Thursday, July 14, 2011

पुस्तकांच्या बनावट प्रतींची विक्री

मुंबईत पाच दुकानदारांवर कारवाई

स्वामित्त्व हक्काचा भंग करून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांच्या बनावट प्रती विकणाऱ्यांवर नुकतीच मुंबईत कारवाई करण्यात आली. दादरसारख्या प्रतिष्ठित भागात बनावट पुस्तकांची विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

स्वामी, ययाति, श्रीमान योगी, अमृतवेल, सिक्रेट आणि मॅजिक ऑफ थिकिंग बिग या पुस्तकांच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध असल्याचे लक्षात आले होते, अशी माहिती मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सुनील मेहता यांनी दिली. यासंदर्भात 'युआरपीआर कन्सल्टन्सी'चे संचालक मोहम्मद शेख यांनी माटुंगा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. संतोष बुक स्टॉल माटुंगा; दादर बुक शॉप, रेल्वे स्टेशनजवळ आणि स्वामीनारायण मंदिराजवळील दादर बुक शॉप या विक्रेत्यांवर याबाबत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६० हजारांहून अधिक किंमतीची पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.

स्वामित्त्व हक्क संरक्षण अधिकार असलेल्या मूळ पुस्तकांच्या बनावट प्रतींची बाजारात विक्री करणे, कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करणे या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बनावट पुस्तक विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, याबाबत ग्राहकांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रकाशकांतर्फे करण्यात आले आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9216398.cms

No comments:

Post a Comment