Friday, March 4, 2011

मिरासदार


मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावेल.

"मी मिरासदारांकडून अपेक्षा करतो ती प्रदीर्घ उपहासकथेची नव्हे, तर विनोदी कादंबरीची. त्यांच्या प्रतिभेची सहजप्रवृत्ती उपहासापेक्षा विनोदाकडेच अधिक आहे. व्यक्तिविशेष, आणि प्रसंगविशेष ह्यामधील हास्यबीजे नेमकी ओळखण्याची व खुलवण्याची जशी त्यांच्या ठिकाणी शक्ती आहे तशीच चेहर्‍यावरचे उसने गांभीर्य थोडेही ढळू न देता असल्या व्यक्तिप्रसंगातून जन्मलेल्या एखाद्या हास्योत्पादक घटनापरिस्थितीचे मिस्किल निवेदन रंगवण्याची त्यांच्या ठिकाणी एवढी अपूर्व शक्ती आहे की उपहासाचा ताण भासू न देणार्‍या विशुद्ध हास्याची एकसारखी निर्मिती साधणारी प्रदीर्घ कथा ते लिहू शकतील असे अगदी राहून राहून वाटते."
--- वा. ल. कुलकर्णी

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अश्या काही नव्या वाटा पडल्या. ह्या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. म्हणून त्या दिशेने वर्दळ वाढली. इतकी की बघताबघता पाऊल वाटेचा गाडीरस्ता झाला, अनेक चाकोर्‍या उमटल्या, फुलोरा ऊठू लागला.
पण वाट एकच नसते, वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून जेवढ्या त्रिजा निघतात तेवढ्या वाटा असू शकतात हे एका मिरासदारांनी ओळखले आणि स्वत:चीच अशी एक वाट पाडली.
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यांत जसे एक मारूतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे एक खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखाच तो सतत खळखळत असतो आणि हरेक पाण्याची जशी चव, तशी ह्या विनोदाची चवही वेगळीच असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरण्यांच्या हुंडारण्यांतून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काहीतरी घडत असते.
हरबर्‍याची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते. पण पाणी दिलेल्या, कणसं-लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहामत अशी की त्यांनी हा विनोद धरला आणि तो सुद्धा त्याच्या खास चवीसकट.
उत्तम म्हणुन गाजलेल्या मिरासदारांच्या कथातून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो. ग्रामीण कथेच्या निशाणाखाली आज पुस्कळ शिलेदारांची गर्दी झालेली आढळते पण मिरासदारांनी पाडलेली वाट, अजून पाऊलवाटच आहे. तिच्यावर गर्दी उसळलेली नाही. कारण ती वाट सवघड नाही.
हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.

-----------
अस्सल गावरान बाज, नाट्यमय निवेदन आणि अफाट स्मरणशक्ती यांच्या जोरावर द. मा. मिरासदार यांनी मराठी रसिकांवर कथाकथ
नाची जादू कायम ठेवली आहे. त्यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त खास लेख...

...............

प्रा. सुहास द. बारटक्के

पुण्यात झालेल्या ८३ व्या अ. भा. साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द. मा. मिरासदारांनी 'भुताची गोष्ट' ऐकवून पुन्हा एकदा फड जिंकला. दीड तासाहून अधिक काळ गोष्ट रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढउतार, छोट्या छोट्या प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रं श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर ऊभी करण्याची त्यांची क्षमता अद्यापही अबाधित असल्याचंच त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. तल्लख स्मरणशक्तीचं देणं लाभलेल्या या लेखकानं यावेळी प्रथमच बसून (पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे) कथा सांगितली, पण तरीही अद्याप कथाकथनक्षेत्रात आपलीच 'मिरासदारी' असल्याचं दाखवून दिलं.

व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीनं १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. त्यातील द. मा. मिरासदार हे माईकसमोर उभं राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भूत नाट्य अनुभवायला मिळे. आजही मिरासदारांनी हे नाट्य. टिकवून ठेवलंय हे विशेष! कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक कार्यक्रम झाल्याने त्यात उलट इतकी परिपक्वता आली आहे की, कालानुरूप नव्या गोष्टी ते त्यात बेमालुमपणे घुसवतात.

पुणे साहित्य संमेलनातल्या कथा कथनानंतर अप्पा परचुरे यांच्या घरी गप्पा मारताना 'यावेळी तुमच्या कथेत पोलीसही आल्याचं मी नजरेस आणून दिलं तेव्हा मिरासदार म्हणाले- ''पोलीसाला हल्ली माणसंही घाबरत नाहीत, तर भुतं कशी घाबरतील?

-पोलिसच उलट भुताला घाबरतो. बरं तोही माणूसच आहे; तरी बरं त्यांच्या पँटी आधीच पिवळ्या असतात.' या माझ्या 'ऑडिशन्स' होत्या बरं का, मूळ कथेत त्या नाहीत हे मला मान्य. पण कथा रंगवताना आपोआप हे सुचत जातं.'' मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वातील 'चैतन्य' आजही तसंच कायम असल्याचं, त्यांच्यातला कथाकार बावन्नकशी सोन्याप्रमाणं आजही झळाळत असल्याचंच हे लक्षण आहे.

मराठीत विनोदाची परंपरा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी जोपासली आणि मिरासदारांसारख्या लेखकांनी ती समृद्ध केली. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि मिरासदार या त्रयींपैकी फक्त मिरासदारांचे कथाकथन ऐकू शकतो. व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचं हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी त्यांच्या कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा'मधे कथा पटकथेसह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रं आहेत. ती आपल्याला खळाळून हसायला लावतात.

त्यांच्या कथाकथनाचे महाराष्ट्राबाहेरही कलकत्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून कार्यक्रम झालेच परंतु कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही त्यांनी केलाय. कथा कथनाखेरीजही त्यांची विनोदी भाषणे गाजली आहेत. मुंबईत दादरला वनिता समाज हॉलमध्ये माझ्या 'वडापाव' या पुस्तकाचं द. मा. मिरासदारांच्या हस्ते गतवषीर् अत्रे जयंतीच्या मुहुर्तावर प्रकाशन झालं. प्रकाशक अप्पा परचुरे व शिरीष पै यांनी आयोजित केलेल्या या समारंभात अत्र्यांच्या आठवणी सांगून द. मां. नी बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकण्याची सवय असणाऱ्या मुंबईकरांमध्ये तासभर हास्यफोट घडवले. समोर होते डॉ. सुभाष भेंडे, जयंत साळगावकर, विसूभाऊ बापट , प्रवीण दवणे, पद्मजा फेणाणी, मोहन वाघ व इतर अनेक मान्यवर.

...गावरान विनोदाच्या गर्द हिरव्या रानात खळाळणारा हा झरा अद्याप वहाता आहे. 'माझा वाढदिवस तिथीनुसार महावीर जयंतीला आणि तारखेनुसार आंबेडकर जयंतीला येत असल्याने दोन्ही दिवस तुम्हाला सुट्टी दिलीय बरं का.' असं सांगणाऱ्या मिरासदार यांनी असेच हसवत ठेवावे..

No comments:

Post a Comment