Saturday, July 23, 2011

जगाला आकार देणारी भाषणे


जागतिक घडामोडींना चालना देणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या भाषणांचा संग्रह अॅलन जे. व्हिटीकर यांनी 'स्पीचेस दॅट रिशेप्ड वर्ल्ड' या नावाने संपादित केला आहे. एकोणिसाव्या शतकाची सुरुवात ते २००८ असा १०० वर्षांच्या कालखंडाचा हा दस्तावेज आहे. प्रत्येक भाषणाची पार्श्वभूमी, त्यामुळे घडून आलेले बदल, परिणाम आणि घटना मोजक्या शब्दांत शेरेबाजीचा मोह टाळून वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडली आहे.

जीवाला धोका असतानाही उत्तर व दक्षिण आयर्र्लंडच्या पार्लमेंटनिमिर्तीवेळी पंचम जॉर्ज यांनी २१ जून १९२१ रोजी केलेले भाषण, नेल्सन मंडेला यांच्या मुक्ततेच्या पूर्वसंध्येला १० फेब्रुवारी १९९० रोजी एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांनी जोहान्सबर्ग येथे केलेले भाषण ही स्वतंत्र राष्ट्रनिमिर्तीची संकेतचिन्हे होती. अमेरिकेचे सर्वात तरुण व पहिले कॅथलिक अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी २० जानेवारी १९६१ला, साम्राज्यवादाला विरोध करत जागतिक शांततेसाठी अमेरिकेने पुढाकार घ्यावा असे म्हटले होते.

प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांनी स्त्री स्वातंत्र्य, स्त्रियांना राजकारणात संधी व मतदानाचा अधिकार यांविषयी २० जानेवारी १९०१ रोजी आपली परखड मते मांडली होती. माटिर्न ल्युथर किंग यांचे ३ एप्रिल १९६८ला टेनेसीत झालेले सफाई कामगार, कृष्णवणीर्यांचे प्रश्ान्, साम्राज्यवादाचा विरोध असे मुद्दे मांडणारे भाषण ऐतिहासिक ठरले. दुसऱ्याच दिवशी ४ एप्रिलला त्यांची हत्या झाली. पहिल्या महायुद्धातील अमेरिकन सहभागाचा काही अमेरिकनांनीच निषेध केला होता. प्रा. हेलेन केयर यांनी ६ जानेवारी १९१६ रोजी न्यूयॉर्क येथे सैन्य व हत्यारनिमिर्तीच्या खर्चाचा आणि आपल्या देशाने चीन, फिलीपीन्स व लॅटिन अमेरिकेत केलेल्या हस्तक्षेपाचा निषेध केला.

सर वुड्रो विल्सन यांनी युद्धग्रस्त देशांसाठी उपयुक्त अशी १४ कलमी योजना वॉशिंग्टन डी.सी.तील ८ जानेवारी १९१८च्या भाषणात मांडली. त्यावर अंमल झाला व काही काळ तरी शांतता निर्माण झाली. विल्सन पुढे शांततेच्या नोबेलचे मानकरी ठरले. इटलीच्या राज्यविस्तारा-साठी अॅबेसिनियावर हल्ला करण्याच्या आदल्याच दिवशी २ ऑक्टोबर १९३५ रोजी रोममध्ये मुसोलिनीने दिलेले भाषण, इराकवर हल्ल्याची गरज स्पष्ट करत अमेरिकी, पोलिश, डॅनिश व ऑस्ट्रेलियन सैन्याचे मनोबल वाढविणारे जॉर्ज बुश यांचे ७ ऑक्टोबर २००२चे भाषण आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजांनी ब्रिटन व फ्रान्सच्या सैन्याला बराच काळ डंकर्कच्या सागरी किनाऱ्यावर अडकवून ठेवलेले असताना विन्स्टन चचिर्ल यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ४ जून १९४० रोजी केलेले प्रभावी भाषण, ही सारी जागतिक उलथापालथींना कारणीभूत ठरली.

एलिनॉर रुझवेल्ट यांचे लोकशाही व मानवाधिकारांचा पुरस्कार करणारे पॅरिस येथील भाषण, बेनझीर भुत्तो यांच्या अमेरिकन पार्लमेंटमधील ७ जून १९८९ रोजीच्या भाषणात अफगाणिस्तानात लोकशाहीची केलेली अपेक्षा व मध्य आशियातील रशियन हस्तक्षेपाला केलेला विरोध, हिलरी क्लिंटन यांनी चीनमध्ये विमेन्स कॉन्फरन्समध्ये ५ सप्टेंबर १९९५ला केलेल्या भाषणात जगभरातील स्त्रियांच्या दु:स्थितीचा घेतलेला आढावा वाचनीय आहे. अरब-इसायल संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्नशील गोल्डा मायर यांचे २६ मे १९७० रोजीचे भाषण आणि १७ जुलै १९९८ रोजी तत्कालीन रशियन अध्यक्ष बोरिस येल्तसीन यांनी सेंट पीटर्सबर्गला सर्व प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे झार व त्याच्या कुटुंबीयांच्या हत्येची मागितलेली माफी हे सर्व शांतता प्रस्थापनेचे प्रयत्न होेते.

फिडेल कॅस्ट्रो यांचे सॅन्टियागो कोर्टापुढील १६ ऑक्टोबर १९६३चे 'हिस्टरी विल अॅब्सॉर्ब मी' हे गाजलेले भाषण, २० एप्रिल १९६४ला प्रिटोरिया कोर्टापुढील नेल्सन मंडेला यांचे 'आय अॅम द र्फस्ट अक्युज्ड' हे २७ वर्षांच्या प्रदीर्घ बंदिवासाला कारणीभूत ठरलेले भाषण, आँग सान स्यु की यांचे २६ जानेवारी १९९७चे 'फ्रीडम ऑफ थॉट्स' हे त्यांचे पती डॉ. मायकेल अॅरिस यांनी वाचून दाखवलेले भाषण आणि अहमदाबादेत कोर्टापुढे १८ एप्रिल १९२२ रोजी महात्मा गांधींनी केलेले भाषण ही राजकीय आणि मानवी हक्कांची सनदच ठरली.

- रोहन कदम

संपादक: अॅलन जे. व्हिटीकर,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
पाने: ३०२, किंमत: ३०० रुपये.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9330601.cms

No comments:

Post a Comment