Thursday, December 23, 2010

मेह्तांची नवी पुस्तके


अरूण शौरींचे आंतरराष्ट्रीय संबंधाबाबतचे पुस्तक
वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का ?`
वाजपेयी मंत्रीमंडळातले एक मंत्री. ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषक तसेच देशातल्या राजकीय परिस्थितीचे अभ्यासक अरूण शौरी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या Will the iron fence save a tree hollowed by termites? पुस्तकाचा कॅप्टन राजा लिमये य़ांनी केलेला अनुवाद मेहता पव्लिशिंग हाऊस च्या पुस्तकात वाचायला मिळतो. `वाळवीग्रस्त वृक्षाला पोलादी कुंपण वाचवेल का ?`या नावाने अनुवादीत झालेल्या या पुस्तकात चीन, पाकिस्तान आणि बांगला देश या शेजारी राष्ट्राकडून भारताला दिली जाणारी लष्करी आव्हाने याविषयाची चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे पाहताना भारतीय नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे काश्मिरचा प्रश्न , पंजाबमधील दहशतवाद, बांगला देशींचा बेकायदा प्रवेश, नक्षलवाद अशा ज्वलंत समस्य़ेविषयीची गंभीर आणि अभ्यासपूर्ण चर्चा या पुस्तकातून मांडली आहे. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांनी हे पुस्तक संग्रही ठेवायलाच हवे.

मुखपृष्ठ -चंद्रमोहन कुलकर्णी. किंमत रु. ४५०/-
-------------------------------------------------------------

ली चाइल्डचे नथींग टू लूज
रहस्यमय थरारक असेही तरीही धर्मवेडेपण आणि अनेक भावभावनांचे मिश्रण असलेला हा जॅक रीचरचा प्रवास उत्कंठा वाढविणारा आहे.
ली चाइल्डचे हे पुस्तक केवळ एक रहस्यमय कथाच नाही तर मानवी प्रवृत्तींना शब्दात बांधण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेकाकडे वळते तेव्हा ती दुराग्रहामध्ये रूपांतरित होते. या दुराग्रहांचे माथेफिरु धर्मवेडाचे दर्शन या पुस्तकात घडेल असे अनुवादक उदय कुलकर्णीं यांनी म्हटले आहे. आशा निराशेचा खेळ या पुस्तकात भरुन राहिलेला आहे. एकदा वाचायला घेतले की ती संपेपर्यंत वाचतच रहावी अशी ही अनुवादीत कादंबरी आहे.

मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी. किंमत रु. ३५०/-
-----------------------------------------------------------

डिजिटल फॉर्ट्रेस
महासंगणकाचे विश्व उलगडून सांगणारी ही कादंबरी. मूळ लेखक डॅन ब्राऊन. अनुवादक आहेत अशोक पाध्ये. कोणीही कुठेही पाठविलेल्या गुप्त मजकुरांची उकल एक महासंगणक करतो. यामुळे परकीय हेरांचे संदेश , गुन्हेगारांचे निरोप या समाजविरोधी, राष्ट्रविघातक गोष्टींवर गोपनीयतेचा भेद करुन अमेरिकी सरकार त्यावर लक्ष ठेउ शकते. त्यासाठी एक वेगळी संस्था असते. अमेरिकेची सर्व सरकारी गुप्त माहिती एका एका डेटाबॅंकेत साठवून ठेवलेली असते.
एका गूढ मजकुराचा भेद करणारे सत्य एन एस ए संस्थेच्या गणितज्ज्ञ असणा-या संस्थेतल्या सुसानला सापडते आणि हादरवणारे नाट्य घडते.....
केवळ एका सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ कशी येते..याचा उलगडा ही कादंबरी वाचताना होणार आहे. संगणकाने निर्माण केलेली रचना, सरकारविरुध्द परिपूर्ण मानवी स्वातंत्र्य आणि एक प्रेमकथा अशा तिन्ही गोष्टीत वाचक खिळून रहातो.

मुखपृष्ठ -चंद्रमोहन कुलकर्णी. किंमत रु. ४४०/-
--------------------------------------------------

सुगरणीचं विज्ञान
भारतीय पाककलेशी निगडीत असलेल्या विज्ञानसूत्रांचा विचार करून
डॉ. बाळ फोंडके यांनी सुगरणींची दृष्टी असलेले हे पुस्तक लिहिले आहे. खाण्याजोगे अन्न तयार करणे यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात. पूर्वतयारी करावी लागते. प्रमाण किती असावे याचे व्यवधान बाळगावे लागते. ही अवधाने पार पाडताना आपण एक वैज्ञानिक प्रक्रियाच पार पाडत असतो. प्रत्यक्ष विज्ञानाशी फारशी जवळीक नसणा-या सुगरणी हे सारे सहजपणे कशा करत असतात, याचे दर्शन फोंडके यांच्या पुस्तकातून एका वेगळ्या शैलीत मांडले आहे.
सगळ्या गृहिणींनी ते वाचावे असेच आहे. यात पाककृती नाहीत. आहेत त्या पाककृती करतानाच्या वैज्ञानिक जाणीवांचे संगोपन आणि संवर्धन.

मुखपृष्ठ –फाल्गून ग्राफिक्स. किंमत रु. १८०/-
-----------------------------------------------

एक दिवस
शोभा चित्रे यांच्या अकरा ललित लेखांचा संग्रह म्हणजे अमेरिकेत ४० वर्षांहून अधिक काळ राहूनही मातीवरचे , नात्यातले आणि भाषेवरचे प्रेम यातून व्यक्त झाले आहे. साध्या, सोप्या, सरळ भाषेतून वाचकांशी संवाद साधत वाचकांच्या हृदयाचा नकळत ठाव घेण्याची त्यांची वृत्ती. संयत आणि शांत स्वभावाच्या लेखनातून त्यांनी शमविलेली वादळे ...यांची विलोभनिय चित्रफितच तुमच्या मनातून सरकत जाणार आहे.
स्मरणरंजन असो. निसर्गपरिसरातल्या वा मनातल्या एकांतात नव्याने आत्मशोध घेणे असो, कवितेवर प्रेम करणा-या या लेखिकेच्या निर्मितीत काव्यत्मतेचा सूरही मिसळून गेला आहे.
आयुष्यभर भारताबाहेर राहूनही भारतीय संवेदनशिलता जपणारे हृदयस्पर्शी लेखन म्हणजे` एक दिवस `.

मुखपृष्ठ –फाल्गून ग्राफिक्स. किंमत रु. १४०/-
-----------------------------------------



वुमन ऑन टॉप
नोकरी करणा-या प्रत्येक स्त्रीसाठी अत्यावश्यक पुस्तक
स्त्रियांना टॉप पर्यंत पोहोचताना ज्या अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागतात....याचे सारे वर्णन या पुस्तकात आहे. नोकरीच्या ठिकाणी मुसंडी कशी मारायची. स्वतःचं व्यक्तिमत्व अंतर्बाह्य कसं खुलवायचं. लैंगिक छळाला कसे तोंड द्यायचे. बॉस कोणकोणत्या प्रकाराचे असतात. घर-संसार, नोकरी यांच्यातला समतोल करिअरचे आव्हान पेलत असताना कसा सांभाळायचा..... या सा-या विषयांचा परामर्श घेणारे पुस्तक म्हणजे ` वुमन ऑन टॉप ` सीमा गोस्वामी या नाणावलेल्या लोकप्रिय पत्रकाराने लिहिलेल हे पुस्तक म्हणजे एक आदर्श नमुनाच आहे. पुस्तकाचा अनुवाद केलाय शोभना शीकनीस यांनी.

मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी.. किंमत रु. १५०/-
------------------------------------------------

द स्टार प्रिन्सिपल- रिचर्ड कोच
स्टार व्यवसाय शोधून रिचर्ड कोचने १०० मिलियन पौंडापेक्षा जास्त पैसे कमावले. कसे ते या पुस्तकात सांगितले आहे. श्याम भुर्के यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातून स्टार व्यवसायात काम करण्याचे लाभ कळणा-या महत्वाकांक्षी कर्मचा-यांसाठी हे पुस्तक मौल्यवान आहे. जबाबदारीचा अनुभव, वेगाने होत जाणारी वैयक्तिक प्रगती, चांगला पगार, भरपूर बोनस, शेअर प्राप्त होण्याची शक्यता असे अनेक लाभ स्टार व्यवसाय तुम्हाला प्राप्त करून देतो. पुस्तकाच्या वाचनाने तुम्हीही स्टार शाधू शकाल किंवा तुमचा नवा स्टार निर्माण करू शकाल.

मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी. किंमत रु. १८०/-
----------------------------------------------------

उधाण
गरीबीचं वास्तव दर्शविणा-या ह्दयस्पर्शी कथा

ग्रामीण समाजाचे अंतरंग उकलून दाखविणारी पांडुरंग कुंभार गुरूजींच्या कथा आहेत. त्यांची कथा वास्तवातील नाट्य हेरणारी आहे. त्यांच्या कथेतील विषय एकूणच मानवांच्या सखोल, सूक्ष्म, तरल मनांचा शोध घेणा-या आहेत. पात्रांच्या विविधतेमुळे , तिच्यातील कलाटणीमुळे या कथा वाचकांची उत्सुकता वाढवितात.. गुंतवून ठेवतात.

मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी... किंमत रु. १३०/-
----------------------------------------------------------

एक आधुनिक युध्द कथा
आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद
२००६ साल संपते तेव्हा छत्तीस हजार इराकी मेलेले असतात. आठशेहून जास्त अमेरिकन्स मेलेले असतात. पन्नास कोटी डॉलर्स खर्च झालेले असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना तर मारत असतातच पण अमेरिकन लष्कर आणि अमेरिकन माणसं तर तिथे कुणालाच नको असतात म्हणून मारले जात असतात.
अशा भयानक वातावरणात न्युजवीकचा वार्ताहर मायकेल हेस्टिंग्ज इराक मध्ये वार्ताहार म्हणून काम करतो. आदर्शवादी अॅण्डी सद्दामच्या पाडावानंतर इराकमधील राजकीय पक्षांना लोकशाही मूल्य प्रस्थापित करण्यास मदत करण्याच्या विचारांनी प्रेरित होउन आणि मायकेल आहे त्या देशात राहायला मिळेल म्हणून इराकमध्ये नॅशनल डेमॉक्रॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळवून बगदादमध्ये कामाला येतो

भयानक वातावरणात दोघांच्या प्रेमकथेचा अंत कसा होतो...ते अंजनी नरवणे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकात वाचता येणार आहे
निग्रहाने सर्वकाही स्पष्ट सांगत पोळून काढणारी ही कथा. काहीही न लपवता सांगितलेली., धाडसाची आणि उत्तम निरीक्षण केलेली युध्दाची आणि त्या युध्दात एका आयुष्याची हृदय पिळवटून टाकणा-या अंताची कथा आहे.
मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी... किंमत रु. २५०/-
पानगळीच्या आठवणी
लग्नानंतरच्या आयुष्यात निर्माण झालेले नवे भावबंध, नाती-गोती, मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार जोपासताना परदेशातील आयुष्यात वाट्याला आलेली अटळ धडपड ही त्यांची वैयक्तिक जरी असली, तरी वाचकाला प्रातिनिधिक वाटेल. त्याही पलीकडे जीवनातल्या एका विशिष्ट अनुभवावर लिहिता-लिहिता त्यांचे भावविश्व इतके विस्तारत गेले की तो सीमित अनुभव सर्वस्पर्शी झाला.
पानगळीच्या आठवणी ही भावनाप्रधान साहित्यकृती. जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेत जाणारी ही प्रांजळ कथा.
या पुस्तकातून शोभा चित्रे यांनी आपल्या सास-यांना झालेल्या अल्झायमर हा अपरिचित असा मांडला आहे. आजही या रोगाचे रोगी वाढताहेत. पण योग्य औषधोपचार सापडलेला नाही. हे पुस्तक वाचून चोर पावलांनी रुग्णाचा कब्जा घेणा-या या आजाराची कल्पना यावी आणि या आजाराला सामोरं जाण्याचे बळ मिळावे अशी लेखिकेची इच्छा आहे.
म्हटले तर हे आत्मकथन आहे. अमेरिकेतल्या जीवनाचा स्वीकार करून जगत असताना, बदलत्या काळाबरोबर विविध अनुभवांना तोंड देत सारे भावविश्व निर्माण केले गेले आहे.

मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी... किंमत रु. २००/-
----------------------------------------------

द मिसिंग रोझ
डायनाच्या आईनं जाण्याआधी तिच्याजवळ शेवटची इच्छा व्यक्त केली. तिला दिलेले पत्र डायनाने वाचावे असे वचन मागितले. आईच्या निळ्या डोळ्यातली आर्तता न सोसून डायनाने आईला शब्द दिला..
आई गेली..
आईच्या पत्राने डायना पुरती हादरली. महिनाभर सैरभैर होती.काय होते या पत्रात. आपल्या मरणानंतर ते पत्र वाचायला का सांगितले.....सा-यांची गुप्त उत्तरे सांगणारी कादंबरी...

मूळ लेखक- सरदार ओझकान
मराठी अनुवाद- श्रीकांत परांजपे
मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी... किंमत रु. १५०/-
-----------------------------------------------------

इन साइड दी गॅस चेंबर्स
या पुस्तकाचे महत्व म्हणजे स्वतः व्हेनेत्सिया हा ऑश्विट्झ बिकेंना इथल्या गॅस चेंबरमधल्या झॉंडरकमांडो या प्रेतांची विल्हेवाट लावणा-या तुकडीत काम करत होता. त्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आणि जगलेला हा इतिहास आहे.त्यांनी तो अतिशय संयतपणे, सत्याला धरून, फक्त स्वतः पाहिलेलेच सांगून, एक प्रकारच्या त्रयस्थ अलिप्ततेने वाचकांपुढे ठेवला आहे.
छळछावणीवर्गात वयाच्या २१ व्या वर्षी रवानगी होऊन यातून ज्या काही मोजक्या लोकांनी सुटका करून घेतली त्यापैकी श्लोमो व्हेनेत्सिया आहेत. एस. एस. या जर्मन पोलिस दलाने गॅस चेंबर्स साफ करण्यासाठी व त्या चेंबरमध्ये मारल्या जाणा-या माणसांचे मृतदेह जाळण्याकरता या ` खास गटा``ची स्थापना करण्यात आली होती.

संपादन- जीन माउटापा
इंग्रजी अनुवाद-अंड्रयू ब्राउन
मराठी अनुवाद- सुनिती काणे

मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी... किंमत रु. २००/-
---------------------------------------------

भावकल्लोळ
के. सत्यनारायण यांच्या कथानकातली पात्रे, प्रसंग, घटना, निसर्ग, ग्रामीण व निमनागरी जीवनसरणी ही मंड्या, बेंगळुर आणि आसपासची गावे यामध्ये बंदिस्त झालेली आहे. त्यात चित्रीत झालेली कुटुंबव्यवस्था आणि त्यात मुरलेले धार्मिक व पारंपरिक संस्कार हे अस्सल कर्नाटकी आहेत.
काही कथांतून आधुनिक जीवनाचे कवडसे उमटलेले दिसतात.
त्यांच्या कथांची निवेदनशैली प्रवाही आहे आणि ती भरगच्च तपशीलांने सजलेली आहे.
त्यांच्या कथेतले वेगळेपण म्हणजे कौटुंबिक जीवनशौली. कुटुंबात एकत्र राहणारी मुलेबाळे, घरात साजरे होणारे समारंभ, रीतीरिवाजांचे पालन.
भावकल्लोळमध्ये अशा पंधरा कथांचा समावेश केला गेला आहे.

मुळ कन्नड कथा- के. सत्यनारायण
अनुवाद- प्रा. एन. आय. कडलास्कर

मुखपृष्ठ –फाल्गून ग्राफिक्स... किंमत रु. १२०/-

No comments:

Post a Comment