

ADAM अडम
लेखक- रत्नाकर मतकरी
पृष्ठे- ३१६
किंमत- २८०
`अडम` ही माझी, आत्तापर्यंत सर्वात धाकटी कादंबरी. थोरली ` जौळ` - ती नावाजली गेली, तिच्यावर आधारलेलं `माझं काय चुकलं` हे नाटक जोरात चाललं. तिच्यावर चित्रपटही झाला. थोडक्यात, ती सुस्थळी पडली. मधली ` पानगळीचं झाड` , तिच्यावर नाटक झालं. ते ब-यापैकी चाललं. तिसरी `अडम` , तिच्यावर ना नाटक झालं, ना चित्रपट. रसिकांनी ती आवडल्याचं एकमेकांना सांगितलं तरी कुजबुजून. पण धाकटी आणि धड मार्गाला ना लागलेली मुलगी बापाला अधिक आपलीशी वाटते म्हणून माझं `अडम` वर प्रेम आहे, असं नाही. अगदी त्रयस्थपणे, तटस्थपणे पाहिले तरी या कादंबरीचे गुण स्पष्ट दिसतात. मलाच नाही, तर मुद्दाम डोळे झाकून न घेतल्यास, कुणालाही.
`अडम`मध्ये सुमारे चाळीस वर्षाचा कालखंड येतो. त्याचबरोबर दक्षिण भारतातील नानाविध स्थळे आणि अनेक व्यक्तिरेखा, कितीतरी पात्रे या कादंबरीत भेटतात, त्यांच्या आयुष्यातल्या विविधरंगी प्रसंगांनी `अडम` भरगच्च आणि नाट्यपूर्ण झाली आहे.
`अडम` अधिक वाचकांपर्य़ंत पोहोचायला हवी होती, याचे शल्य माझ्यापेक्षा, माझ्या वाचंकांना अधिक बोचत असावे. कारण, माझ्या प्रत्येक जाहिर मुलाखतीत प्रेक्षकांकडून `अडम विषयक प्रश्न येतात. कदाचित साहित्यदिशादर्शकांनी शिफारस न करता या कादंबरीचा शोध आपला आपल्यालाच लागला, याचे त्यांना अधिक अप्रुप वाटत असावे. मला खात्री आहे- ती नव्याने वाचली जाणा-यांची संख्या वाढतेय. ती इंग्रजीत रुपांतरीत व्हावी, अशाही सूचना अनेकांकडून येताहेत. कधी ना कधी नव्या काळाप्रमाणे समीक्षेचे पारंपारिक संकेत मोडीत काढून तिचे नव्याने मूल्यमापन केले जाईल, याविषयी मला बिलकूल शंका नाही!
-रत्नाकर मतकरी
(नव्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहलेल्या प्रस्तावनेतून)
No comments:
Post a Comment