Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, August 21, 2012
अंतरीचा दिवा
वि. स. खांडेकर
वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे.
मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता.
आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल !
वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा..
संपादक- डॉ. सुनीलकुमार लवटे
पृष्ठे- ५८८
किंमत- ५५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.
वि. स खांडेकर १९३६ ते १९६२ या सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात पटकथाकार, संवादलेखक आणि गीतकार म्हणून सक्रिय होते. या काळात मराठीत १४, हिंदीत १०, तर तेलगू-तमिळमध्ये प्रत्येकी २ अशा २८ चित्रपटांची निर्मिती झाली.
त्यांच्या अधिकांश पटकथा मूळ होत्या, तर एक-दोन आधारित. विषयांच्या अंगांनी अधिकांश कथा सामाजिक. काही एक पौराणिकही,. सा-या कथा माणुसकी, समता, समाजवाद, मूल्यमहिमा, आदर्शवाद, बोध, ध्येय नि ध्यास इत्यादिंची जपणूक करणा-या होत्या. त्यांच्या पटकथांमागे समाज बदलण्याचं ध्येय आणि ध्यास होता. त्या रंजक करण्यासाठी त्यांनी प्रेम, प्रणयही चित्रित केला; पण ते त्यांचं लक्ष्य नव्हतं. चित्रपट यशस्वी करण्याचं साधन म्हणून, पट रंजक व्हावा म्हणून केलेला तो प्रयत्न असायचा. आधारित कथा मात्र त्यांनी निखळ मनोरंजनासाठी लिहिल्या. पटकथांमध्ये चारित्रिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक द्वंद ठरलेलं. अधिकांश कथा शोकात्म होत्या. काही सुखान्तही. द्वंद्वात सुष्ट, सत्वपक्षाची सरशी ठरलेली. वि.स.खांडेकरांनी आपल्या पटकथा मेलोड्रामा, फॅंटसी, सटायर म्हणून लिहिल्या. कथा जशी घडली तशी लिहिण्याचा त्यांचा प्रघात होता. अपवाद म्हणून एखादी पूर्वदीप्ती शैलीविकासाची कथाही आढळते. त्यांच्या पटकथा एक विशिष्ट खांडेकरी वळणवाट घेऊन येतात, विकसित होतात.
खांडेकरांचे चित्रपटातील संवाद छोटे, सहज आहेत. त्यांत विचार, विवेक, सिंध्दांत आपसूक असतातच. त्यांची साहित्यातील सुंदर शब्दकळा इथेही भेटते. अनुप्रास, उपमा हा संवादाचा अविभाज्य भाग असतो. संवादात खोच, कोपरखळी, कोटीही असते. संवादातून कथाविकास, चरित्रचित्रण होत राहतं. नाटककाराचा मूळ पिंड असेलेले खांडेकर कथेत संवादातून नाटकीय प्रसंगांची पेरणी चपखलपणे करीत तो खुलवत राहतात.
प्रसंगानुरूप गीत, गाण्यांची रचना करण्यात वि. स. खांडेकर वाकबगार होते. प्रसंगानुकूल गीतरचना हे त्यांच्या चित्रकथाचं वैशिष्ठ्य. त्यांची गीतं ही प्रेम, प्रणय, निसर्ग, भाव यांचे वर्णन करीत विकसित होतात. गीतं लयबध्द असतात तशीच नादमधुरही, ती छंदयुक्त अधिक, काही कथांमध्ये त्यांनी अन्य प्राचीन आणि समकालीन कवींच्या रचनांचा उपयोग करण्याचा द्रष्टेपणा दाखविला. या रचनेनं त्यांचे चित्रपट बोधगम्य आणि रम्य होण्यास साह्य झालं आहे.
( पुस्तकाच्या प्रस्तावनेतूनः डॉ. सुनीलकुमार लवटे)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment