Thursday, February 17, 2011

जोहार मायबाप जोहार



संत परंपरेतील महान विट्ठल भक्त संत चोखामेला यांच्या आयुष्यावारिल मनोवेधक कादंबरी
अठरा-एकोणीस वर्षाचं कोवळं वय, अतिशय प्रसन्न मुद्रा. चेहऱ्यावरून विलसणारे प्रचंड आश्वासक भाव, समोरच्यांच्या हृदयाचा ठाव घेणारे अत्यंत स्नेहाद्र्र डोळे, भय कपाळ, कपाळावर काढलेलं तेजस्वी गंध, काहीसे पातळ ओठ त्यावर विलसणारं लागवी हास्य, टोकाला निमुळती होत गेलेली स्वभावातला ठामपणा दर्शविणारी हनुवटी, मागे वळवलेले आणि मानेवर रुळणारे केस आणि या सगळ्याला सामावून घेणारं तेजस्वी तरीही दिलासा देणारं लोभसवाणं व्यक्तिमत्त्व.

चोखोबा ज्ञानदेवांना नखशिखान्त न्याहाळत होता आणि तरीही त्याचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ज्ञानदेवांच्या पाया पडण्यासाठी जो तो धडपडत होता. पण ते कुणालाच पाया पडू देत नव्हते. चरणावर मस्तक ठेवू देत नव्हते. त्यांच्यासमोर कुणी वाकला की, अध्र्यातुनच त्याच्या खांद्याला धरून त्याला उठवून हृदयाशी धरत होते. खाली वाकणारा कोण आहे, हे बघण्याचे ते कष्टही घेत नव्हते. जो कुणी असेल, मग तो कुणीही असू दे, त्याला उठवून हृदयाशी धरत होते. त्यांच्या सगळ्या हालचाली, त्यांच्या चेहर्यावरचे भाव, त्यांचं ते सगळ्यांना मिठीत घेणं, खांद्यावर, पाठीवर थोपटणं, नंतर प्रेमानं हसून दोन शब्द बोलून चौकशी करणं हे सगळं चोखोबा एकाग्रचित्तानं बघत होता.

आपल्यासमोर वाकलेल्या प्रत्येक व्यक्तीची ज्ञानदेव निवृत्तीनाथांशी ओळख करून देत होते. त्यांना सगळ्यांची नाव माहीत होती. चोखोबाला याचंही नवल वाटलं. ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांच्या मागे सोपानदेव आणि मुक्ताई होते. आत आल्याबरोबर मुक्ताईनं जनाबाईचा हात धरला. ते बघून सोपानदेवांच्या चेहर्यावर हसू उमटलं. मधल्या खोलीत बौठक अंथरली होती. नामदेवांनी तिथं सगळ्यांना बसण्याची विनंती केली.

ज्ञानदेवांनी प्रथम निवृत्तीनाथांना हाताशी धरून आणून बौठकीवर बसवलं. नंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांची आज्ञा
घेऊन ज्ञानेश्वर त्यांच्या शेजारी बसले. ज्ञानेश्वरांच्याप्रमाणे सोपानदेवांनीही निवृत्तीनाथांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या पायावर डोकं ठेवलं. आणि ते ज्ञानेश्वरांच्या शेजारी बसले. नंतर आली मुक्ताई. तिनं तिन्ही भावांच्या पायावर डोकं ठेवलं आणि ती सोपानदेवांच्या शेजारी बसली.

चोखोबा एका बाजूला उभे राहून चारही भावंडांना पारखत होते. निवृत्तीनाथ त्याला आकाशासारखे वाटले विशाल नेत्र असलेले. तर ज्ञानेश्वर साक्षात् तेजस्वी सूर्याप्रमाणं दिसले. सोपानदेव पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिसले. शीतल, शांत आणि तेजस्वी तर मुक्ताई पृथ्वीसारखी. सगळ्यांना तोलून धरणारी, पेलून धरणारी. सगळ्यांचंच पाया पडून झालं होतं. चोखोबा संकोचून एका बाजूला, एकटाच उभा आहे, हे नामदेवांच्या लक्षात आले. चोखोबांच्या मन:स्थितीची त्यांना कल्पना आली. ते पुढे झाले.

चोखोबाच्या हाताला धरून त्यांनी त्याला ज्ञानेश्वरांच्याजवळ आणलं. म्हणाले, `माउली, हे चोखोबा. म्हणजे मंगळवेढ्याचे चोखामेळा. नुकताच त्यांनी भागवत संप्रदायात प्रवेश केला आहे. संतांच्या मेळ्यात राहता यावं, म्हणून ते खास मंगळवेढ्याहून इथं आले आहेत. गेले सात-आठ दिवस ते आमच्याबरोबरच आहेत. काल तर त्यांनी आमच्या सगळ्यांच्याबरोबरचं विठ्ठलनामाचा महिमा सांगणारी अभंगरचनाही केली.`

नामदेव चोखोबाची माहीती सांगत होते. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक चोखोबाच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. गळा दाटून येऊ लागला होता. डोळ्यात पाणी उभं राहू लागलं होतं. नामदेवांनी केलेल्या त्या प्रशंसेने भारावलेला, संकोचून गेलेला, कासावीस झालेला चोखोबा बघून ज्ञानेश्वरांना थोडीशी गंमत वाटली.

लेखिका - मंजुश्री गोखले\
पृष्ठे : 338 किंमत : 300

( पुस्तकातला काही भाग )

No comments:

Post a Comment