' मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता एकरकमी मानधन देऊन इतर प्रकाशकांचे लेखक आपल्याकडे खेचत असल्यामुळे मराठी
प्रकाशन व्यवसायात सध्या खळबळ माजली आहे. एवढंच नाही, तर मेहता यांच्या या कृतीच्या विरोधात एकत्र येऊन प्रकाशकमंडळी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाशन व्यवसायात कुणाचं काय चुकतंय, याचा घेतलेला धांडोळा.
-मुकुंद कुळे (म टा ४ जून २०११ )
------------------------------
मराठी प्रकाशन व्यवसायात सध्या त्सुनामी आल्याचं वातावरण आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेत पुण्यातील 'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता. आजवर वि.स. खांडेकर, शंकर पाटील, व.पु. काळे अशा नामांकित आणि खपाऊ लेखकांच्या पुस्तकांचे सर्वाधिकार सुनील मेहता एकरकमी खरेदी करत आलेत. त्यांच्या या कृतीबद्दल मराठी प्रकाशकांत नाराजी असली, तरी आतापर्र्यंत त्याबद्दल कुणी जाहीरपणे आवाज उठवला नव्हता. परंतु नुकतेच मेहतांनी व्यकंटेश माडगूळकर यांच्या सर्व पुस्तकांचे सर्वाधिकार एकरकमी खरेदी केले आणि प्रकाशकांचं धाबं दणाणलं. कारण व्यंकटेश माडगूळकर खपाऊ लेखक होतेच, पण त्यांच्या पुस्तकांचे हक्क वेगवेगळ्या प्रकाशकांकडे होते. माडगूळकरांनी तर आपली अनेक पुस्तकं तेव्हा मुद्दाम अनेक नवख्या प्रकाशकांनाही दिली होती. त्यामागे नव्याने या व्यवसायात येणारा प्रकाशक आणि मराठी साहित्य व्यवहार तगला पाहिजे, ही त्यांची भावना होती. परंतु सुनील मेहता यांनी त्या उद्देशालाच हरताळ फासल्यामुळे, त्यांच्या या धंदेवाईर्क वृत्तीची झळ बसलेले सगळे प्रकाशक सध्या एकत्र आले आहेत आणि त्यांनी सुनील मेहता यांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत मराठी प्रकाशन व्यवसाय मुख्यत: लेखक आणि प्रकाशकांच्या वैयक्तिक संबंधांवर आधारलेला होता. त्यामुळे पुस्तक काढताना कागदोपत्री करार-मदार झाले, तरी एकूणच व्यवहारात व्यावसायिक भाग कमी असायचा. महत्त्वाचं म्हणजे लेखन हे आजवर कधीच कुठल्याही लेखकाचं उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने कागदोपत्री व्यवहाराकडे लेखकाने कधीच काटेकोरपणे पाहिलेलं नव्हतं. तसंच प्रकाशकही याकडे धंद्यापेक्षा एक 'साहित्य व्यवहार' म्हणूनच पाहात होते. परिणामी लेखक-प्रकाशकांमध्ये आथिर्क व्यवहारावरून कधी फारसे वाद उद्भवले नव्हते.
मात्र पुस्तकविक्रेता म्हणून प्रकाशन व्यवसायात आलेल्या मेहतांनी या 'व्यवसाया'तला 'धंदा' ओळखला आणि काही वर्षांपूवीर् 'मेहता पब्लिशिंग हाऊस' ही स्वत:ची प्रकाशनसंस्था सुरू करुन अल्पावधीतच जमही बसवला. पाच-दहा वर्षांपूवीर् जेव्हा सारेच प्रकाशक ' पुस्तकं खपत नाहीत', अशी बोंब मारत होते, तेव्हा जाहिरातीच्या बळावर सुनील मेहता आपल्या पुस्तकांची जोरदार विक्री करत होते. तसंच अनुवादित पुस्तकांचा यशस्वी फंडाही राबवत होते. मात्र त्याच वेळी त्यांनी आपला पक्का मारवाडी व्यावसायिक 'पैंतरा' वापरायला सुरुवात केली. त्यात पहिला बळी गेला तो 'पानिपत'कार विश्वास पाटील यांचा. तोपर्यंत 'राजहंस प्रकाशन'चे लेखक अशी ओळख असलेल्या विश्वास पाटील यांना सुनील मेहता यांनी एकरकमी दहा लाख रुपये मानधन देण्याचं आमिष दाखवलं आणि पाटील यांची 'संभाजी' कादंबरी मेहतांकडे गेली. त्यानंतर मेहतांनी 'कॉन्टिनेन्टल प्रकाशन'चे लेखक 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत यांना 'युगंधर'साठी , 'मॅजेस्टिक'च्या 'अन्नपूर्णा'कार मंगला बवेर्, 'उत्कर्ष प्रकाशन'चे डॉ. ह.वि. सरदेसाई अशा अनेकांना एकरकमी मानधन देऊन आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं.
हे जुने लेखक नैतिक मूल्यं जपणारी असल्यामुळे त्यांनी मेहतांना नकार दिला. परंतु हयात नसलेल्या लेखकांची पुढची पिढी मात्र 'सॉफ्ट टागेर्ट' ठरली. वि.स. खांडेकर, रणजित देसाई, शंकर पाटील. व. पु. काळे हे लेखक याच पद्धतीने मेहतांकडे आले. कारण एका पुस्तकाच्या जेमतेम दहा-पंधरा हजार मानधनासाठी (मराठीत आजही पाच ते पंधरा टक्केच रॉयल्टी दिली जाते.) वर्षानुवर्षं वाट पाहण्यापेक्षा आणि त्याचा हिशेब ठेवण्यापेक्षा लेखकांचे वारसदार पुस्तकाचे हक्क मेहतांना हक्क विकून मोकळे होतात.
याच धोरणानुसार अनिल मेहता यांनी अलीकडच्या काळात द.मा. मिरासदार व व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकांचे हक्क एकरकमी किंमत देऊन विकत घेतले आणि प्रकाशनविश्वात खळबळ माजली. कारण माडगूळकरांच्या पुस्तकांना कायम मागणी असते.
पण मूळात पैशाच्या बळावर असे हक्क विकत घेणे, हेच नैतिकदृष्ट्या बरोबर नाही, असं मेहतांच्या विरोधातल्या प्रकाशकांचं म्हणणं आहे. यातही मुख्यत: व्यंकटेश माडगुळकर यांच्या तब्बल ४६ पुस्तकांच्या संदर्भात बोलायचं झालं, तर त्यांचे कॉपिराइटस् त्यांची मुलगी ज्ञानदा नाईक यांच्याकडे असले, तरी पुस्तकप्रकाशनाचे हक्क त्या-त्या प्रकाशकांकडे आहेत. यासंदर्भात आपली बाजू मांडताना 'कॉन्टिनेन्टल प्रकाशन'च्या संचालक देवयानी अभ्यंकर म्हणतात-'व्यंकटेश माडगूळकर व माझे आजोबा अनंतराव कुलकणीर् यांच्यात कागदोपत्री झालेल्या करारनुसार माडगूळकरांंच्या पुस्तकांच्या सर्व आवृत्त्यांचे हक्क आमच्याकडे आहेत. तेव्हा वारसाहक्काने पुस्तकाचे कॉपिराइटस् ज्ञानदा नाईकांकडे असले, तरी त्या मेहतांना पुस्तकछपाईचे हक्क देऊ शकत नाहीत.'
एखादं पुस्तक तीन वर्षांपेक्षा अधिक काळ बाजारात उपलब्ध नसेल, तर अन्य प्रकाशक मूळ प्रकाशकाच्या परवानगीने ते पुस्तक छापू शकतो. मात्र या व्यवहारात मूळ प्रकाशकाचं परवानगीपत्र अत्यावश्यक असतं. हाच मुद्दा धरून माडगुळकरांची १८ पुस्तकं प्रकाशित केलेले 'उत्कर्ष प्रकाशन'चे सुधाकर जोशी म्हणतात, 'मेहतांकडे मराठी पुस्तकाचे हक्क असलेल्या कमलाबाई ओगले यांच्या 'रुचिरा' पुस्तकाच्या हिंदी-इंग्रजी आवृत्तीचे हक्क मी ओगलेबाईर्ंकडूनच विकत घेतले होते. पण हिंदी-इंग्रजीत पुस्तकं छापण्याआधी मी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि कुणाचं ऑब्जेक्शन आहे का ते विचारलं. तेव्हा मेहतांनी रुचिरा हिंदी-इंग्रजीत छापलं, तर मराठी पुस्तकावर त्याचा परिणाम होईल, असं म्हटलं होतं आणि त्यांची बाजू समजून घेऊन मी हिंदी-इंग्रजी आवृत्ती काढण्याचा विचार बदलला होता. पण आता तेच मेहता आमच्याकडची पुस्तकं मात्र आम्हाला न विचारताच पळवत आहेत.'
तर 'पद्मगंधा प्रकाशन'चे अरुण जाखडे म्हणतात- 'प्रत्येक प्रकाशक नवनवीन लेखक आणि विषयांसाठी धडपडत असतो. त्यासाठी स्वत: वेगवेगळ्या कल्पना सुचवून त्यावर जाणत्या लेखकांडून लिहून घेत असतो. पण जो प्रकाशक स्वत: प्रयोगशील नसतो, तो दुसऱ्यांच्या घरात डोकावतो आणि त्यांचे लेखक-विषय चोरतो. मेहतांचं आताचं वागणं असंच आहे. कारण त्यांच्याकडे स्वत:ची काहीच कल्पकता-प्रयोदशीलता नाहीय.'
लेखक घडवणं, लेखकावर मेहनत घेणं असे प्रकार बहुतेक प्रकाशक मंडळी करत असतात. तसंच लेखक-प्रकाशकाचं जिव्हाळ्याचं नातंही मराठी प्रकाशन व्यवसायात महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच मेहता प्रकरणात नाडल्या गेलेल्या प्रकाशकांचं म्हणणं आहे की, प्रकाशन व्यवसायाकडे पूर्णपणे धंदेवाईक वृत्तीतून पाहू नका. हा व्यवसाय आजवर लेखक-प्रकाशकाच्या नैतिक संबंधांवरच टिकलेला आहे.
मात्र लेखक-प्रकाशक संबंध कितीही भावमधुर असले तरी प्रकाशन हा 'व्यवसाय'च आहे, हे आता प्रत्येक प्रकाशकाने लक्षात घ्यायला हवं. या संदर्भात ज्या 'देशमुख आणि कंपनी'चे वि.स. खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारखे खपणारे लेखक सुनील मेहतांनी उचलले, त्या देशमुख कंपनीचे सध्याचे संचालक रवी गोडबोले मात्र संयमी भूमिका घेतात. ते म्हणतात, 'प्रोफेशन आणि बिझनेसमध्ये जो फरक आहे, तोच व्यवसाय आणि धंदा यांत आहे. व्यवसाय म्हटला की त्यात सामाजिक बांधिलकी वगैरे येते आणि मूल्य सांभाळून व्यवसाय करणं कठीण होऊन बसतं. तेव्हा प्रकाशकांनी आता ठरवायला हवं की, आपल्याला व्यवसाय करायचाय की धंदा! '
आणि सुनील मेहतांचं हेच म्हणणं आहे. आपल्याविरुद्ध बोंब मारणाऱ्या प्रकाशकांना उद्देशून ते म्हणतात, 'आपले प्रकाशक प्रकाशनाचा व्यवसाय नीट करत नाहीत. त्यांना आपले लेखक सांभाळत येत नाहीत. त्यांचे आथिर्क व्यवहार नीट नसतात. मग त्यांचे लेखक माझ्याकडे येतात. तेव्हा आपल्या लेखकांना थांबवणं आपल्या हाती का नाही, याचा विचार त्या त्या प्रकाशकांनीच करावा.'
सुनील मेहता म्हणतात, ते तांत्रिकदृष्ट््या बरोबर असलं, तरी मेहताही अर्धसत्यच सांगतात. लेखक किंवा त्यांचे वारसदार मेहतांकडे येतात हे पूर्णपणे खरं नाही. मेहताच सगळीकडे कोरा चेक घेऊन जातात, असं या क्षेत्रातली मंडळी सांगतात. त्यांचा हा उद्योग लेखक किंवा त्यांच्या वारसदारांच्या हिताचा असला, तरी भविष्यातील मराठी साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने धोकादायक आहे. कारण यामुळे आगामी काळात 'मेहता पब्लिशिंग हाऊस'ची मोनोपॉली निर्माण होऊ शकते. आजवर एकाच लेखकाची पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशकाकडे असल्यामुळे सर्वच प्रकाशकांचं पुस्तकविक्रेत्यांशी सौहार्दाचं वागणं असायचं आणि असतं. मात्र वि.स. खांडेकर, रणजित देसाई अशा नावाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांच्या संदर्भात सुनील मेहतांचं वागणं आतापसूनच अरेरावीचं असतं. विक्रेत्याने आपल्याकडे येऊन आणि तेही कॅश देऊनच माल नेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. पुढच्या काळात खांडेकर, देसाई, वपु, मिरासदार, माडगुळकर यांच्यासारखेच आणखी नामांकित लेखक गळाला लागले, तर सुनील मेहता पुस्तक विक्रेत्यांना आपल्या तालावर नाचवायला कमी करणार नाहीत आणि त्यामुळे मेहता यांची एकाधिकारशाही निर्माण होऊन एकूणच साहित्य व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र असं व्हायला नको असेल, तर आता सर्वच प्रकाशकांनी पारदशीर् पुस्तक व्यवहार करायला हवा आणि आपापले लेखक जपायला हवेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8727270.cms
No comments:
Post a Comment