Wednesday, May 18, 2011

अमेरिकेसारखी कारवाई करण्यासाठी भारताला अधिक सामर्थ्यांची गरज

-ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी
पुणे, १७ मे / खास प्रतिनिधी
अमेरिकेने पाकिस्तानमध्ये लादेनविरुद्ध केलेल्या कारवाईसारखी लष्करी कारवाई आपण पाकिस्तानविरोधात आत्ता करू शकत नाही. तसे केल्यास पाकिस्तानबरोबरच चीनच्या विरोधालाही सामोरे जावे लागणार असून त्यासाठी आपण अधिक सामथ्र्यशाली होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी आज येथे केले.
अमेरिकन लेखिका जीन सॅसन लिखित ‘ग्रोइंग अप बिन लादेन’ या पुस्तकाच्या मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन आज शौरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ‘व्हाय कॅन वुई नॉट डु अ‍ॅन अबोटाबाद’ या विषयावर ते बोलत होते. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, पुस्तकाचे अनुवादक बाळ भागवत, निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, अनिल व सुनील मेहता या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
शक्तिशाली देश हवं ते करू शकतो; आपली अजून ती क्षमता नाही, असे सांगून शौरी म्हणाले,‘ मुंबई हे भारतातील प्रमुख शहर. तेथील २६/११ च्या हल्ल्यानंतर प्रतिकार करण्याचा निर्णय घेण्यास गृहमंत्र्यांना ८-९ तास लागले, तर प्रत्यक्ष कारवाई सुरू होण्यास १२ तासांहून अधिक काळ गेला होता. दोन वर्षांपूर्वीच्या या घटनेनंतरच्या देशातील परिस्थितीत असा बदल झालेला नाही, की तिच्या जोरावर आपण इतरत्र कुठे जाऊन कारवाई करू शकू!’
९/११ च्या घटनेनंतर गेली दहा वर्षे अमेरिका सातत्याने ओसामाचा पाठपुरावा करीत होती. गेल्या २०-३० वर्षांपासून वेगळ्या प्रकारचे वॉरफेअरचा अवलंब ते करीत असून त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक एकत्र येऊन माहितीची देवाण करतात, त्या आधारे मोहिमा आखल्या जातात व म्हणूनच त्या यशस्वीही होतात. शिस्तबद्ध पद्धतीने एकेका निर्णयाचा तीस-तीस वर्षे मागोवा घेतला जातो, तेव्हा क्षमता तयार होते, असेही ते म्हणाले.
आपल्या शत्रूचा बंदोबस्त करण्याचे काम आपले आपल्यालाच करायचे आहे, त्यासाठी दुसरे कोणी पुढे येणार नाही हे पक्के लक्षात घेऊनच आपण आपल्या सर्व क्षमता विस्तारण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानात लोकशाही प्रबळ होणे गरजेचे आहे, अन्यथा आणखी काही वर्षे भारताला दहशतवादाचा सामना करावा लागेल, असे मत अ‍ॅड. निकम यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. ‘ओबामा ते ओसामा-भारतावरील परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. अबोटाबादसारखी कारवाई करण्याएवढे आपण प्रबळ नाही. असे पाऊल उचलण्यापूर्वी त्याचा साकल्याने विचार करणे गरजेचे असून आपल्याकडील अधिकाऱ्यांनीही केव्हा व काय बोलावे, याचे भान ठेवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ओसामाचा अंत म्हणजे अल् कायदाचा अंत नव्हे. ओसामाच्या भुताची सावली बऱ्याच काळपर्यंत जगाला झाकोळणारी ठरणार आहे, असे मत निवृत्त मेजर जनरल पित्रे यांनी या वेळी व्यक्त केले. अनिल मेहता यांनी आभार मानले.

lokasttahttp://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=157568:2011-05-17-19-27-57&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212

No comments:

Post a Comment