Tuesday, August 9, 2011

माझा हक्क हवा आहे...



- लक्ष्मीनारायण त्रिपाठी

पुणे- दि. ९- मला सहानुभूती नको आहे. मला माझा हक्क हवा आहे. मला स्वतःचा समाज घडवायचा आहे. समाज आम्हाला नाकारतो. हे बदलण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.. आमच्या बद्दल समाजाची मनस्थिती बदलण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल...असा विश्वास महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी व्यकत केला.

मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित झालेल्या पारू नाईक लिखित ‘मी का नाही?’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (८.८.२०११) पत्रकार संघाच्या सभागृहात त्रिपाठी यांच्या हस्ते झाले.

तृतीयपंथी असणे ही प्रकृतीतीलच एक गोष्ट असली तरी त्याकडे समाज तुच्छतेने पाहतो आहे. अंध व अपंग व्यक्तींना समाज स्वीकारतो. पण वेगळी लैंगिकता आहे, म्हणून आम्ही आयुष्यभर समाजाच्या नावाने चीड-चीड करत जगतो. आम्ही आमचे हक्क मिळवू, पण त्याआधी समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून स्वीकारा, अशी विनंती करताना तृतियपंथीचे प्रश्न उपस्थितांसमोर मांडले. ह्या पुस्तकामुळे आमचे दुःख समाजासमोर मांडल्यामुळे पारू मदन नाईक यांचे आभार मानताना ह्या पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदीसह इतर भाषात भाषांतर करण्याची विनंती मेहता प्रकाशनाला त्रिपाठींसह सर्वच वक्त्यांनी केली.

त्रिपाठी म्हणाल्या की, माझे आयुष्य जसे आहे तसे मी जगायचे ठरवले तरी त्याला कुटुंब एका मर्यादेपर्यंत स्वीकारते. त्यांना समाज काय म्हणेल याची अधिक भीती असते. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत पहिल्यांदा बदल होण्याची गरज आहे. मी तृतीयपंथी असूनही माझ्या आई-वडिलांनी मला वेगळी वागणूक दिली नाही. त्यांनी मला चांगले शिक्षण आणि प्रेम दिले. त्यांनी माझा जशास तसा स्वीकार केला. तृतीयपंथीयांना जुनी परंपरा आहे तसेच त्यांच्याकडे नृत्यादी कलाही आहेत. त्याचा समाजाने फायदा करून घेतला पाहिजे. ब्रिटिशांनी आणलेल्या जाचक कायद्यातूनही हा पंथ नामशेष होऊ शकला नाही. त्या परिस्थितीत आम्ही जगलो, अजूनही जगतो आहे आणि पुढेही जगणार आहोत. या प्रकृतीतला एक घटक आम्ही आहोत,समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून जगू दिले पाहिजे.

`या समाजावर मराठी साहित्यात अजून एकही पुस्तक झालेले नाही. हा विषय समाजापुढे आणून या पुस्तकाने एक इतिहास घडविला आहे.आपण या समाजाला अजून न्याय देउ शकलो नाही याबद्दल खेद वाटत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आनंद यादव यांनी जाहिरपणे कबूल केले.

अनेक वर्षे संशोधन करून हे पुस्तक लिहल्याचे सांगून लेखिका पारू मदन नाईक यांनी या सर्वांना समाजात माणूस म्हणून जगता यावे याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले.

पत्रकार वैशाली रोडे यांनी आपण लक्षमीनारायण त्रिपाठी यांचेवर आत्मचरित्र लिहित असल्याचे सांगून हिजड्यांची वाईट बाजूच समाजासमोर आली आहे. त्यांची चांगली आणि न्याय बाजू मांडली गेली पाहिजे असे मत मांडले.

यावेळी डॉ. वाटवे यांनी ,ही ही माणसे आहेत. घाणीतली डुकरे नाहीत. पारूताईंनी ह्या दुर्लक्षित समाजाच्या व्यथा आणि त्यावरील उपायांचा अत्यंत प्रभावीपणे शोध या कादंबरीत घेतला आहे. यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

`हे पुस्तक वाचल्यामुळे या समाजाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. माझ्याकडूबन तरी या लोकांना सहानूभूतीचा वागणूक मिळेल असा शब्द अभिनेत्री कुबल-आठल्ये यांनी दिला.

वेगळ्या वाटेने जाणारी ही वास्तववादी कलाकृती असल्याचे सांगून मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांनी आपण अशी वेगळ्या विषयाची पुस्तके प्रकाशित करत असल्याची आठवण वाचकांना करून दिली.

मृण्मयी भजक यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment