Tuesday, September 13, 2011

खळाळ




लेखक- आनंद यादव

आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला
तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती.
कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला,
त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती,
दीन-दुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ
हे सर्व गुण जातीवंत व कसदार होते
पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला
कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा,
असा उत्कट ध्यासही त्यांना होता.
या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामर्थ्याची
कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले.
या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला.
या शोधाच्या आधारे ग्रामीण दुखाःच्या चिंतनात्मक निवेदनाचा
जाणीवपूर्क प्रयत्न त्यांनी आपल्या कथातून केला.
या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले.
मराठी ग्रामिण कथेच्या विकासातला हा महत्वाचा टप्पा आहे.....
-प्रा. म. द. हातकणंगलेकर

आवृत्ती चौथी
पृष्ठे- १५८
किंमत- १४०

ब्रेन प्रोग्रॅमिंग



नकारात्मक विधानं उलच करा,...सकारात्मक बनवा.
• माझ्या नशीबात सुखच नाही. मी कमनशीबी आहे.
(उलट विधान) मी नशीबवान आहे. मी नेहमी आनंदात असते. मी समाधानी आहे.
*मला लोक खूप त्रास देतात.
(उलट विधान) मला कुणी ना कुणी मदत करणारं भेटतंच. त्रासदायक लोक जगात असले तरी मला मदत करणारीही खूप माणसं भेटतात.
• मी गरीबातच खितपत पडणार.
(उलट विधान) मी श्रीमंत होत आहे. अनेक श्रीमंत लोक गरिबीतून वर आलेले असतात. ही सुरवातीची गरिबीच त्यांना प्रेरणा देते. मलाही काही मार्ग सापडेलच आणि मी श्रीमंत होणारच.
*मी बुध्दीमान, हुशार नाही.
(उलट विधान) परमेश्वर रिकाम्या हातानी कुणालाच पाठवित नाही. मलाही त्यानं काही देणग्या दिलेल्या असतीलच. कदाचित अजून माझ्यातल्या गुणवैशिष्ठ्य़ांची जाणीव मला झालेली नसेल, पण माझ्यातही अशी गुणवैशिष्ठ्ये कोणती, हे मी शोधून काढीनच. परमेश्वरानं जी काही बुध्दी, गुण दिले आहेत. त्यांचा उपयोग करून देण्याचा शहाणपणा माझ्याकडे आहे.
*माझं व्यक्तिमत्व प्रभावशीली नाही.
(उलट विधान) माझ्यात काहीतरी वेगळेपणा निश्तिच आहे. माझ्यातल्या गुणवैशिष्ठ्यांचा शोध घेऊन मी माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवीत आहे.
*माझे मित्र मला नेहमी फसवितात.
(उलट विधान) मी इतरांना फसवीत नाही आणि इतरांकडून फसवूनही घेत नाही. तेवढं चातुर्य़ माझ्यात निश्चित आहे. मी हितैषी व्यक्तीशीच मैत्री करतो....

ब्रेन प्रोग्रॅमिंग
डॉ. रमा मराठे

ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळे आयुष्यात घडू शकणारे चमत्कार उलगडून दाखविणारे पुस्तक
पृष्ठे- १६०
किंमत- १५०

मी रूक्मिणी


श्रीकृष्णाच्या पट्टराणीने उलगडलेल्या तिच्या मनातील भावभावनांचे आत्मनिवेदन
लेखिका- सुवर्णा ढोबळे
श्रीकृष्णावरचे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध असले, तरी रुक्मिणीवर रूक्मिणीस्वयंवराचा प्रसंग वगळता अन्य प्रकारे फारसे लेखन झाल्याचे नाही. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून आपले हरण करण्यास सांगितले, हे सर्वश्रुत असले तरी श्रीकृष्ण प्रदीर्घकाल व्दारकेबाहेर असताना व्दारकेचा राज्यकारभार खंबीरपणे हाताळणारी आणि उत्तम निर्णयक्षमता असलेली राज्यकर्ती ही रुक्मिणीची ओळख या पुस्तकातून समोर येते. अन्य सात राज्यांवर आपल्या पट्टराणीपदाचा पुरेसा वचक ठेऊनही त्यांच्याशी स्नेहाचे संबंध राखून राणीवशातील वातावरण शांत व स्थिर ठेवण्याचे कर्तव्यही रुक्मिणीने पार पाडले.
रुक्मिणीच्या भावभावना व्यक्त करत श्रीकृष्णाच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम तिच्याच शब्दत उलगडत नेण्यात आला आहे.
रुक्मिणीचा जन्म, तिच्या जीवनातील घटना या संपूर्णपणे वास्तवाशी संबंधीत आहेत. महाराणी द्रौपदी किंवा राजमाता कुंतीयाच्या जीवनातील अनेक प्रसंगाभोवती मंत्र, तंत्र, चमत्काराचे वलय आहे. तसे या व्यक्तिरेखेच्या जीवनप्रवासातील घटानांशी नाही. तिला मनःशक्तीच्या सामर्थ्याने काही घटनांचा प्रत्यय किंवा पूर्वसूचनांची प्रचिती काही प्रसंगी आली होती. पण ते तिच्या मनःशक्तीचे बळ होते.
महाभारत, यादवांचा कुलसंहार येथपर्यंत संपूर्ण जीवनपट रुक्मिणी स्वतःच आत्मकथनाच्या स्वरुपात मांडते. तिचे अन्य सर्वांशी असलेले नाते उलगडता उलगडताच अखेरीस तिला आपण स्वतः लक्ष्मी देवतेचा दिव्यत्वापर्यंत झालेला हा प्रवास आहे.

पृष्ठे- ३५८
किंमत- ३२०

Monday, September 12, 2011

क्लाराज वॉर


नाझीच्या तावडीतून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या तरूण ज्यू मुलीची सत्यकथा
मूळ लेखिका- क्लारा क्रेमर
अनुवाद- डॉ.प्रमोद जोगळेकर
२१ जुलै,१९४२ रोजी नाझी सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं आणि झोल्कीव या छोट्या गावातल्या पंधरा वर्षीय ज्यू मुलीचं, क्लारा क्रेमरचं आयुष्य बदलून गेलं. तिचे मित्र-नातेवाईक ठार केले जात असताना किंवा भट्टीत जळून खाक होण्यासाठी नेले जात असताना ,
क्लारा नि तिचे कुटुंबीय एका तळघरात लपवून जीव वाचविण्यासाठी झगडले. तेदेखील कुठं तर वरकरणी ज्यूद्रेष्टा वाटणा-या बेक नावाच्या जर्मन माणसाच्या घराखाली. साठ वर्षानंतर आता क्लारा क्रेमर तिची करूण कहाणी सांगते आहे.
हे पुस्तक लिहिताना मी माझ्या न्यूजर्सीतल्या एलिझाबेथ येथील घराच्या किचनमधून बाहेर पडून माझ्या झोल्किवमधल्या घरात गेले आहे असं सारखं वाटत होतं. या पुस्तकात मी लिहलेल्या घटना जरी साठ वर्षापूर्वी घडलेल्या असल्या तरी, या एवढ्या काळात त्या माझ्या मनातून क्षणभरासाठी दूर झाल्या नव्हत्या. त्यावेळच्या हत्त्याकांडातून माझ्यासारखे जे लोक वाचले आहेत, त्यांच्याप्रमाणे मलाही ते सगळं अगदी कालपरवा घडलं असावं असं वाटतं.
मी आज ८३ वर्षाची आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते. ज्या दिवशी मी बंकरमधून बाहेर पडले त्या दिवसापासून मी उत्तम जीवन जगण्यासाठी जे जे करावं लागेल ते सर्वतोपरी केलं आहे. होलोकॉस्टबद्दल लोकांमध्ये जागृती करण्यसाठी मी माझं सार जीवन समर्पित केले आहे. मी वाचले, ही माझ्यावर झालेली कृपा आहे. म्हणूनच जे वाचू शकले नाहीत त्यांची कहाणी जगाला सांगायची जबाबदाही माझ्यावर आहे, असं मी मानते.
मी बंकरमध्ये १८ महिने काढले होते. त्यावेळी मी जी डायरी लिहीत असे, ती आता वॉशिंग्टन डी.सी. इथल्या होलोकॉस्ट म्युझियममध्ये ठेवलेली आहे. बंकरमध्ये असताना माझ्याकडे कागदांचा तुटवडा होता. पेन्सिलचं अवघं एक थोटूक माझ्यापाशी तेव्हा होते. शिवाय बंकरमद्ये उजेड जवळपास नसायचाय तरीदेखील मला जमेल तेवढ्या घटनांच्या नोंदी ठवण्याचा प्रयत्न मी केला होता.
(क्लारा क्रेमर यांनी लिहलेल्या पुस्तकातील टिपणातून)
पृष्ठे- ३०६
किंमत- ३०० रूपये.

Friday, September 9, 2011

मी, संपत पाल `गुलाबी साडीवाली रणरागिणी`


द गार्डियन ने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये संपत पाल यांची निवड केली आहे.

सकाळचे आठ वाजलेत. मी आवरून तयार होतीय. यांत्रिकपणे माझ्या हालचाली पडतायत. मी माझ्या छोट्याशा अंधा-या खोलीत आहे. गेल्या दोन वर्षापासून हे माझं मुख्य कार्यालय आहे. मी केसांचा अंबाडा वळते, मग गुलाबी साडीची घडी उघडून ती नेसते.

बाहेर जमलेल्या गर्दीचा गलका केव्हापासून कानावर पडतोय. त्या सगळ्या जणी युध्दासाठी तयार आहेत. माझ्याकडून एक इशारा मिळायचा अवकाश, त्या आणखी मोठ्यानं गर्जत उठतील..

झालं.. माझे आवरून झालेय.. मी काठी घेऊन बाहेर जाते. मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेनं उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं...

गुलाबी गॅंग..गुलाबी गॅंग....
या साडीनचं आम्हाला लोकप्रिय बनवलं आहे....



मूळ शब्दांकन. अॅनी बरथॉड
अनुवाद- सुप्रिया वकील

पृष्ठे १९२
किंमत १७०

तलवारीचा शोध



स्वोर्ड क्वेस्ट...या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद

एक जादुई तलवार आणि दोन प्रतिस्पर्धी
विंड- व्हाईस नावाचा कबुतर पक्षी, जो आधी गुलाम होता.
तो आता मुक्त झाला आहे. माल्दिओर हा एकपंख्या. ऑर्कियॉप्टेरिक्स, सत्तापिपासू आहे.
विंड- व्हाईसला आणि त्याच्या शूर मित्रांना-एविंगरेल, या लेखक असलेल्या सुतार पक्षाला..योध्दा असलेल्या स्टॉरमॅक या मैना पक्षाला आणि फ्लेडयूर नावाच्या संगीतकार गरूडाला- त्यांच्या जगाच्या उज्ज्वल भवितव्याची जडणघडण करता येईल का?

स्वोर्डबर्ड या आदीच्या न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्टसेलर पुस्तकाचा पुढचा उत्कंठावर्धक भाग.....
`नॅन्सीला मी जसजसा जास्त ओळखत चाललोय, तसतसं मला तिचं जास्तच कौतुक वाटायला लागलेलं आहे. मला वाटतं नॅन्सीकडून कित्येक लोकांना प्रेरणा घेता येऊ शकेल. आपण जर कठोर परिश्रम घेतले आणि मोठी स्वप्नं पाहिली, तर अशक्य ते शक्य करून दाखविता येऊ शकतं, याची ती जिवंत साक्ष आहे`. - जॅकी चॅन

लेखिका- नॅन्सी यी फान
अनुवाद- मंजुषा आमडेकर

पृष्ठ संख्या- २०८
किंमत- १९० रूपये

Thursday, September 8, 2011

धन्वंतरी घरोघरी




साध्या आजारांची, सोप्या भाषेत माहिती,
शंकानिरसन,घरगुती उपचार आणि पथ्ये यांची माहिती देणारे पुस्तक....

धन्वंतरी घरोघरी



मानव आणि आजार यांचे संबंध फार जवळचे आहेत. एका सर्वेंक्षणात असे आढळले आहे की, सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला २५ वर्षात एक मोठा आजार होऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वा ऑपरेशन करण्याची पाळी येते. आजाराकरता ४० वेळा रजा काढून एखाद-दुसरा दिवस घरी राहावे लागते. स्वतःच्या दुखण्यासाठी ४०० वेळा डॉक्टरकडे जाऊन औषधे घ्यावी लागतात..तर २००० वेळा स्वतःलाच घरगुती उपाय करावे लागतात. अशा वेळी मला काय झाले आहे.. ते का झाले.. याला काय उपाय.. किंवा मला केव्हा बरे वाटेल.. असे अनेक प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या शंकांचे निरसन कसे व्हावे, हाही एक व्यावहारिक प्रश्न असतोच. अशा वेळी सोप्या भाषेत साध्या आजारांची माहिती मिळणे महत्वाचे आसते.

आज वैद्यक शास्त्रात प्रचंड प्रगती होत आहे. या प्रगतीची नोंद वैद्यकीय ग्रंथात, मासिकात, इंटरनेटवर उपलब्ध आहे.. परंतु ती माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यास दोन अडथळे येतात..एक तर ही सारी माहिती इंग्रजी भाषेत आहे. दुसरे म्हणजे या लिखाणात तांत्रिक शब्दांच्या रेलचेलीमुळे दुर्बाधता आहे. हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असण्याचा फायदा सर्व समाजाला, रूग्णांना आणि उपचार करणा-यांनाही आहे. आजाराची आणि औषधांची माहिती असणा-या रूग्णाला उपचारांचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. माहितगार माणसाला उपचार करणे, हे डॉक्टरांच्या दृष्टीने फायदेशीर असते.
अर्थात या पुस्तकाचा वापर करून कोणीही स्वतःवर किंवा इतरांवर उपचार करू नयेत.

मात्र कोणत्या तक्रारी दखलपात्र आहेत, डॉक्टरांना काय सांगावे, डॉक्टरांकडून औषदांच्या जोडीला कोणती पथ्ये पाळावीत, याविषयी रूग्णांचे,नातेवाईकांचे आमि सर्व समाजाचे प्रबोधन व्हावे.
(पुस्तकात डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी लिहलेल्या मनोगतातून)

आजारी पडल्यावर रूग्णांवर उपचार करून त्याला बरे केले जाते. परंतु यापेक्षाही आजार होऊ नये, यासाठी कोणती काळजी घ्यावी हेही सांगणे महत्वाचे आहे. त्यासाठी पाळावी लागणारी स्वच्छता, वयानुरूप करावा लागणारा व्यायाम, घ्यावा लागणारा आहार, रोगप्रतिबंधासाठी वाढवावी लागणारी शक्ती, त्यासाठी द्याव्या लागणा-या लसी..याबद्दलचे प्रबोधन करणे हे डॉक्टरांचेच काम नव्हे काय...
(डॉ. अनिल गांधी यांच्या पुस्तकातील मनोगतातून)

संपादन व संकलन

डॉ. ह.वि. सरदेसाई डॉ. अनिल गांधी
पृष्ठे- २०२
किंमत- १५० रूपये.