Tuesday, August 9, 2011

.. ‘माणूस’ म्हणून आम्हाला स्वीकारा


तृतीयपंथीयांची समाजाला विनंती


पुणे, ८ ऑगस्ट -तृतीयपंथी असणे ही प्रकृतीतीलच एक गोष्ट असली तरी त्याकडे समाज तुच्छतेने पाहतो आहे. अंध व अपंग व्यक्तींना समाज स्वीकारतो. पण वेगळी लैंगिकता आहे, म्हणून आम्ही आयुष्यभर समाजाच्या नावाने चीड-चीड करत जगतो. आम्ही आमचे हक्क मिळवू, पण त्याआधी समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून स्वीकारा, अशी विनंती महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी आज केली.

पारू नाईक लिखित ‘मी का नाही?’ या पुस्तकाचे प्रकाशन त्रिपाठी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, सिने अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, पत्रकार वैशाली रोडे, मेहता पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक सुनील मेहता उपस्थित होते.

त्रिपाठी म्हणाल्या की, माझे आयुष्य जसे आहे तसे मी जगायचे ठरवले तरी त्याला कुटुंब एका मर्यादेपर्यंत स्वीकारते. त्यांना समाज काय म्हणेल याची अधिक भीती असते. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत पहिल्यांदा बदल होण्याची गरज आहे. मी तृतीयपंथी असूनही माझ्या आई-वडिलांनी मला वेगळी वागणूक दिली नाही. त्यांनी मला चांगले शिक्षण आणि प्रेम दिले. त्यांनी माझा जशास तसा स्वीकार केला. तृतीयपंथीयांना जुनी परंपरा आहे तसेच त्यांच्याकडे नृत्यादी कलाही आहेत. त्याचा समाजाने फायदा करून घेतला पाहिजे. ब्रिटिशांनी आणलेल्या जाचक कायद्यातूनही हा पंथ नामशेष होऊ शकला नाही. त्या परिस्थितीत आम्ही जगलो, अजूनही जगतो आहे आणि पुढेही जगणार आहोत. या प्रकृतीतला एक घटक आम्ही आहोत, त्यामुळे समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून जगू दिले पाहिजे.

यावेळी डॉ. वाटवे, कुबल-आठल्ये, डॉ. यादव, पारू नाईक, रोडे यांची भाषणे झाली. मृण्मयी भजक यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=175481:2011-08-08-19-08-53&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212

No comments:

Post a Comment