Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Friday, February 25, 2011
माय फॅमिली इज ऑल आय हॅव
चित्रा वाळिंबे यांचं माय फॅमिली इज ऑल आय हॅव! या नावाचं हे पुस्तक अगदी सहज चाळायला म्हणून हातात घेतले . चाळता चाळताच त्यातल्या हेलेनाशी कधी मौत्र जुळलं, कळलच नाही. पुस्तकात रममाण होण्यात चित्रा वाळिंबे यांच्या लेखनशौलीचा मोठा वाटा आहेच; पण हेलना अॅलिस डियरच्या जीवनप्रवासाची थक्क करून टाकणारी कहाणीही!
हेलना अॅलिस डियर! 15 वर्षाची मुलगी! स्वतंत्र विचारांची, तारूण्यसुलभ फुलपाखरी मनाची आणि आई वडिलांनी लाडाकोडात, सुरक्षित वातावरणात वाढलेली युवती. लंडनहून आपल्या आई सोबत सुट्टीला निगालेली, आजीला भेटायला बल्गेरिया येथे येते आणि काही दिवसांतच तिथली परिस्थिती इतकी विचित्र होते की तिला तेथून बाहेर पडणे तर दूरच, त्या देशातही विदेशी म्हणून राहणे कठीण होते. वेळोवेळी पोलिसांकडून अपमान सहन करावा लागतो. हा ससेमिरा सोडविण्यासाठी तिला बल्गेरियन नागरिकाशी लग्न करावे लागते.
लादिमीर त्याचे नाव! नाईलाजाने केलेला हा विवाह निभावताना होणारी तिची दमछाक हेच तिचे जीवन होऊन जाते. पहिली मुलगी झाली म्हणून तिची सासू व नवरा तिला पाहायलाही येत नाही. बायको म्हणजे बिनपगारी मोलकरीण, ही नवरेशाही, युद्धामुळे अन्नधान्याचा तुटवडा, पदरात चार मुले आणि सततची आर्थिक चणचण, यामुळे तिचं जीवन म्हणजे संकटांची मालिकाच बनून जाते.
अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा भागवताना तिचं जीवन खर्ची पडतं. भूतकाळ कुणाला सांगायचा नाही, भविष्य काळाच्या उदरात काय? याचा विचारही करायचा नाही आणि वर्तमानात जगत राहण्याची शिक्षा मात्र आहेच. तरीही हेलेना मात्र खचत नाही, हरणे तर नाहीच नाही. आपल्या मुलींसाठी, कुटुंबासाठी दु:काचे डोंगर पार करणारी, तरीही जिद्दीने, मानाने जगणारी, काबाडकष्ट करणारी हेलेना परकीय वाटतच नाही, तर आपल्या अवती भोवती वावरणार्या भारतीय स्त्रीची प्रतिमाच वाटते आणि त्यामुळे तिची कहाणी अधिकच जवळची वाटू लागते.
काळ्याकुट्ट अंधार्या, संकटांनी शिगोशिग भरलेल्या जीवनाला दुसरा रंगच नाही याची जाणीव असूनही आपल्या मुलांनी चांगलं वागावं, शिकावं यासाठर ती जागरूक असते. मनात कुठेतरी खोल खोल आपल्या मातृभूमीची स्मृती जागी ठेवणारी हेलेना मन अस्वस्थ करून टाकते.
हेलेनाच्या आयुष्यात सुखाची कोवळी किरणे उबदार स्पशा|नी अवतरतात. दूतावासात होणारे स्वागत, राजदूतांनी केलेला सन्मान, मायदेशी जायला मिळण्याचा आनंद, यावेळीची तिची उत्फुल्ल आनंदी अवस्था लेखिकेने हळुवारपणे दाखवली आहे.
प्रवाही व उत्कंठावर्धक भाषा व हेलेनाच्या फॅमिलीचे फोटो यामुळे ही कादंबरी आपल्यापुढे अक्षरश: साकार होते. इतका त्रास सहन करून जिवंत राहू शकलेल्या तुम्ही एकमेव ब्रिटीश आहात, असं अधिकार्याचं म्हणणं हेच तिच्या सोसण्याचं सार्थक ठरतं. असंही घडू शकतं? किती सोसायचं ते...
बधिर झालेल्या मनाला, हेलेना लंडनला जाऊ शकते, हा शेवट इतका वेळ रोखून धरलेला सुखाचा नि:श्वास टाकायला मदत करतं.
अनुवाद करताना मूळ कथेचा बाज, गाभा यांना कुठेही धक्का न लावता तिला न्याय देणे आणि दुसर्या मातीतली असली तरी त्यातला विचार पोचवणे महत्त्वाचे. युद्धकाळ, राजकीय गडामोडी यावर मुद्दाम भाष्य न करताही तिथली परिस्थिती उभी करण्यात चित्रा वाळिंबे यांनी खूपच परिणामकारकता दाखवली आहे.
डॉ. अनुजा दिलीप कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment