Friday, October 7, 2011

चाय, चाय...



रेल्वेचा आवाज आणि शिट्ट्या यांचा सहवास लाभलेल्या जंक्शनचे नागरी प्रवास वर्णन

भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानके जीवनाच्या स्वादापासून पूर्ण भिन्न असतात. रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जिवन जाणून घण्यासाठी लेखक विश्वनाथ घोष मुद्दाम ह्या शहरात फिरले......
`बळी तो कान पिळी` ह्या उक्तीच्या अगदी विरुध्द वर्तणुकीचा प्रारंभ होतो, तो मध्यप्रदेशातील इटारसी ह्या मोठ्या रेल्वे जंक्शनपासून. उत्तर व दक्षिण भारताला भौगोलिक पातळीवर वेगळे करणा-या विंध्य पर्वताच्या कुशीत हे चिमुकले शहर वसलेले आहे. बहुतेक रेल्वे गाड्या इटारसीला थोडा वेळ जास्त थांबतात. इथे मी दोन आलू बोंडे विकत घेतले, ते हिरव्या मिरचीबरोबर कागदात बांधून दिले जातात. चमचमीत उत्तर भारतीय पदार्थ चाखण्याची ही माझी शेवटची संधी होती. दुस-या दिवशी सकाळपासून बोड्यांपासून सगळे पदार्थ दक्षिण भारतीय शैलीचे असणार होते. मी फलाटावर उभा राहुन आलू बोंड्यांचा आस्वाद घेत होतो. तेव्हा येणा-या, जाणा-या , उशीर झालेल्या किंवा होणा-या रेल्वे गाड्यांची घोषणा करणारा स्त्रीचा आवाज माझ्या कानावर पडत होता: बोंडे संपवायला मला जो काही क्षणांचा वेळ लागला, तेवढ्या वेळात मी भारताच्या कानाकोप-यातील बहुतांशी स्थानकांची नावे ऐकली- अमृतसर, मुंबई, गुवाहाटी, त्रिवेंद्रम, हावरा, मद्रास. थोडक्यात सांगायचे तर देशाच्या एका कोप-यापासून दुस-या कोप-यापर्यंत प्रवास करणा-या प्रतेकाला `इटारसी` हे स्थानक मध्ये लागणार होते. मग ते मुंबई-कोलकत्ता असो, दिल्ली-मद्रास असो, कोची-गुवाहाटी असो किंवा अगदी अहमदाबाद-हैद्राबाद असो. इटारसीचे रेल्वे नकाशावरचे पद इतके अढळ अणि महत्वाचे आहे की, जर कुणी इटारसी स्टेशनचे रेल्वे रुळ उडवून लावले तर सगळ्या देशामध्ये अनेक दिवस गोंधळ माजेल आणि संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत होईल. पण तरीही भारताच्या राजकीय नकाशावर मात्र इटारसीला काहीही अस्तित्व नाही.
इटारसी मध्ये काम करणारी व्यक्ती तुम्हाला क्वचितच भेटेल. इटारसीच्या पत्त्यावर तुम्ही पत्र टाकण्याची शक्यता नाही. इटारसी हे फक्त रेल्वे स्थानक आहे. जिथे तुम्ही चहा प्यायला किंवा थोडे फार खायला उतरता आणि पुढच्या प्रवासाला लागता. परंतु ज्या शहरातून दर क्षणाला वेगवेगळ्या संस्कृतिचे आणि पंरपरेचे लोक पुढे जातात, ते शहर रेल्वे स्थानकाबाहेर कसे दिसत असेल?
अशाच प्रकारे मुघल सराईच्या उल्लेखामुळे एखाद्या बंगाली किंवा बिहारी माणसाच्या मनात केवळ एका गजबजलेल्या रेल्वे फलाटाची प्रतिमा उभी राहिल. तसेच दक्षिणेमध्ये नियमित प्रवास करणा-या एखाद्या तामीळ किंवा मल्याळी व्यक्तिच्या बाबतीत जोलारपेटमुळे होईल.
ह्या शहरांची इतर गजबजलेल्या शहरांप्रमाणे कल्पना करणे, ह्या लोकांना अशक्य वाटेल. ह्या शहरातील लोकांचा सुध्दा इतर शहरातील लोकांप्रमाणेच रोजचा दिनक्रम असेल अशी कल्पनाच करता येणार नाही. कारण ही स्थळे म्हणजे त्यांच्या मुक्कामाची स्थळे कधीच नसतात. तर ती मुक्कामाच्या स्थळी पोचण्याच्या मार्गाचा केवळ एक भाग असतात.
मग रेल्वे कंपार्टमेंटच्या दारात उभे राहून `चाय, चाय.`..ओरडणा-या चहावाल्याची वाट बघत उभे रहाण्यापेक्षा गंमत म्हणून या स्थळांना भेट द्यायला काय हरकत आहे ? ती स्थळे सुध्दा त्यांच्या कथा ऐकायला कोणीतरी यावे म्हणून कदाचित वाट बघत असतील......

बिश्वनाथ घोष
अनुवाद- पूर्णिमा कुंडेटकर
पृष्टे- १६६
किंमत- १५० रुपये

Saturday, October 1, 2011

हे विश्वची माझे घर


एकूणच संज्ञापन क्षेत्रात, विविध माध्यमात सध्या क्षणोक्षणी नवे काहीतरी घडत आहे आणि त्यांचा मागोवा घेताना सर्वांचीच दमछाक होत आहे. प्रकाशन क्षेत्रातही ई-बुक्समुळे अघोषित क्रांतीचे वारे वाहत आहेत. ई-बुस्कची विक्री वाढतच आहे आणि ई-बुक्सच्या स्वरुपात उपलब्ध होणा-या पुस्तकांची संख्या दिवसेंदिवस नवे टप्पे गाठत आहे.

पूर्वी मुद्रित स्वरुपातील पुस्तकांच्या संदर्भात बेस्टसेलरचे आकडे अभिमानाने सांगण्यात येत, यापुढच्या काळात ई-बुक्सच्या, डिजिटल आवृत्त्यांच्या खपाचे आकडे हे ऐकून घेण्याची सवय करुन घ्यावी लागेल. सर्वच क्षेत्रातील खरेदी –विक्रीची आकडेवारी जमवून, त्यांचे विश्लेषण करणा-या अद्ययावत यंत्रणा उभारल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच व्यवहारांची नेमकी कल्पना येऊ शकते.

भारतात त्या दृष्टीने अजून खूप काम होणे बाकी आहे, पण जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि उत्तम प्रकारच्या माहिती –तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्यालाही अद्ययावत् सर्वंकष आकडेवा-यांच्या आधारे पारदर्शी आर्थिक व्यवहाराच्या दिशेने वाटचाल करणे नजिकच्या काळात आवश्यक ठरेल. मुद्रित पुस्तकांचा खप आणि डिजिटल पुस्तकांचा खप यांचे नेमके आकडे मिळत गेले तर मुद्रित पुस्तकांना भारतात तरी अजून दहाविस वर्षे तरी कसलाही धोका नाही असे समजून निर्धास्त राहणा-या प्रकाशक-विक्रेत्यांची आजची मानसिकता कायम राहिल असे वाटत नाही.

अमेरिका, इग्लंड, जर्मनी, फ्रान्स वगैरे देशातील प्रकाशन संस्थांना आणि ग्रंथ विक्रेत्यांना प्रत्यक्ष व्यवहारात याची झळ जाणवू लागल्याने, पुस्तक विक्रिकरणा-या संस्था बंद पडत आहेत, दिवाळखोरीत जात आहेत किंवा आपल्या व्यवसायाची पुर्नरचना करीत आहेत.

या व्यवसायातील अनेक कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळत आहे. या क्षेत्रातील आर्थिक मंदिमुळे गेल्या तीन वर्षात सर्वच क्षेत्रात निराशाजनक परिस्थिती आहे. पारंपारिक पुस्तकांच्या विक्रीवर या मंदीचा परिणाम झाला आहे. त्या मंदीबरोबरच ई-बुक्स पासून आम्हाला कसलीहि स्पर्धा नाही असे दोन-तीन वर्षापूर्वी म्हणणारे प्रकाशक-विक्रेते आता स्वतःच काळाची गरज म्हणून डिजिटल पुस्तकांच्या निर्मितीची आणि विक्रिची यंत्रणा उभी करीत आहेत.

किंडल, नूक वगैरे वाचनयंत्राचा आणि आयपॅड, मोबाईल वगैरे साधनांचा वापर करून ई-बुक विक्रिच्या क्षेत्रात पाय रोवण्य़ाचा प्रयत्न करीत आहेत. ऐमेझॉन, बार्न्स अंड नोबेल वगैरे विक्रेत्याचा अनुभव असा आहे की, हार्डकव्हर पुस्तकांच्या तुलनेत ई-बुक्सना जास्त मागणी आहे. आणि ई-बुक्सचे ग्राहक हे छापील पुस्तकांच्या ग्राहकापेक्षा अधिक, सुमारे तिप्पट पुस्तके वाचत आहेत.


सुनिल मेहता,
संपादक, मेहता ग्रंथजगत

(क्रमशः------मेहता ग्रंथजगत स्पटेंबर २०११च्या अंकातून)

Tuesday, September 27, 2011

ठसा उमटविणा-या नामवंतांच्या लेखांचा दिवाळी अंक


मेहता मराठी ग्रंथजगत- दिवाळी अंक

मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने दरमहा मेहता मराठी ग्रंथजगतचा अंक प्रसिद्द केला जातो. आक्टोबर २०११चा अंक दिवाळी अंक म्हणून घरोघर वाचला जाणार आहे. सुमारे ५ हजार वर्गणीदार असणा-या ह्या दिवाळी अंकांचे संपादक सुनिल मेहता असून कार्यकारी संपादक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शंकर सारडा काम पहात असतात.

विशिष्ठ कार्यक्षेत्र निवडून त्यात स्वतःला झोकून देउन त्या कार्यक्षेत्रावर स्वतःचा ठसा उमटविणा-या नामवंतानी या दिवाली अंकात लेखन केले आहे. यात द.भि. कुलकर्णी, चंद्रकुमार नलगे, डॉ. अनंत फडके, डॉ. आनंद पाटील, माधव गाडगीळ, महावीर जोंधळे, ह.मो.मराठे, निरंजन घाटे शांतीलाल भेडारी यांचे लेख आहेत.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा लेखन मेजवानीचा फराळ दिवाळीपूर्वी वाचकांच्या हाती लागणार आहे.

दिवाळी निमित्त पुस्तकांचा `लूट` महोत्सव


मेहता पब्लिशींग हाऊसच्या वतीने खास दिवाळीसाठी भरगच्च ३५ टक्के सवलत असलेला पुस्तकांचा लूट महोत्सव १ आक्टोबर पासून दहा दिवस आयोजित केला आहे. वाचकांनी दिवाळीचा आनंद पुस्तके खरेदी करून आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचून साजरा करावा. यासाटी खास सवलतीत पुस्तकांचा हा महोत्सव आयोजित केला असल्याचे सुनिल मेहता यांनी सांगितले.

नेहमी वाचकांना थेट सवलत फारशी मिळत नाही म्हणून पुस्तके खरेदीची लूट करून दिवाळीचा आनंद लुटावा यासाटी १ ते १० आक्टोबर या कालावधीत पुण्यातल्या मेहता पब्लिशींग हाऊसच्या बाजीराव रोडवरच्या शोरुम मध्ये आणि पाटील एंटरप्राईजेस, आप्पा वळवंत चौक, पुणे इथे हा महोत्सव वाचकांना आकर्षित करेल. अधिकाधिक वाचक या ३५ टक्के सवलतीचा लाभ घेऊन मेहता प्रकाशनाची पुस्तके खरेदी करतील अशी अपेक्षा आहे.

मात्र या सवलतीत स्वामी, श्रीमानयोगी, रुचिरा, संभाजी, ययाती आणि वितरणाच्या पुस्तकांचा समावेश नाही.


संपर्कासाठी पत्ता-
मेहता पब्लिशींग हाऊस,
१९४१, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी, बाजीराव रोड,
पुणे-३०
फोन- (०२०) २४४७६९२४ किंवा २४४६०३१३

मेहता प्रकाशनाची ५० पुस्तके चार महिन्यात



वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणा-या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने गेल्या चार महिन्यात नविन ५० पुस्तके मराठी वाचकांसाठी प्रकाशित करून त्यांनी प्रकाशन व्यवसाय स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. यात नवीन लेखकांची, इंग्रजीतल्या अनुवादित पुस्तकांचा आणि राज्याबाहेरच्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
दर महिन्याला सुमारे बार ते तेरा पुस्तकांची नव्याने निर्मिती करणारी मेहता पब्लिशिंग हाऊस ही एकमेव प्रकाशन संस्था आहे.

यातली काही ठळक-

युथेनिशिया (स्वाती चांदोरकर), ती दोघं (डॉ. रमा मराठे), ए रशियन डायरी (अनु. शोभा शिकनिस), थ्री कप्स ऑफ टी (अनु. सिंधु जोशी), हात विधात्याचे (अनु. नीला चांदोरकर), मी का नाही (पारू मदन नाईक), स सुखाचा (अनु. शुभदा विद्वांस), द प्राईस ऑफ लव्ह (अनु. मीना टाकळकर), फिप्टी इअर्स ऑफ सायलेन्स (अनु. नीला चांदोरकर), शब्दचर्चा ( डॉ. म.वा. कुलकर्णी), अल्टिमेटम् (अनु. सुदर्शन आठवले), माय स्ट्रोक ऑफ इन्साईड (अनु. दिगंबर बेहरे), दॅट विथ कॉल लव्ह ( अनु. श्यामल कुलकर्णी), कीप ऑफ द ग्रास (अनु. माधुरी शानभाग), धन्वंतरी घरोघरी ( डॉ.ह.वि. सरदेसाई- डॉ. अनिल गांधी), ब्रेन प्रोग्रॅमिंग (डॉ. रमा मराठे), कॅन्सर रोखू या (अनु. वन्दना अत्रे, डॉ. चंद्रकांत संकलेचा), मेल्टडाऊन (अनु. सुभाष जोशी), मी संपत पाल (अनु. सुप्रिया वकील).

वाचक आणि विक्रेते दोघांकडूनही या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या स्वतंत्र वाटेवर चालताना मराठी प्रकाशन व्यवसायात स्वतंत्र ठसा उमटविण्याचा मेहता पब्लिशिंग हाऊसचा नेहमीच प्रयन्त राहिलेला आहे.

Saturday, September 17, 2011

मेल्टडाऊन


तुमच्या देखत तुमचं जग कोलमडून पडत असताना तुम्ही पळणार तरी कुठे...

सॅम्युएल स्पेन्डलव्ह फार घातक खेळ खेळत आहे. बर्टनच्या साम्राज्याशी टक्कर घेतलेल्या दलालाची, त्या गूढव्यक्तिमत्वाच्या खानची गुप्तपणे माहिती मिळवण्याचं काम प्रसारमाध्यमांच्या अनभिषिक्त सम्राटासाठी करण्याचं त्याने मान्य केलं होतं, कारण बर्टनला खानचा सूड घ्यायचा होता.
हे काम त्याला पॅरिसच्या शेअर बाजारातून करायचं होतं. सुरवातीला तिथलं तणावग्रस्त वातावरण सॅम्युएलला भावलं नाही, पण नंतर तो रुळला आणि त्याला ते आवडायला लागलं. काही काळ सगळं सुरळीत चाललेलं होतं...
पण प्रसंगी एकमेकांचे गळेसुध्दा कापणा-या या आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारातल्या धसमुसळ्या वातावरणात काहीच गृहित धरून चालत नाही. जेव्हा त्याची आकर्षक सहकारी, गुढरित्या अचानक नाहीशी होते, तेव्हा त्याचं जग एक एक तुकड्यानी कोलमडायला लागतं.
जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोसळायला लागली, तेव्हा त्यासाठी सॅम्युएलला जबाबदार ठरवण्यात आलं आणि मग सगळेच त्याच्या मागे लागले...शत्रु, सहकारी आणि अर्थातच पोलीसही...
लपण्यासाठी जेव्हा त्याने पॅरिसच्या अंडरवर्ल्डमध्ये आसरा घेतला, तेव्हा तिथे कपल्पनेपेक्षाही भयानक प्रकार चालत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्याने सुरवातीला जो खेळ मांडला होता, त्याचे नियम आता पार बदलले होते.
त्याचं जग कोलमडून पडयच्या आधी त्याला सत्य समजणार होतं कां.
....कारण एक गोष्ट अटळ होती.....
,.......मेल्टडाऊन.

मुळ लेखक- मार्टिन बेकर
अनुवाद- सुभाष जोशी

पृष्ठे-३३६ किंमत- ३००


शेअरबाजारात असणारे खळबळजनक वातावरण, खून, जगाची आर्थिक व्यवस्था उलथून टाकण्य़ाचा प्रयत्न .....हे सगळं या कादंबरीत आहे...
- द टाइम्स

कॅन्सर रोखू या


एक सजग जीनवशैलीसह
Anticancer. A New Way of Life या पुस्तकाचा मराठी अनुवाद
निरोगी पेशी कॅन्सरग्रस्त होतात कशा...आणि कोणामध्ये

मुळ लेखक- डॉ. डेव्हिड सर्व्हन-श्रायबर
अनुवाद- वन्दना अत्रे. डॉ. चंद्रकांत संकलेचा

वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी
कॅन्सर हा विकार आजही असाध्य समजला जातो.
कारण मानसिक व शारीरिकदृष्ट्या रुग्णावर
मोठा आघात करणा-या या आजारावर अजून तरी
रामबाण उपाय साहडलेला नाही...
अधुनिक जीवनशैलीचा शाप म्हणून आज
मोठ्या प्रमाणात कॅन्सर आपल्यासमोर येत आहे.
अधुनिक उपचार आणि मानसिक संतुलन शिकविणारे
पारंपारिक भारतीय शिक्षण व आहारपध्दती या दोघांचा
मेळ साधल्यास कॅन्सरशी सामना करणे तुलनेने
सोपे जाते, ही वेगळी द्ष्टी या पुस्तकातून मिळते.

पृष्ठे- १८४
किंमत- १८०