Saturday, February 18, 2012

मातीखालची माती



उन्हाळा पडला की, बापू मांगाचे नावसुध्दा आमच्या तसरीला कोणी घेत नाही. त्याच्या कोणी पाळतीवर रहात नाही. त्याने चोरलेलेला कडबा पकडण्यासाटी जोंधळ्यात कोणी लपून बसत नाही. गवत कापताना धरण्यासाठी कोणी झाडावर चढून बसण्याची तसदी घेत नाही. जो तो शेतकरी आपल्या कामात दंग होऊन जातो.

पावसाळ्यात मात्र वेगळं असतं. बापू ह्या तसरीला कालवा उसळून देतो. इथं आहे तर तिथं आहे. इथं गेला तर तिथं गेला; असं करून सोडीत असतो. त्यावेळी शेतक-याचं मन थारी नसतं. कोणी कोणी तर पहाट चांदणी मोहरायला शेतात येतो. कामाला लागतो. मग दहिवर असू दे; नाहीतर कडक थंडी असू दे. कोणी रातचं चिखल तुडवीत वसतीला येतो. चिखलातले कुचके काटे पायांची चाळण करुन टाकतात. प्रत्येक काट्याला बापूला शिवी हासडली जाते. कोणी हारमाळ टळवून, वकून चुकवून कुठं तरी दडून बसतात. बापूवर ज्याची त्याची पाळत असते. कोणी बेंडील माणूस बापूला पकडून चावडीत अडकवून टाकण्याचे इमले रचीत असतो, तर कोणी मवाळ शेतकरी बापूला समजुतीने वागवून घेतात. एखाद्या वेळेला भारं-दोन भारं वैरण देऊन गप बसतात. कधी आपल्याच ढोरांना वैरण नाही; म्हणून बापूला तोंडानंच घालवतात...बापू मग गप निघून जातो.


( पुस्तकातल्या `बापू` या कथेमधून)

लेखक- आनंद यादव
पृष्ठे- १३८
किंमत-१४० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी


ग्रामीण जीवनातील हे विविध दर्शन अस्स्लल शैलीतला हा आविष्कार.
मातीवर उगवलेल्या कोवळ्या अंकुराइतकीच लेखकाच्या मनाला
मातीतल्या गहि-या थरांची ओढ लागली आहे...
ही विविध व्यकितचित्रे संवेदनाशील मनाने टिपली आहे.
त्यातला प्रत्येक माणूस जिताजागता वाटतो....
आणि त्यासोबत बाचकांच्या मनालाही अंकुर फुटतो.
सभोवारच्या माणसांचेही माणूसपण त्यांच्या मनाला जाणवू लागते.
ती जाणीव मनातल्य़ा मातीत रुजते., बहरते...
असे हे जिवंत पुस्तक आणखीही खूपसे पालवून जाते!

No comments:

Post a Comment