Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Friday, February 18, 2011
बिलोंगिंग - समीम अली
छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची सत्यकथा
बालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा तिला कधी एकदा स्वत:च्या घरात जाईन असं झालं. ती आली मात्र एका अत्यंत घाणेरड्या घरात; जिथं तिला तिच्या लहान वयाला न झेपणारी कामे सतत करावी लागत. तिच्या जन्मदात्रीनेच तिचा अनन्वीत छळ आरंभला. या सर्वाला आपण स्वत:च जबाबदार आहोत असे लहानगी समीम समजू लागली. स्वत:च स्वत:ला शारीरिक इजा करून घेऊ लागली. आईबरोबर पाकिस्तानात जायला मिळणार हे समजल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. तेथे पोहोचल्यावर मात्र तिला कळून चुकले की तिच्या आईने तिला सुट्टीवर नेलं नव्हते. तेरा वर्षाच्या समीमचे एका अनोळखी पुरुषाबरोबर बळजबरीने लग्न लावण्यात आले. दिवस गेल्यावर तिला परत ग्लासगोत आणण्यात आले; ते केवळ कुटुंबाकडून होणारा छळ सोसण्यासाठी. खरं प्रेम म्हणजे काय याची जाणिव झाल्यावर स्वत:च्या लहान मुलाला घेऊन तिने घरच्या हिंसाचारापासून स्वत:ची सुटका करून घेतली. स्वत:च्या घरचा भयानक अनुभव ती मागे ठेऊन आली असा तिला विश्वास होता. परंतु तिच्या पळून जाण्याने तिच्या कुटुंबाच्या झालेल्या बेइज्जतीच्या परिणामांना तिला तोंड द्यावे लागेल याची कल्पना तिला कशी असणार? बिलाँगिंग म्हणजे एक धक्कादायक सत्य घटना आहे. ही कथा आहे एका वेड्या मुलीची, स्वत:च्या भूतकाळापासून करून घेतलेल्या सुटकेची, मोठी होत असतांना स्वत:च्या कुटुंबाकडूनच होणार्या छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची. सध्या नवरा आणि स्वत:च्या दोन मुलांबरोबर समीम अली मँचेस्टरला राहते. स्थानिक राजकारणात तिचा सक्रीय सहभाग आहे. मॉस साईड या संस्थेत ती समुपदेशनाचे काम करते. बळजबरीने लावल्या गेलेल्या लग्नांविरूद्ध ती सतत आवाज उठवत आहे.
मूळ लेखक : समीम अली
अनुवादक : सिंधु जोशी
पृष्ठे : 257 किंमत : 240
-----------------------
दिवस, आठवडे सरले. परत एकदा माझ्या कामाची घडी बसली. पण सवेरने आणलेल्या नवीन गोष्टींमुळे माझं काम सोपं झालं होतं.
दिवस राहिले तरी मला काही त्रास नव्हता. तनवीरला मात्र सकाळ, दुपार, संध्याकाळ कसला ना कसला त्रास होई.
तनवीरची सर्व जण काळजी घेत. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस. खूप पाणी पी, अरे तिला कोणातरी रस द्या बघू, पाय वर घेऊन बस म्हणजे बरं वाटेल. एक ना दोन.
मला कसलाच त्रास होत नव्हता. पण मलाही वाटे, की कोणी चार शब्द बोलून काळजी घ्यावी. मलाही तनवीरसारखं बाळच होणार होतं ना? मग मला नको थोडी विश्रांती? का एकसारखं कामच?
हनीफ आणि तिची मुलं नसल्यामुळे काम बेताचं होतं. पण मी पाकिस्तानात असताना हनीफने माझं सगळं सामान उसकलं होतं. त्यातलं बरंचसं फेकून दिलं होतं. ताराच्या लग्नात आईने घेतलेला गुलाबी रंगाचा सलवार कमीजही फेकून दिला होता. आता मी तो घालू शकणार नव्हते, पण आईने मला दिलेली ती एकमेव नवी वस्तू होती. म्हणून त्याचं महत्व होतं. मला एकदम निराश वाटलं. पण आईला त्याचं काहीच सोयरसुतक नव्हतं.
माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं म्हणजे माझा हट्टीपणा कमी होईल असं तर आईला वाटत नव्हतं? पण पाकिस्तानातल्या अनुभवांनंतर सगळं बदलून गेलं होतं. माझं लग्न एकाएकी करून दिलेल्या दिवसापासून, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी ज्या स्थितीत परत आले होते तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आईने मला परत त्याच्याकडे ज्या तऱ्हेने घालवून दिलं होतं, त्यानंतर माझी पूर्ण खात्री पटली होती की आई माझी कधीच काळजी करणार नव्हती. माझी काळजी मलाच घेणं भाग होतं. त्यामुळे ग्लासगोला परत आल्यापासून आईचं वागणं पूर्वीसारखंच होतं. पण मी मात्र बदलले होते. तिला कल्पना नव्हती की तिचे सगळे बेत फसले होते. तिला अजूनही वाटत होतं की ती मला गुलामासारखं वागवू शकत होती.
ती सतत पाकिस्तानात फोन लावे. अफजलच्या कुटुंबाला सारखं कसलं ना कसलं काम सांगे. तिच्या मनाप्रमाणे काम झालं नाही तरी ती माझं अफजलशी झालेलं लग्न मोडून टाकण्याच्या धमक्या देई. ती सवा|वरच ताबा ठेवी. अर्थात, माझं कायद्यानुसार लग्नाचं वय झाल्याशिवाय अफजल इथे येऊच शकत नव्हता. त्यामुळे ती अफजलला काही ना काही सबबी सांगून स्वत:ची सुटका करून घेई .
( पुस्तकातला काही भाग )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment