Saturday, September 17, 2011

नॉट पेड



हिंदीत पुष्कळ लेखक व्यंगलेखन करतात. त्यांच्यातले सर्वोत्कृष्ट म्हणजे हरिशंकर परसाई होत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ति ठरणार नाही. हरिशंकरजींच्या काही उत्कृष्ट व्यंगरचनांच्या मराठी अनुवादांचा हा संग्रह ही श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी मराठी वाचकांना दिलेली एक नाविन्यपूर्ण भेट आहे.
भारतीय समाजजीवनाची सर्वच अंगे भ्रष्ट झाली आहेत. त्याचे स्वरुप पूर्णपणे गढूळ झाले आहे.
या सार्वत्रिक गढूळपणाचे विदारक दर्शन तीक्ष्ण उपहासाद्वारे लेखकाने आपल्या व्यंगलेखनातून घडविले आहे.
त्यातून कोणतेच क्षेत्र सुटलेले नाही. लोकशाही, निवडणुका, राजकारण यांच्यापासून साहित्य, सरकारी पुरस्कार, प्रशासन, पोलीसयंत्रणा, शिक्षण आणि अध्यात्मसुध्दा..
अशी सर्वच क्षेत्रे उपहासाच्या धारदार सुरीने सोलून काढून, नागडीउघडी करून लेखकाने वाचकांसमोर ठेवली आहेत. हरिशंकरजींचा उपहास झोंबरा आहे. व्यंग बोचरे आहे. पण सार्वत्रिक गढूळपणाबद्दलची खंत आणि चीड अस्सल आहे. उपहासासाठी त्यांनी कधी पुराणकथांचे विडंबन केले आहे, तर कधी मार्मिक अभिप्रायांतून वाचकांना हसताहसता विचार करायला लावले आहे.
हरिशंकरजींच्या हिंदीतील व्यंगलेखनाचे तेवढेच धारदार मराठीकरण करण्याचे कठीण काम श्रीमती केळकर यांनी समर्थपणे पार पाडले आहे.
-ह.मो.मराठे

लेखक- हरिशंकर परसाई
अनुवाद- उज्ज्वला केळकर
पृष्ठे- १४० किंमत-१४०

No comments:

Post a Comment