Tuesday, March 22, 2011

मराठीतले चांगले दुर्मिळ साहित्य प्रकाशित करु


- सुनील मेहता
`मेहता पब्लिशिंग हाऊस केवळ अनुवादित पुस्तके करते असा शिक्का दूर होऊन मराठी साहित्यातील चांगल्या लेखकांची दर्जेदार पुस्तके पुन:प्रकाशित करते आणि यापुढेही मराठी लेखकांची उत्तम पुस्तके जी वाचकांना उपलब्ध होत नाहीत ती प्रकाशित करण्याचे काम चालू राहणार आहे. या निमित्ताने मी वाचकांनाही आवाहन करतो की जी चांगली पुस्तके आहेत पण प्रत्यक्ष उपलब्ध होत नाहीत ती आम्हाला कळवल्यास त्याचाही आम्ही नक्कीच विचार करू`,द.मा. मिरासदारांच्या पुस्तकांच्या निमत्ताने सुनील मेहता आपले मनोगत व्यक्त केले होते . सोमवारी २१ मार्चला पुण्यात हा प्रकाशन समारंभ पार पडला .

आपला अनुभव सांगुन सुनील मेहता म्हणाले, आता माझेच उदाहरण द्यायचे झाले तर द.मा.मिरासदारांचे माझ्या बापाची पेंड हे पुस्तक मला वाचायचे होते. मी पुस्तकाच्या दुकानात गेलो पण ते पुस्तक आऊट आॅफ प्रिंट असल्याचे सांगण्यात आले. मग मी मिरासदारांच्या पुस्तकांचा शोध घेतला आणि लक्षात आले की, त्यांची बरीच पुस्तके आज मिळत नाहीत. एखाद्या चांगल्या लेखकाचे पुस्तक मिळत नाही हा एक वाचक म्हणून मलाच खंत वाटली आणि मग मिरासदारांची या बाबत विचारणा केली आणि मग नक्की केले की जी पुस्तके वाचकांना वाचावीशी वाटतात आणि बाजारात उपलब्ध नाहीत अशी अठरा पुस्तके मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने पुर्नप्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. आज मला अतिशय आनंद होत आहे की ही अठरा पुस्तके डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते प्रकाशित होत आहेत.

द.मा.मिरासदार, शंकर पाटील यांच्यासारख्या गावरान पण विनोदी शौलीतील साहित्यामुळे काही गावातले खास शब्द, तिथले वातावरण, त्या गावातल्या टिपिकल यक्ती या सार्याच मराठी वाचकांना वाचायला मिळतात. या निमित्ताने अशा लेखकांचे लेखन समाजात जागते ठेवणे ही आजच्या काळाची सांस्कृतिक गरज आहे. बदलत्या जीवनशौलीचा प्रभाव आजच्या काळात साहित्यातही डोकावत आहे. मिरासदारांच्या पुस्तकांच्या निमत्ताने ते अस्सल ग्रामिण वातावरण व त्यातून निर्माण होणारा विनोद सारेच आजच्या वाचकाला पुन्हा एकदा त्या काळात घेऊन जाते. आज त्यांच्या विनोदी ढंगात या पुस्तकातून दिसलेला आणि रंगवलेला विनोद दुसरया कुठल्या लेखकात फारसा दिसत नाही. म्हणूनच त्यांची पुस्तके नया वाचकाला आवडतील याबद्दल विश्वास वाटतो.

या पुस्तकांवरील मुखपृष्ठ करण्यासाठी शि.द.फडणीसांसारखे ज्येष्ठ यंगचित्रकार लाभले म्हणूनच मिरासदार आणि फडणीस हा एक ब्रँड मराठी साहित्यात निर्माण झाला आहे. मिरासदारांच्या जुन्या पुस्तकांना काही मुखपृष्ठे इतर चित्रकारांची होती मात्र फडणीसांनी त्यांना आपला वेगळा अविष्कार घडवून नयाने ती चित्रे मुखपृष्ठासाठी तयार केली याचा आम्हाला आनंद आहे.

रणजित देसाई, वि.स.खांडेकर, आनंद यादव, विश्वास पाटील, व.पु.काळे, शंकर पाटील, निरंजन घाटे, शांता शेळके रत्नाकर मतकरी आणि आता द.मा.मिरासदार मेहता पब्लिशिंग हाऊसच्या परिवारात सामिल झाले आहेत याचा वेगळाच आनंद होत असल्याचे सुनील मेहता यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment