
पुणे - "समाजाने तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. "मी का नाही' या कादंबरीच्या निमित्ताने या दुर्लक्षित समाजाचे प्रश्न समोर आले आहेत. कादंबरीमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांचा तृतीयपंथी समाजाला खूप उपयोग होणार आहे,'' असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी येथे व्यक्त केले.
"मी का नाही' या कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. वाटवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, चित्रपट अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, "मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता उपस्थित होते.
कादंबरीविषयी माहिती देताना लेखिका पारू मदन नाईक म्हणाल्या ""कादंबरीतील नायिका आईच्या पाठिंब्यामुळे तृतीयपंथीय समाजाची स्थापना करते. समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित करते. त्यांचे प्रश्न सोडविते. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारते. तृतीयपंथीयांनी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला समाजाची साथ मिळणे आवश्यक आहे.''
डॉ. यादव म्हणाले, ""वेगवेगळ्या भागांत तृतीयपंथी समाजाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यांची सतत उपेक्षा केली जाते. त्यांना उपेक्षितांप्रमाणे वागवले जाते. या पुस्तकाच्या रूपाने या समाजाचे प्रश्न समोर आले आहेत.''
""या समाजाकडे तुच्छतेने बघितले जाते. त्यांच्याविषयी अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. मात्र, त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्याविषयी जास्त माहिती मिळाली व त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या असल्याचे कळले,'' असे आठल्ये यांनी सांगितले. मेहता यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
http://www.esakal.com/esakal/20110810/5179277502990800741.htm
No comments:
Post a Comment