Friday, March 23, 2012

तळं




माणसाचे मन हे एखाद्या अथांग जलाशयासारखे, तळ्यासारखे आहे.
वरुन शांत दिसणा-या, निळेशार पाणी आणि कमळे यांनी भरलेल्या तळ्याच्या तळाशी काय काय असते
ते फक्त तळेच जाणते.
संवेदनाशील मनाचे हे भावविश्व, त्याची डूब ही त्याच्या खोलीवर अवलंबून असते.
त्या भावविश्वाला वयाचे बंधन नाही, नाही गरिबी-श्रीमंतीचे.
येणारा अनुभव, प्रसंग ह्यामुळे त्यावर उठणारे तरंग, कधी खूप मोठे तर कधी हळूच उमटणा-या लहरींसारखेही.
पण वरुन शांत दिसणा-या, सुंदर कमळांनी भरलेल्या त्या सुंदर जलाशयात कमळांच्या विसतंतूसारखी पार गुंतागुंत असते आणि मग उठणारे तरंग....

ह्या अशाच तरंगाचे चित्रण ह्या कथांतून साकार करण्याचा केलेला हा प्रयत्न.....


लेखिका- स्नेहल जोशी
पृष्ठे- १९४
किंमत- १९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Wednesday, March 14, 2012

साल्व्हेशन क्रीक


एक अनपेक्षित जीवन
जिद्दीच्या जोरावर स्वतःते कॅन्सरयुक्त आयुष्य सुखी करणा-या सुसान डंकनची कथा

`मी जेव्हा एका पत्र्याच्या, पाणी झिरपणा-या होडग्यातून `लव्हेट बे`ला घर पाहायला निघाले, तेव्हा मला माहित नव्हतं की, माझा प्रवास सुरु झाला होता. फिकट पिवळा रंग, भक्कम खांब आणि प्रशस्त व्हरांडा असलेल्या उंच खडबडीत टेकडीवरच्या त्या बंगल्यात माझ्या नव्या आयुष्याची पहाट होणार होती.`
ह्दयद्रावक, गमतीदार आणि दाहक प्रामाणिक!
`साल्व्हेशन क्रीक ही अशा एका जिद्दी स्त्रीची गोष्ट आहे, जिच्यात यशस्वी कारकिर्दीचा त्याग करुन नव्याने आयुष्य सुरु करण्याची हिंमत आहे.
ही अशा एका स्त्रीची कथा आहे जिच्यात जगण्यासाटी लढताना अडचणींवर एकटीने मात करण्याचं धैर्य आहे आणि सर्व जगापासून दूर अशा छोट्याश्या निसर्गरम्य किना-यावर तिला सापडलेल्या नव्या आयुष्याची-नव्या प्रेमाची कहाणी आहे.

मूळ लेखक- सुसान डंकन
अनुवाद- वसु भगत
पृष्ठे- ४१०
किंमत- ३९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी



`जेव्हा माणसं दुःख, व्याधी आणि जीवनाची अशाश्वतता यांच्याशी झगडतात, तेव्हा काय घडतं, याचं डंकनने निर्भयपणे आणि बारकाईनं केलेलं वर्णन हेच या पुस्तकाचं सामर्थ्य़ आहे. वन्यजीवन, कुत्रे, अन्न, व्याधी, मित्र आणि मृत्यू यांची तिने केलेली वर्णनं आपल्याही मनात त्यांच्याशी संबंधित आठवणी जागृत करतात. ती वर्णनं प्रामाणिक आणि क्रूर विनोद करणारी आहेत. त्याच वेळेस, कमकुवत माणसांना केलेल्या मदतीच्या तिच्या गोषीटी, आतडी पिळवटून टाकतात.`
- द ऑस्ठ्रेलियन

दुभाष्या


द ट्रान्सलेटर..या मुळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद


बंडखोरांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या गावात दाऊद शिकू लागला. त्याला इंग्रजीची गोडी लागली
आणि अनेक गोष्टी स्पष्ट होई लागल्या.


“ ‘दि ट्रान्सलेटर’ हे या वर्षातीलच नव्हे, तर कोणत्याही वर्षातील महान असे छोटे पुस्तक असावे. पत्रकार आणि या विषयावरील अनेक पंडितांनी लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा अतिशय साध्या आणि ओघवत्या भाषेत लिहलेले जेमतेम दोनशे पानांचे हे पुस्तक डारफरमधील वंशविच्छेदाचा उहापोह अधिक जवळून आणि प्रभावीपणे करते... संयमित, मोकळेपणाने लिहिलेले, सौम्य.. आणि नर्म विनोदाची झालर असलेले...”-दि वॉशिंग्टन पोस्ट, बुक वर्ल्ड.

पुस्तकाचा लेखक सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी आहे. वंशाने तो `झॅघावा`आहे. `झॅघावा` ही डारफर मधील भटकी जमात. अरब आणि आफ्रिकन या दोन्ही वंशाचे लोक डाफरफरमध्ये गेली हजारो वर्ष गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण गेली काही वर्षे डारफर प्रांतात भयंकर वंशविच्छेद सुरु आहे.
वंशाने स्वतःला उच्च समजणा-या अरब वंशीयांनी त्यांचे मुळ अफ्रिकन बांधव नकोसे झाले आहेत. सत्ताधारी अरब आणि त्यांना पाठिंबा दारे माथेफिरु; हे मुळ आफ्रिकन वंशीयांना त्यांच्यांच भूमीतून हाकलून देत आहेत. मूळ रहिवाशांच्या गावांवर आणि वस्त्यांवर हल्ले करुन त्यांना जिवे मारण्यात येत आहे. स्त्रियांवर आणि कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. लाखो विस्थापितांचे लोंढे शेजारील चॅड याराष्ट्रात आश्रय घेत आहेत. दुदैर्वाने तथाकथित आधुनिक जगाला या घड़ामोडींची मागमूसही नाही..

मूळ लेखक- दाऊद हॅरी
अनुवाद- अजित कुलकर्णी
पृष्ठे- १७०
किंमत- १७५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Monday, March 12, 2012

ओंकारीची रेख जना


स्त्री आणि शुद्र असूनही युगप्रवर्तक अभंगरचना करणा-या संत जनाबाई यांची जीवनयात्रा...

जनीनं हरिश्र्चंद्र आख्यानाचा आणि कीर्तनाचा समारोप केला. सगळी इतकी भारावून गेली होती की, कीर्तन संपल्यावर विठूनामाचा गजर करण्याचं भानही कुणाला राहिलं नव्हतं. जनीच्या चेह-यावरचे बधिर भाव बघून नामदेवाला भडभडून आलं, तर ज्ञानेश्वर गहिवरले.
त्या दोघांना समोर बघून जनी लहानाहूनही लहान झाली. लटपटत्या पावलानं थरथरत उभी असलेली जनी खाली कोसळणार तोच ज्ञानेश्वर-नामदेवांनी तिला सावरलं. पोटाशी धरलं. प्रेमभरानं तिच्या पाठीवर थोपटून तिला सामोरी केली. आणि म्हणाले,” धन्य! धन्य हो जनाबाई तुम्ही! जनाबाई, तुम्ही एक स्त्री, त्यातही शुद्र; पण इतकी अर्थपूर्ण आणि भावगर्भ रचना तुम्ही करु शकता हा या युगातला चमत्कार मानावा लागेल. तुमचा प्रत्येक हुंकार म्हणजे ओंकार आहे. ओंकार ही त्या ईश्वराची मोहोर आहे. देवाची स्वक्षरी आहे. आणि जनाबाई, तुम्ही त्या `ओंकाराची रेख` आहात, ओंकारीची रेख!”
हे द्ष्य पाहण्यासाठी शांत झालेला वारा `ओंकाराची रेख` या नावाची स्पंदनं घेऊन पुन्हा वाहायला लागला. त्या वा-याने ती स्पंदनं चंद्रभागेच्या वाळवंटात विखरुन टाकली. वाळवंटाचा कणन् कण थरारला.
तिथून ती स्पंदनं चंद्रभागेच्या पाण्यावर पसरली. चंद्रभागेचे पाणी रोमांचले. त्यावर मोठाले तरंग उठले. त्या तरंगावर चंद्रकिरणे नाचत होती. त्यांनी ते ओंकार तरंग अवकाशात आणले. त्यांना लक्ष घुमारे फुटले. त्यांनी अवघे गगन मंडल व्यापले आणि मंदिराच्या कळसाला वेढा दिला. तिथून ते तरंग गर्भागारात उतरले. गर्भागाराच्या काळ्या फत्तराच्या भिंती आनंदाने उजळल्या. सगळे गर्भागार उजळून निघाले. त्याचा प्रकाश विठूच्या सावळ्या मुखावर पडला. त्याच्या आनंदाला तर पारावार राहिला नाही. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. रात्रीनं या सगळ्या दृश्याला मानवंदना देत आपला अंधार आवरता घेतला.
काकड आरती करायला आलेल्या सदा गुरवाला मात्र दोन गोष्टींचा अर्थ लागला नाही.
एक म्हणजे विठ्ठालाच्या दगडी मूर्तीच्या डोळ्यातून पाणी का वाहत होते आणि... दुसरी म्हणजे गर्भागारात नेहमीच्या `विठ्ठल – विठ्ठल` या ध्वनिगुंजना ऐवजी `ओंकाराची रेख`, `ओंकाराची रेख` असा काहीतरी ध्वनी कसा घुमत होता याचा!


लेखिका- मंजुश्री गोखले
पृष्ठे- ३०८
किंमत- २९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Thursday, March 1, 2012

अनोखे सस्तन प्राणी





सस्तन प्राणी हे प्राणीसृष्टीतील प्रगत आणि विकसित प्राणी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांचे विश्व पाहिले म्हणजे आश्चर्य़ वाटल्याशिवाय राहत नाही.
त्यांचे वैशिष्ठ्य़पूर्ण जीवन, परिस्थितीशी केलेले समायोजन, शत्रूला हुलकावणी देण्याती पध्दत या गोष्टी विस्मयकारक वाटतात.
ध्रुवीय अस्वल बर्फाळ प्रदेशात राहते, तर मिरकॅट, आईलांडगा बिळात राहतात.
अफ्रिकन शिकारी कुत्रे समूहाने मोठ्या प्राण्याची सहज शिकार करतात.
नासके-कुचके खाद्य खाऊन तरस जंगलाचे आरोग्य राखतो. वालरस, समुद्रसिंह, पाणघोडा यांसारखे सस्तन प्राणी जलचर जीवन जगतात.
हरणांचे जग अजब आहे. वायुवेगाने धावणारे काळवीट, चारशिंगाचा चौशिंगा आणि कस्तुरीमृग अतिशय वैशिष्ठ्य़पूर्ण आहेत.
उंट हा रखरखीत बाळवंटाचा सम्राट म्हणून ओळखला जातो.
डोंगराळ प्रदेशात कड्याकपरारीच्या जागी रानबोकड, बार्बरी मेंढी, डोंगरी मेंढी सुखासमाधानाने राहतात.
या प्राण्यांच्या दुनियेत भूतलावरचा सर्वात उंच प्राणी जसा जिराफ आहे, तसा गवा हा दणकट व शक्तिशाली प्राणीही आहे.

यासारख्या अनेक प्राण्यांच्या लकबी, सवयी आणि जीवन-संघर्ष याची मनोरंजक माहिती वाचकांना नक्कीच आवडेल!


लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- १३२
किंमत- ११० रुपये.

जलसम्राट मासे





जलसृष्ठीचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे मासे!
नाना रंगांचे, रुपांचे, आकाराचे हे मासे पाहून माणूस थक्क होतो.
काहींचे सुंदर शरीर कूर्चांनी बनलेले, तर काहींचे अस्थींनी!
हे मासे जसे जलपृष्ठावर राहतात, तसेच सागरतळाशी... जेथे प्रकाशाचा किरणही पोहोचत नाहीत, तेथे ते सुखासमाधानाने निवास करतात.
प्रजोप्तादन व वंशवृध्दीसाठी मागराकडून नदीच्या उगमाकडे, तर नदीकडून सागराकडे हजारो किलोमिटर प्रवास करणारे हिल्सा, ईल, सामन यासारखे स्थलांतर करणारे मासे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हटला पाहिजे.
असंख्ये मासे अत्यंत टोकाचे समायोजन दर्शवितात.
काही दलदलीत राहतात, तर काही काळ्याकुट्ट गुहेत. कित्येक मासे अत्यंत गरीब, तर कित्येक शार्कसारखे मासे म्हणजे हिंस्त्र, नरभक्षक !
काही मासे विजेचा झटका देतात, तर काही मासे प्रकाशनिर्मिती करतात.
अनेक मासे ममतेचे मनोज्ञ दर्शन घडवितात..

अशा या अजब, अदभूत जिवांची, मनोरंजक आणि वेधक माहिती या पुस्तकात वाचकांना वाचता येईल.

लेखक- प्राचार्य डॉ. तिशोर पवार, प्रा. सौ. नीलिनी पवार
पृष्ठे- ६४
किंमत- ११० रुपये.

मनोरंजक सस्तन प्राणी




प्राणीसृष्टीत उत्क्रांतीच्या सर्वात वरच्या टप्प्यावर सस्तन प्राणी आहेत.
अनेक अजब, विचित्र आणि विविधतेने नटलेले सस्तन प्राणी, त्याच्या सवयी, वर्तन, जिवन जगण्याच्या पध्दती पाहिल्यावर निसर्गाच्या किमयेचे कौतुक वाटते.
अनेक सस्तन निशाचर आणि झाडनिवासी आहेत.
प्लॅटिपससारखे अप्रगत सस्तन प्राणी पक्ष्यांप्रमाणे अंडी घालतात.
साळींदर, काटेरी मुग्य़खाऊ, खवल्या मांजर, अर्माडिलो यांसारख्या प्राण्यांवर संरक्षणासाठी केसांऐवजी तिक्षण काटे, खवले किंवा चिलखत असते. वटवाघूळ , उडणा-या खारी आकाशात उड्डाण घेतात, तर अनेक सस्तन बिळांत राहतात.
भूतलावारचा प्रचंड व सर्वात मोठा प्राणी निळा देवमासा समुद्रात राहतो.
मानवाचे निकटचे नातेवाईक म्हणजे विविध प्रकारची माकडे. त्यांचे वैशिष्ठ्यपूर्ण वर्तन थक्क करणारे आहे.
वाघ, सिंह, चित्ता, बिबळ्या यांसारख्या हिंस्त्र श्वापदांचे महत्व निसर्गात अन्नन्यसाधारण असेच आहे.
एक ना दोन, अशा अनेक अदभूत, आगळ्यावेगल्या व विस्मयकारक सस्तन प्राण्यांची माहिती वाचकांना मनोरंजक वाटल्याशिवाय रहाणार नाही.

लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- १२४
किंमत- ११० रुपये.