Saturday, October 1, 2011

हे विश्वची माझे घर


एकूणच संज्ञापन क्षेत्रात, विविध माध्यमात सध्या क्षणोक्षणी नवे काहीतरी घडत आहे आणि त्यांचा मागोवा घेताना सर्वांचीच दमछाक होत आहे. प्रकाशन क्षेत्रातही ई-बुक्समुळे अघोषित क्रांतीचे वारे वाहत आहेत. ई-बुस्कची विक्री वाढतच आहे आणि ई-बुक्सच्या स्वरुपात उपलब्ध होणा-या पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस नवे टप्पे गाठत आहे.

पूर्वी मुद्रित स्वरुपातील पुस्तकांच्या संदर्भात बेस्टसेलरचे आकडे अभिमानाने सांगण्यात येत, यापुढच्या काळात ई-बुक्सच्या, डिजिटल आवृत्त्यांच्या खपाचे आकडे हे ऐकून घेण्याची सवय करुन घ्यावी लागेल. सर्वच क्षेत्रातील खरेदी –विक्रीची आकडेवारी जमवून, त्यांचे विश्लेषण करणा-या अद्ययावत यंत्रणा उभारल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच व्यवहारांची नेमकी कल्पना येऊ शकते.

भारतात त्या दृष्टीने अजून खूप काम होणे बाकी आहे, पण जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि उत्तम प्रकारच्या माहिती –तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्यालाही अद्ययावत् सर्वंकष आकडेवा-यांच्या आधारे पारदर्शी आर्थिक व्यवहाराच्या दिशेने वाटचाल करणे नजिकच्या काळात आवश्यक ठरेल. मुद्रित पुस्तकांचा खप आणि डिजिटल पुस्तकांचा खप यांचे नेमके आकडे मिळत गेले तर मुद्रित पुस्तकांना भारतात तरी अजून दहाविस वर्षे तरी कसलाही धोका नाही असे समजून निर्धास्त राहणा-या प्रकाशक-विक्रेत्यांची आजची मानसिकता कायम राहिल असे वाटत नाही.

अमेरिका, इग्लंड, जर्मनी, फ्रान्स वगैरे देशातील प्रकाशन संस्थांना आणि ग्रंथ विक्रेत्यांना प्रत्यक्ष व्यवहारात याची झळ जाणवू लागल्याने, पुस्तक विक्रिकरणा-या संस्था बंद पडत आहेत, दिवाळखोरीत जात आहेत किंवा आपल्या व्यवसायाची पुर्नरचना करीत आहेत.

या व्यवसायातील अनेक कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळत आहे. या क्षेत्रातील आर्थिक मंदिमुळे गेल्या तीन वर्षात सर्वच क्षेत्रात निराशाजनक परिस्थिती आहे. पारंपारिक पुस्तकांच्या विक्रीवर या मंदीचा परिणाम झाला आहे. त्या मंदीबरोबरच ई-बुक्स पासून आम्हाला कसलीहि स्पर्धा नाही असे दोन-तीन वर्षापूर्वी म्हणणारे प्रकाशक-विक्रेते आता स्वतःच काळाची गरज म्हणून डिजिटल पुस्तकांच्या निर्मितीची आणि विक्रिची यंत्रणा उभी करीत आहेत.

किंडल, नूक वगैरे वाचनयंत्राचा आणि आयपॅड, मोबाईल वगैरे साधनांचा वापर करून ई-बुक विक्रिच्या क्षेत्रात पाय रोवण्य़ाचा प्रयत्न करीत आहेत. ऐमेझॉन, बार्न्स अंड नोबेल वगैरे विक्रेत्याचा अनुभव असा आहे की, हार्डकव्हर पुस्तकांच्या तुलनेत ई-बुक्सना जास्त मागणी आहे. आणि ई-बुक्सचे ग्राहक हे छापील पुस्तकांच्या ग्राहकापेक्षा अधिक, सुमारे तिप्पट पुस्तके वाचत आहेत.


सुनिल मेहता,
संपादक, मेहता ग्रंथजगत

(क्रमशः------मेहता ग्रंथजगत स्पटेंबर २०११च्या अंकातून)

No comments:

Post a Comment