसा पौसा, कीर्ती यांसारख्या ऐहिक गोष्टींचा मोह आहे, तसा त्यालाही होता. या विचारानं मन थोडं शांतही झालं. अशा प्रकारे भोगामध्ये गुंतलेल्या संगीतानं कसलाही चमत्कार करणं शक्य नाही. मला हे कधीही जमणार नाही, या विचारानं मन अस्वस्थही झालं. बायको-मुलं-शिष्य सर्वच बाबतीत असमाधानी असल्यामुळे, मला जसा खिन्नभाव छळतो, तसा त्याला छळत नसावा!
थोड्या वेळात झोप आली. झोपेतही कानांमध्ये ओंकाराचे स्वरच ऐकू येत होते. त्यानंतर जाग आली. जाग आल्यावरही त्याचं आकर्षण छळू लागलं. आज रात्रीही ते देवळात येतील, ओंकार-साधना करतील. ती ऐकली पाहिजे असं अदम्य आकर्षण वाटत होतं; पण आज गेलं तर ते स्पष्टपणे जायला सांगतील! तरीही हट्टानं ऐकलं तर कदाचित ते काहीतरी शाप देतील! नकोच! त्याला भय वाटलं. सरळ-सरळ योगशिक्षणासाठी गुरूहा म्हणून प्रार्थना केली तर? ते विचारतील, `सगळे ऐहिक सुखोपभोग सोडशील काय? बादशहाच्या दरबारात गाण्यासाठी आलेलं निमंत्रण नाकारण्याइतकी ताकद तुझ्यामध्ये आहे काय?
यावर काय उत्तर द्यायचं?
योगी जी मनाची अवस्था अनुभवतात, त्याच्यापुढे इतर सगळे आनंद फिके आहेत, हे त्यानंही ऐकलं होतं. आता ते आठवताना तो किती तरी वेळ त्यातच तल्लीन झाला. भूक लागली तेहा भानावर आला. जेवताना मनात आलं, पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी निदान भूपालीला तरी घेऊन यायला हवं होतं. जेवण होऊन खोलीकडे येताना स्त्री-देहाची आठवण झाली.
नाही. योगसाधना माझ्यासाठी नाही!
खोलीत येऊन कॉटवर आडवा होईपय|त स्त्री-देहाची आठवणही विरून गेली होती. मनात आलं, या तंबोरा-प्रकरणानंतर सगळ्या पत्रकारांची माझ्यावर नजर आहे. त्यातच हा पुरस्कार. इथं कुणाही विद्यार्थिनीला आणलं असतं, भूपालीसारख्या गोऱ्या मुलीला आणलं असतं तर जास्तच प्रमाणात सगळ्यांच्या नजरेला खुपलं असतं. एकदा त्या दृष्टीनं बातम्या येऊ लागल्या असत्या तर फारच पंचाईत झाली असती. एकटा आलो तेच उत्तम झालं! या विचारानं समाधान वाटलं.
रात्री झोप आली नाही. पुन्हा ओंकार ऐकण्याची आशा! पण हरिदास मंदिराकडे जाणं शक्य नाही. दोन तास तसेच तळमळत काढल्यावर तो नदीच्या काठावर निघाला. देऊळ ओलांडून पुढं गेल्यावर नदीच्या कोरड्या पात्रातल्या वाळूत तो बसला. मनात तंबोरा जुळवून त्यानं स्वरसाधना करायला सुरुवात केली. त्यानं त्या साधूप्रमाणे मंद्र सप्तकातले बारा स्वर म्हटले. त्यानंतर मध्य आणि तार सप्तकातलेही बारा-बारा स्वर घेऊन घोटवून पाहिले. सगळं ओंकारात. सहज जमलं. बरं वाटलं; पण मनात आलं, यानं काय साधणार आहे? मनात येईल त्या सप्तकातला हवा तो स्वर मी एका झटक्यात लावू शकतो. अर्जुनाचा बाण सुटावा तसा स्वर लागतो माझा! तितक्या नेमकेपणानं! राजासाहेबांनी अगदी सुरुवातीलाच सहा महिन्यांत ती तयारी करवून घेतली होती. त्यानंतरही एवढी वर्षे त्याच पद्धतीनं गातोय, सूर लावतोय. मी जो स्वर-विन्यास लीलया करूशकतो, तो त्या साधूला जमणार आहे काय? माझ्याकडून गुरूनं जी संगीत-साधना करवून घेतली आहे, ती त्याच्याकडून घडली आहे काय? पण ते साधू ओंकाराद्वारे संगीत-साधना करत नहते, योगसाधना! त्या विचित्र ओंकार-शक्तीची आठवण झाली. पुन्हा एकदा मंदिरात जायची दुर्दम्य आशा वाटली आणि पाठोपाठ साधूचं बोलणं आठवून तीव्र निराशा झाली. मन असहाय्य भावनेनं घेरलं गेलं.
आणखी दोन दिवस याच अवस्थतेत गेले. एक दिवस मनात आलं, इथं असा उगाच राहून काय साधतोय मी! सहा मौलांवरच्या मथुरेला गेलं तर तिथून थेट मुंबईला जाणार्या गाड्या मिळतील. किंवा दोन तास प्रवास करून दिल्लीला गेलं तर विमानच मिळेल; पण मुंबईला तरी जाऊन काय करायचं? तिथं बरीच पत्रं आली असतील, टेलिग्राम-टेलिफोनही येत असतील. कार्यक्रमाची आमंत्रणं. माझा एक लाख रुपये दर आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यावर कुणी काही वाद घालत नाही. नुकताच तानसेन पुरस्कार मिळालेला असताना कार्यक्रम ठेवायचा उत्साह बर्याच संयोजकांना असतो. हा उत्साह महिन्याभरानंतर ओसरतो. अशा संधीचा फायदा करून घेण्याऐवजी अशा कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी मी येऊन बसलोय! लगोलग सुटकेस घेऊन स्टेशनवर जायचा निश्चयही केला; पण अंथरुणातून उठून विखुरलेले कपडे एकत्र आवरण्याचाही उत्साह नहता. तो तसाच झोपून राहिला.
इथून निघायला पाहिजे हे समजत होतं; पण कुठं जायचं हे मात्र समजत नहतं. त्याच्या मनात एकेक गावांची नावं येऊन गेली; पण कुठल्याही गावाचं आकर्षण टिकलं नाही.
एका क्षणी तीव्रपणे वाटलं, चित्तरपूरला जावं आणि त्या राजासाहेबांच्या जंगलातल्या, नर्मदेकडे तोंड करून असलेल्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे बसून राहावं.
नंतर स्वत:शीच गुणगुणावंसं वाटलं.
दोन तासात तो उठलाच. सामान आवरून बॅग भरली.
उज्जौनीच्या गाडीची चौकशीही न करता तो एक रिक्षा पकडून रेल्वे स्टेशनकडे निघाला.
किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?' "मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!' कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस्. एल्. भैरप्पा
यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!
मूळ लेखक : डॉ. एस.एल. भैरप्पा
अनुवादक : उमा कुलकर्णी
पृष्ठे : 576
किंमत : 400
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment