Saturday, March 31, 2012

लेफ्ट टू टेल



रवांडाच्या प्रलयंकारी हत्याकांडात एका तरुणीने अनुभवलेली ईश्वरनिष्ठेची प्रचंड शक्ती!

अफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली `हुतू` आणि `तुस्सी` या जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.
जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरुन तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती.
या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणा-या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी.

माणसांमधील असीम कुरुपता आणि क्रौर्य पाहुनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.

मुळ लेखन- इम्माकुली इलिबागिझा, स्टीव्ह एर्विन
अनुवाद- ज्योत्स्ना लेले
पृष्ठे- २२२
किंमत- २९५ रुपये.


मारेकरी घरापासून दूर गेले आणि आम्ही पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागलो. या वेळी ते निघून गेले होते, पण पुढील तीन महिन्यांच्या काळात अनेकदा परतणार होते. देवानं माझे प्राण वाचविले, यावर माझा विश्वास आहे. पण त्या एक्क्याण्णव दिवसांत त्या कपाटाएवढ्या आकाराच्या बाथरुममध्ये इतर सात जणींबरोबर भीतीनं थरकाप झालेल्या अवस्थेत घालविलेले क्षण मला बरचं काही शीकवून गेले. `सुरक्षित ठेवणं `आणि `वाचविणं` यामधला फरक मला समाजला आणि या अनुभूतीनं मला अंतर्बाह्य बदललं. त्या सामुदायिक हत्याकांडातही मी नव्यानं शिकले, ज्यांनी माझा द्वेष केला, मला मारण्यासाठी पाठलाग केला; त्यांच्यावरही प्रेम कसं करावं आणि ज्यांनी माझ्या कुटुंबाची कत्तल केली, त्यांनाही माफ कसं कराव!`

Sunday, March 25, 2012

नो कम बॅक्स



स्टार्ट टू फिनिश- टोटल सस्पेन्स!

मार्क सॅंडरसन-
एक अतिशय श्रीमंत, लक्षाधीश उद्योगपती. पण एकाकीपणा हे त्याला सतत टोचणारं शल्य होतं. अशातच रुपसुंदर अंजेला समर्स त्याच्या आयुष्यात आली. पण... पण ती विवाहीत होती. हवी ती गोष्ट काहीही करुन मिळवायचीच हा मार्कचा स्वभाव!
आपल्या प्रियतमेच्या प्राप्तीसाठी तिच्या नव-याचा काटा काढायचा अत्यंत योजनाबध्द कट त्यानं आखला..पण प्रत्यक्षात काय़ घडल?....

सॅम्युएल नॅटकिन-
एक सामान्य कारकून.
बायकोच्या आजारपणामुळे शरीरसुखाला पारखा झालेला!
ही भुक भागविण्याची एक अकल्पित संधी एक दिवस त्याच्यासमोर आली..
पण विलक्षण विषयसुखाच्या मोहापायी तो महाबिलंदर ब्लॅकमेलर्सच्या जाळ्यात सापडला...!
त्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली का ?

टिमोथी हॅन्सन-
लंडनमधला एक धनाढ्य लक्षाधीश. असाध्य दुखणं जडल्यामुळे मृत्युपत्राव्दारे आपली अफाट संपत्ती त्यानं आपल्या एकमेव नावडत्या बहिणीच्या नावे केली..
पण नंतर काय घडलं?

हायजॅकर मर्फी-
ब्रॅंडीच्या नउ हजार बाटल्य़ा चोरुन हजारो पौंड्स कमावण्यासाठी हायजॅकर मर्फीनं एक अफलातून घाट घातला. त्यासाठी एक अख्खा जॅगरनॉट ट्रेलर त्यानं चक्क पळवून नेला..! त्याचा तो धाडसी बेत यशस्वी झाला का?

हॅर्बर्ट लार्किन-
जुनं घर पाडून त्यांच्या मोबदल्यात नवीन घर दिलं जात असतानाही हॅर्बर्ट लार्किन आपलं घर सोडायला तयार नव्हता, म्हणून डब्लिन सिटी कौन्सिलनं या हट्टी म्हाता-याला बळजबरीनं त्याच्या घरातून बाहेर काढलं. त्याचं घर पाडण्यात आलं तेव्हा घरातल्या एका भिंतीमधून एका स्त्रीचा मृतदेह बाहेर पडला!
कोण हेती ती?....लार्किनची बायको?...
म्हणून तो आपलं जुनं घर सोडायला तयार नव्हता का ?

वेडी अभिलाषा, खून, फसवणूक, सूड, अलौलिक बुध्दिचातुर्य अशा विविध रहस्यांनी ओतप्रोत भरलेल्या सनसनाटी दहा रहस्याकथांचा जबरदस्त कथासंग्रह...



मूळ लेखक- फ्रेडरिक फॉर्सिथ
अनुवाद- विजय देवधर
पृष्ठे- ४६४
किंमत- ४४५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

मराठीतील बारामास काव्ये




“दिवसामागून दिवस चालले
ऋतुमागुनी ऋतू
जिवलगा कधी रे येशील तू...”

अशी कविवर्य ग.दि.माडगूळकर यांच्यासारखी रसिक ह्दयात विरह वेदनेची कळ उमटविणारी दिर्घ विरह गीते मराठीत फारशी लिहली गेली नाहीत.
स्वतंत्र निसर्ग कविताही प्राचीन कवींनी लिहलेली दिसत नाहीत. तथापी उत्तर भारतातील पंजाबी, राजस्थानी, गुजराती, बंगाली, भोजपुरी इ. भाषातून पती जवळ नसल्याने विरहाने ग्रासलेल्या नायिकेच्या भावना व्यक्त करणारी पदे विपुल प्रमाणात लिहली गेली आहेत.
त्यांना बारामास काव्ये असे म्हणतात. हा लोकभाषेतील एक प्रकार आहे. आणि काही ठिकाणी तो समूहरुपातही गायिला जातो.
त्या-त्या भाषेत या काव्यांवर अभ्यासपूर्ण समीक्षा ग्रंथ लिहले गेले आहेत. त्या दृष्टीने मराठीतील अशा विरहगीतांचा शोध धुळ्यापासून तंजावरपर्यंतच्या ग्रंथसंग्रहातून घेतला असता फार थोडी काव्ये उपलब्ध झाली.

तीच प्रस्तुत संग्रहात समाविष्ट केली आहेत.
रसिकांपुढे हा अल्पज्ञात काव्यप्रकार ठेवला आहे.
हा अभिनव काव्यप्रकार मराठी वाचकांनी आवडेल, अशी अपेक्षा आहे.


लेखक- डॉ. वसंत स. जोशी
पृष्ठे- ९६
किंमत- १२० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Friday, March 23, 2012

तळं




माणसाचे मन हे एखाद्या अथांग जलाशयासारखे, तळ्यासारखे आहे.
वरुन शांत दिसणा-या, निळेशार पाणी आणि कमळे यांनी भरलेल्या तळ्याच्या तळाशी काय काय असते
ते फक्त तळेच जाणते.
संवेदनाशील मनाचे हे भावविश्व, त्याची डूब ही त्याच्या खोलीवर अवलंबून असते.
त्या भावविश्वाला वयाचे बंधन नाही, नाही गरिबी-श्रीमंतीचे.
येणारा अनुभव, प्रसंग ह्यामुळे त्यावर उठणारे तरंग, कधी खूप मोठे तर कधी हळूच उमटणा-या लहरींसारखेही.
पण वरुन शांत दिसणा-या, सुंदर कमळांनी भरलेल्या त्या सुंदर जलाशयात कमळांच्या विसतंतूसारखी पार गुंतागुंत असते आणि मग उठणारे तरंग....

ह्या अशाच तरंगाचे चित्रण ह्या कथांतून साकार करण्याचा केलेला हा प्रयत्न.....


लेखिका- स्नेहल जोशी
पृष्ठे- १९४
किंमत- १९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Wednesday, March 14, 2012

साल्व्हेशन क्रीक


एक अनपेक्षित जीवन
जिद्दीच्या जोरावर स्वतःते कॅन्सरयुक्त आयुष्य सुखी करणा-या सुसान डंकनची कथा

`मी जेव्हा एका पत्र्याच्या, पाणी झिरपणा-या होडग्यातून `लव्हेट बे`ला घर पाहायला निघाले, तेव्हा मला माहित नव्हतं की, माझा प्रवास सुरु झाला होता. फिकट पिवळा रंग, भक्कम खांब आणि प्रशस्त व्हरांडा असलेल्या उंच खडबडीत टेकडीवरच्या त्या बंगल्यात माझ्या नव्या आयुष्याची पहाट होणार होती.`
ह्दयद्रावक, गमतीदार आणि दाहक प्रामाणिक!
`साल्व्हेशन क्रीक ही अशा एका जिद्दी स्त्रीची गोष्ट आहे, जिच्यात यशस्वी कारकिर्दीचा त्याग करुन नव्याने आयुष्य सुरु करण्याची हिंमत आहे.
ही अशा एका स्त्रीची कथा आहे जिच्यात जगण्यासाटी लढताना अडचणींवर एकटीने मात करण्याचं धैर्य आहे आणि सर्व जगापासून दूर अशा छोट्याश्या निसर्गरम्य किना-यावर तिला सापडलेल्या नव्या आयुष्याची-नव्या प्रेमाची कहाणी आहे.

मूळ लेखक- सुसान डंकन
अनुवाद- वसु भगत
पृष्ठे- ४१०
किंमत- ३९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी



`जेव्हा माणसं दुःख, व्याधी आणि जीवनाची अशाश्वतता यांच्याशी झगडतात, तेव्हा काय घडतं, याचं डंकनने निर्भयपणे आणि बारकाईनं केलेलं वर्णन हेच या पुस्तकाचं सामर्थ्य़ आहे. वन्यजीवन, कुत्रे, अन्न, व्याधी, मित्र आणि मृत्यू यांची तिने केलेली वर्णनं आपल्याही मनात त्यांच्याशी संबंधित आठवणी जागृत करतात. ती वर्णनं प्रामाणिक आणि क्रूर विनोद करणारी आहेत. त्याच वेळेस, कमकुवत माणसांना केलेल्या मदतीच्या तिच्या गोषीटी, आतडी पिळवटून टाकतात.`
- द ऑस्ठ्रेलियन

दुभाष्या


द ट्रान्सलेटर..या मुळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद


बंडखोरांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या गावात दाऊद शिकू लागला. त्याला इंग्रजीची गोडी लागली
आणि अनेक गोष्टी स्पष्ट होई लागल्या.


“ ‘दि ट्रान्सलेटर’ हे या वर्षातीलच नव्हे, तर कोणत्याही वर्षातील महान असे छोटे पुस्तक असावे. पत्रकार आणि या विषयावरील अनेक पंडितांनी लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा अतिशय साध्या आणि ओघवत्या भाषेत लिहलेले जेमतेम दोनशे पानांचे हे पुस्तक डारफरमधील वंशविच्छेदाचा उहापोह अधिक जवळून आणि प्रभावीपणे करते... संयमित, मोकळेपणाने लिहिलेले, सौम्य.. आणि नर्म विनोदाची झालर असलेले...”-दि वॉशिंग्टन पोस्ट, बुक वर्ल्ड.

पुस्तकाचा लेखक सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी आहे. वंशाने तो `झॅघावा`आहे. `झॅघावा` ही डारफर मधील भटकी जमात. अरब आणि आफ्रिकन या दोन्ही वंशाचे लोक डाफरफरमध्ये गेली हजारो वर्ष गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण गेली काही वर्षे डारफर प्रांतात भयंकर वंशविच्छेद सुरु आहे.
वंशाने स्वतःला उच्च समजणा-या अरब वंशीयांनी त्यांचे मुळ अफ्रिकन बांधव नकोसे झाले आहेत. सत्ताधारी अरब आणि त्यांना पाठिंबा दारे माथेफिरु; हे मुळ आफ्रिकन वंशीयांना त्यांच्यांच भूमीतून हाकलून देत आहेत. मूळ रहिवाशांच्या गावांवर आणि वस्त्यांवर हल्ले करुन त्यांना जिवे मारण्यात येत आहे. स्त्रियांवर आणि कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. लाखो विस्थापितांचे लोंढे शेजारील चॅड याराष्ट्रात आश्रय घेत आहेत. दुदैर्वाने तथाकथित आधुनिक जगाला या घड़ामोडींची मागमूसही नाही..

मूळ लेखक- दाऊद हॅरी
अनुवाद- अजित कुलकर्णी
पृष्ठे- १७०
किंमत- १७५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी

Monday, March 12, 2012

ओंकारीची रेख जना


स्त्री आणि शुद्र असूनही युगप्रवर्तक अभंगरचना करणा-या संत जनाबाई यांची जीवनयात्रा...

जनीनं हरिश्र्चंद्र आख्यानाचा आणि कीर्तनाचा समारोप केला. सगळी इतकी भारावून गेली होती की, कीर्तन संपल्यावर विठूनामाचा गजर करण्याचं भानही कुणाला राहिलं नव्हतं. जनीच्या चेह-यावरचे बधिर भाव बघून नामदेवाला भडभडून आलं, तर ज्ञानेश्वर गहिवरले.
त्या दोघांना समोर बघून जनी लहानाहूनही लहान झाली. लटपटत्या पावलानं थरथरत उभी असलेली जनी खाली कोसळणार तोच ज्ञानेश्वर-नामदेवांनी तिला सावरलं. पोटाशी धरलं. प्रेमभरानं तिच्या पाठीवर थोपटून तिला सामोरी केली. आणि म्हणाले,” धन्य! धन्य हो जनाबाई तुम्ही! जनाबाई, तुम्ही एक स्त्री, त्यातही शुद्र; पण इतकी अर्थपूर्ण आणि भावगर्भ रचना तुम्ही करु शकता हा या युगातला चमत्कार मानावा लागेल. तुमचा प्रत्येक हुंकार म्हणजे ओंकार आहे. ओंकार ही त्या ईश्वराची मोहोर आहे. देवाची स्वक्षरी आहे. आणि जनाबाई, तुम्ही त्या `ओंकाराची रेख` आहात, ओंकारीची रेख!”
हे द्ष्य पाहण्यासाठी शांत झालेला वारा `ओंकाराची रेख` या नावाची स्पंदनं घेऊन पुन्हा वाहायला लागला. त्या वा-याने ती स्पंदनं चंद्रभागेच्या वाळवंटात विखरुन टाकली. वाळवंटाचा कणन् कण थरारला.
तिथून ती स्पंदनं चंद्रभागेच्या पाण्यावर पसरली. चंद्रभागेचे पाणी रोमांचले. त्यावर मोठाले तरंग उठले. त्या तरंगावर चंद्रकिरणे नाचत होती. त्यांनी ते ओंकार तरंग अवकाशात आणले. त्यांना लक्ष घुमारे फुटले. त्यांनी अवघे गगन मंडल व्यापले आणि मंदिराच्या कळसाला वेढा दिला. तिथून ते तरंग गर्भागारात उतरले. गर्भागाराच्या काळ्या फत्तराच्या भिंती आनंदाने उजळल्या. सगळे गर्भागार उजळून निघाले. त्याचा प्रकाश विठूच्या सावळ्या मुखावर पडला. त्याच्या आनंदाला तर पारावार राहिला नाही. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. रात्रीनं या सगळ्या दृश्याला मानवंदना देत आपला अंधार आवरता घेतला.
काकड आरती करायला आलेल्या सदा गुरवाला मात्र दोन गोष्टींचा अर्थ लागला नाही.
एक म्हणजे विठ्ठालाच्या दगडी मूर्तीच्या डोळ्यातून पाणी का वाहत होते आणि... दुसरी म्हणजे गर्भागारात नेहमीच्या `विठ्ठल – विठ्ठल` या ध्वनिगुंजना ऐवजी `ओंकाराची रेख`, `ओंकाराची रेख` असा काहीतरी ध्वनी कसा घुमत होता याचा!


लेखिका- मंजुश्री गोखले
पृष्ठे- ३०८
किंमत- २९५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी