Monday, June 13, 2011

लेखक पळवापळवीचे विपर्यस्त वर्तमान

-विश्वास पाटील


' लेखकांची पळवापळवी' या गेल्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या प्रकाशन व्यवसायातील वादावरील लेखाला लेखकांच्या बाजूने दिलेले उत्तर...
(म टा 12 जून २०११)

*******************

गेल्या रविवारी आमचे मित्र मुकुंद कुळे यांनी मराठीतील लेखकांच्या पळवापळवींचे विपर्यस्त वर्तमान दिले आहे. ते बरेचसे वस्तुस्थितीला सोडून व ऐकीव गप्पांवर रचलेले आहे. एखादा साहित्यिक म्हणजे कोणा एकाच्या गोठ्यात बांधलेली गाय नसते. जर बाईंडरचा टाका ढिसाळ असेल अगर कागदवाला काळपट कागद पुरवत असेल तर तो बाईंडर वा कागदवाला बदलण्याचा जसा अधिकार प्रकाशकाला असतो, त्याच प्रकारे एखादा प्रकाशक वेळेत ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत नसेल, वर्षानुवषेर् रॉयल्टी बुडवण्याचाच धर्म पाळत असेल तर असा प्रकाशक बदलण्याचा पूर्ण अधिकार लेखकाला आहे.

विशेषत: श्री. कुळे यांनी माझ्याबाबत केलेली विधाने चुकीची आहेत. प्रकाशन क्षेत्रातील कोणीतरी त्यांना ही माहिती खोडसाळपणे दिलेली दिसते. श्री. मेहता यांनी मला पळवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आजही मी 'राजहंस प्रकाशन'चाही लेखक आहे. राजहंसने प्रकाशित केलेल्या माझ्या सर्व कादंबऱ्या त्यांच्याकडेच असून आमच्यातील व्यवहार व मैत्री तशीच दृढ आहे. 'संभाजी'बाबत जी दहा लाखाची गोष्ट कुळे सांगतात, ती कहाणी 'महानायक'ची. १९९७मध्ये माझ्या 'महानायक'साठी रॉयल्टीची आगाऊ रक्कम म्हणून श्री. अनिल मेहता यांनी दहा लाख रुपये देऊ केले होते. त्या गोष्टीस माधव गडकरी, शंकर सारडा व सदा डुंबरे हे साक्षीदार होते. मात्र मी त्या कादंबरीचे हस्तलिखित आधीच श्री. माजगावकर यांच्याकडे दिले असल्यामुळे कितीही मोठ्या रकमेला भुलून ते परत घेणे; मला सदाचाराचे वाटले नाही. तसेच 'संभाजी' पुढे नऊ वर्षांनी, २००६मध्ये प्रकाशित झाली. तेव्हा ती अन्य प्रकाशकाकडे द्यायचा निर्णय माझा स्वत:चा आहे. त्यासाठी मला भेटलेल्या तीन प्रकाशकांमधून मी स्वत:च श्री. सुनिल मेहता यांची निवड केली. माझी एखादी कादंबरी मी कोणाला एकरकमी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 'संभाजी' कादंबरीचे अंतरंग माहित नसतानाही माझ्या शब्दांवर भरवसा ठेऊन अकरा हजारांहून अधिक वाचकांनी प्रत्येकी ३८० रुपयांप्रमाणे अॅडव्हान्स बुकिंग केले होते. आयकर विभागाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची साक्ष काढून सांगायचे तर आत्तापर्यंत सात मोठ्या आवृत्त्या प्रकाशित होवून 'संभाजी' या माझ्या एकाच कादंबरीची एकूण सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सदतीस रुपयांची रॉयल्टी मला धनादेशाद्वारे प्रकाशकांकडून प्राप्त झाली आहे. माजगावकर आणि मेहता या दोन्ही प्रकाशकांकडे मी सुखी आहे.

एका प्रकाशकाकडून आपले ग्रंथ काढून दुसऱ्या प्रकाशकाला देणे, या पळवापळवीचा पहिला बळी मी असल्याचे श्री. कुळे जाहीर करतात. मात्र श्री. रणजित देसाई यांनी आपल्या हयातीमध्येच आपले ग्रंथ मेहतांना तर पु. ल. देशपांडे यांनी आपले बरेच ग्रंथ दुसऱ्यांकडून काढून मधूकाकांना दिले होते. त्यामुळे अशा तथाकथित पळवापळवीही पहिल्या बळीचा मान माझ्या वाट्याला येत नाही. या निमित्ताने रणजित देसाईंनी सांगितलेला किस्सा आठवतो. ते एकदा म्हणाले होते, 'माझी 'स्वामी'सारखी कादंबरी मागणी असूनही सलग आठ वर्ष बाजारात उपलब्ध नव्हती. मग मी लिहितो ते माझ्या वाचकांसाठी की प्रकाशकांच्या लहरीसाठी असा प्रश्न पडतो!'

अकारण पहिला बळी (मासे पुस्तक काढून मी दुसऱ्या कोणाला देण्याचा तथाकथित अपराध केला नसतानाही) मला ठरवले गेले आहेच, तर या निमित्ताने चार गोष्टी स्पष्ट लिहिण्याचा गुन्हा मी करतोच. तसे कोणीतरी या विषयाला वाचा फोडणे आवश्यक होतेच. फक्त मराठीतीलच नव्हे तर अनेक भारतीय भाषेतील साहित्यिक व कवी प्रकाशकाकडे लाखात येणे असताना हलाखीत मृत्यू पावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलीकडेच मराठीतील एका मातब्बर लेखकांना डायलिसीसवर असतानाही व त्यांचे लाखात येणे असतानाही ऐन वेळी त्यांना आपले हक्काचे मानाचे धन मिळालेच नाही. लेखकाने फक्त मानसन्मान, वार्धक्यात विविध मंडळांनी दिलेले आणि एका रात्रीत सुकून जाणारे हार याच्यावरच जगायचे? त्याने किंवा त्याच्या वारसाने प्रकाशकादारी जावून घाबरत घाबरत रॉयल्टी मागायची? काव्यसंग्रह खपतच नाहीत असे जणू त्रिकालाबाधित गृहीत मनी धरायचे, तर दुसरीकडे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात, झेडपी, राजाराममोहन रॉय ट्रस्टमध्ये कवींची नावे वापरून खूप काव्यसंग्रह खपवायचे. अन् मानधनाच्या पंगतीतून कवींना कायमच रिकाम्या दोण-पत्रावळीवरून तसेच उठवायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत.

श्री. अरुण जाखडे व श्री. मुकुंद कुळे यांनी प्रकाशकाची 'कल्पकता - प्रयोगशीलता' व 'लेखक घडवणे किंवा लेखकावर मेहनत घेण्याची' मिठ्ठास भाषा केली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, जणू वि. स. खांडेकर, रणजित देसाई आणि व्यंकटेश माडगुळकर अशा लेखकांचा जन्म केवळ प्रकाशकीय मेहरबानीवर झाला होता असे समजायचे काय? अशाच तुमच्या प्रकाशकीय कल्पकतेतून व प्रयोगशीलतेतून वरील तीन लेखकांच्या ताकदीचा किंवा आवाक्याचा एखादा तरी लेखक श्री. जाखडे यांनी घडवून दाखवावा, आम्ही त्यांचे जन्माचे ऋणी राहू. लेखकाचे वेळच्या वेळी मानधन देणाऱ्या काही चांगल्या प्रकाशन संस्था मराठीत आहेत. मात्र अशांची संख्या खूपच कमी.

एकीकडे प्रकाशन व्यवसाय टिकला पाहिजे याचा अर्थ दुसरीकडे स्वत:च्या हक्काच्या मानधनाला वंचित राहून लेखकाने दारिद्यातच श्वास सोडायला हवा असा होत नाही. श्री. कुळे यांच्या लेखात 'जुने लेखक नैतिकमूल्यं जपणारे', 'पुढच्या पिढ्या मात्र सॉफ्ट टागेर्ट', 'ग्रंथव्यवसायाचे पावित्र्य', 'नैतिकता' अशी उच्च शब्दांची मांदियाळी मांडली गेली आहे. पण वास्तव मात्र भयानक आहे. एका महान लेखकाच्या अंत्यविधीला हजेरी लावण्यासाठी प्रकाशन व्यवसायाला वळण देणारे एक मातब्बर प्रकाशक एका जिल्ह्याच्या गावी गेले होते. तेथे त्यांनी हॉटेलात दोन दिवस मुक्काम केला. अन् त्या दोन दिवसांचा निवासखर्च त्या मृत लेखकाच्या रॉयल्टीतून वजा केल्याचे लेखी पत्र लेखकाच्या वारसांना तात्काळ धाडले गेले. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांत प्रकाशकबुवांनी त्याच मृत लेखकाच्या शिल्लक मानधनांपैकी एकही छदाम अद्यापि दिलेला नाही.

केवळ साहित्यसेवेची भाषा, साहचर्य वा पावित्र्याच्या बातांवर जनव्यवहार चालत नाहीत. सैनिकांप्रमाणेच लेखकालाही पोट असते. खपाच्या मोजक्या लेखकांचे मानधन देऊन इतरांचे बुडवणे असाही याचा अर्थ होत नाही! अनेक थोर वाङ्मयसेवकांनी आपल्या संसाराकडे, मुलाबाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. अहोरात्र शब्दांशी जणू संसार मांडला. समाजाने त्यांना नानासाहेब, अण्णासाहेब, तात्यासाहेब, भाऊसाहेब अशा बिरुदावल्या देऊन मानपान दिले. त्यांचे ग्रंथ वर्षानुवषेर् खपत राहिले. मानधन बिचारे तसेच साचत राहिले. त्याचा ओघ लेखकांच्या उंबरठ्यापर्यंत पोचलाच नाही. मग व्याख्याने, स्नेहसंमेलने, काव्यवाचन तर कोणी कथाकथन करायचे. प्रेमाने मिळालेल्या त्या तुटपुंज्या रकमेवर कष्टाने संसार चालवायचे. अशा महाराष्ट्र भटकंतीचा अनेकांच्या आरोग्यावर पुन्हा परिणाम झालाच. तर अनेकांनी पुस्तके खपत असतानाही रॉयल्टीच्या रकमेवर फाजील भरवसा न ठेवता कोणी मास्तरकी तर कोणी प्राध्यापकी स्वीकारून अंगातल्या साहित्यसेवेच्या झटक्याला वेळेतच मुरड घातली, अशांच्या कुटुंबियांचे भाग्य थोरच मानायचे.

श्री. कुळे म्हणतात त्याप्रमाणे प्रकाशन क्षेत्रात त्सुनामी आल्या असतील तर अशा अनिष्ट प्रवृत्तींशी संघर्ष करायलाच हवा. त्या लढ्यामध्ये उतरायला अनेक कवी व लेखक मित्रांनी माझ्याकडे संमती दर्शवली आहे. मात्र या संघर्षाची सुरुवात करण्यापूवीर् मराठीतील प्रकाशक मित्रांंनी किमान कागदावर दाखवलेल्या वर्षानुवषेर् तुंबलेल्या वा नजरचुकीने राहून गेलेल्या सर्वच लेखकांच्या रॉयल्टीच्या रकमा चुकत्या कराव्यात, म्हणजे आपल्या नैतिक संघर्षाला खऱ्या अथीर् धार चढेल.

केवळ मराठी प्रकाशन व्यवसायाच्या जोरावर अनेकांनी माड्या-हवेल्या उभारल्या. त्यांच्या त्या यशकर्तृत्वाबद्दल माझ्या पोटात दुखायचे कारण नाही. पण या महालांचे चिरे रचताना अनेक साहित्यिकांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू वेचले आहेत.

अलीकडे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला एक भयंकर प्रसंग आठवतो. ज्या एका महान मराठी साहित्यिकाने मराठी भाषेलाच नव्हे, तर भारतीय साहित्याला वळण दिले. ज्यांच्या कादंबऱ्यांवर आमच्या काही पिढ्या पोसल्या, त्या कादंबऱ्यातील नायक-नायिकांची नावे जनांनी आपल्या मुलांना ठेवली. अशा थोर लेखकाच्या वारसदारांनी त्यांचा मौल्यवान ग्रंथसंग्रह, त्यांना भेटीदाखल अन्य भाषेतील लेखकांनी दिलेले ग्रंथराज रद्दीत विकत घातले. आपल्या युगप्रवर्तक पित्याचा असा अमूल्य ग्रंथसंग्रह रद्दीत काढताना त्यांच्या मुलांना काय कमी दु:ख झाले असेल? पण तीस-तीस वर्ष मानधनाचा छदाम मिळणार नसेल तर ते बापुडे तरी दुसरे करणार काय! सुदैवाने माझ्या मानसिंग कुमठेकर नामक एका जागरुक ग्रंथप्रेमी मित्राच्या निदर्शनास ही बाब वेळीच आली. त्याने दामदुपटीने तो ग्रंथसंग्रह विकत घेतला आहे. मोठ्या पावित्र्याने आपल्या घरी जिवापाड जपला आहे. मायमराठीच्या त्या अग्रगण्य कादंबरीकाराला भगवान बुद्ध आणि हिटलर - अहिंसा आणि हिंसा या विषयावर एक दीर्घ पल्ल्याची कादंबरी लिहायची होती. त्यासाठी त्यांनी काढलेली टाचणे, त्या टिपण्या आणि आराखडे त्याच ग्रंथसंग्रहाच्या पिवळ्या, जुनाट पानाआड जेव्हा मला आढळून आले तेव्हा मला अश्रूंचा बांध आवरता आला नाही! ही घटना कपोलकल्पित वाटत असेल तर टीव्हीचा कॅमेरा सोबत घेऊया. आधुनिक युगात खऱ्या अथीर् माझ्या मराठीचा वेलू गगनावर नेणाऱ्या त्या थोर साहित्यिकाचा केवळ नशिबाने वाचलेला तो ग्रंथसंग्रह श्री. मुकुंद कुळे आणि श्री. अरुण जाखडे या दोघांना प्रत्यक्ष नेऊन दाखवायची माझी तयारी आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8818374.cms

No comments:

Post a Comment