
गर्नसी - इंग्लिश चॅनल आयलंड वरील एक निसर्ग रमणीय, चिमुकले बेट.
1946, जानेवारी, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय आणि गर्नसीलाही या युद्धाच्या झळा बसल्यात.
लंडनही या युद्धाच्या छायेतून वर येतंय. पुन्हा "जीवनाला' सामोरं जातंय.
"इझ्झी गोज टू वॉर' या पुस्तकाने प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलेली ज्युलिएट आता तिच्या पहिल्या पुस्तकासाठी
विषय शोधतीये आणि तसा तिला तो मिळालाही गर्नसीकडून.
चार्लस् लँबचा नि:स्सीम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्यूलिएटचं नाव पाहून तिला पत्र धाडतो.
त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरूहोतो हा पत्रांचा सिलसिला.
"गर्नसी लिटररी अॅण्ड पोटॅटो पील- पाय सोसायटी' असे लांबलचक आणि मजेदार नामकरण झालेल्या
या वाचक मंडळातले अन्य सभासदही डॉसीच्या पाठोपाठ ज्यूलिएटचे "पत्रमित्र' बनतात.
युद्धाच्या गडद काळोख्या रात्रींमध्ये त्यांना जवळ आणलं या वाचक मंडळानं, त्यांना जिवंत ठेवलं या भेटीगाठींनी.
लोभस, गहिरी माणुसकी असलेली ही पात्रं एखाद्या सत्यकथेइतकी जिवंत उतरली आहेत.
त्यांच्या साध्यासुध्या आयुष्यातील करुण युद्धाच्या कहाण्या, मजेदार प्रसंग सारं काही ते आपल्या या नव्या
मौत्रिणींशी शेअर करतात.
त्यांच्या पत्रांतून ज्यूलिएटसमोर त्या अनोख्या बेटाविषयी, त्यांच्या आवडीनिवडी,
त्यांची आवडती पुस्तकं आणि "नाझी अंमला'तून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, मोकळा श्वास घेतलेल्या समाजजीवनाविषयी माहितीपट उलगडत जातो आणि विलक्षण भावबंधानी हे रहिवासी तिच्याशी बांधले जातात. मग आपसूकच ज्यूलिएट गर्नसीच्या जलप्रवासाला निघते आणि याच बेटावर तिच्या आयुष्याला एक निर्णायक कलाटणी मिळते. काही करुणरसात भिजलेली, तर काही सौम्य विनोदाची पखरण असलेली ही स्नेहाद्र्र पत्रं म्हणजे शब्दांचा आनंदोत्सव आहे.
हा जल्लोष रसिक वाचकांनाही तितकाच भावेल यात कसलीही शंका नाही.
मूळ लेखक : मेरी अन शाफर
अनी बरोज
अनुवादक : मैत्रेयी जोशी
पृष्ठे : 248 किंमत : 250
No comments:
Post a Comment